राष्ट्राच्या प्रवासाचे विहंगमावलोकन करण्याचा दिन

By admin | Published: August 15, 2015 01:54 AM2015-08-15T01:54:55+5:302015-08-15T01:54:55+5:30

स्वातंत्र्यदिनाचा आजचा दिवस हा क्षणभर थांबून, दैनंदिन घटनांचा विचार न करता, आपल्या राष्ट्राने गेल्या ६८ वर्षात स्वतंत्र राष्ट्र या नात्याने केलेल्या वाटचालीविषयी चिंतन करण्याचा आहे.

The day to observe the journey of the nation | राष्ट्राच्या प्रवासाचे विहंगमावलोकन करण्याचा दिन

राष्ट्राच्या प्रवासाचे विहंगमावलोकन करण्याचा दिन

Next

- गुरुचरणदास
(विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत)

स्वातंत्र्यदिनाचा आजचा दिवस हा क्षणभर थांबून, दैनंदिन घटनांचा विचार न करता, आपल्या राष्ट्राने गेल्या ६८ वर्षात स्वतंत्र राष्ट्र या नात्याने केलेल्या वाटचालीविषयी चिंतन करण्याचा आहे. आपल्या राष्ट्राच्या गुंतागुंतीच्या इतिहासाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा त्या इतिहासाच्या धुक्यातून मला आपल्या राष्ट्राचे तीन मैलाचे दगड स्पष्टपणे दिसतात. आॅगस्ट १९४७, जेव्हा आपल्या राष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, जुलै १९९१, जेव्हा आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आणि मे २०१४ जेव्हा आपण आत्मसन्मान प्राप्त केला.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या आदर्शवादी युगात माझी जडणघडण झाली असल्यामुळे पं. जवाहरलाल नेहरूंच्या आधुनिक भारताविषयीच्या स्वप्नांवर आमचा विश्वास होता. पण जसजसा काळ उलटत गेला तसतसे लक्षात येऊ लागले की नेहरूंच्या संमिश्र अर्थकारणाचा पुढचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे समाजवादाऐवजी यथार्थवादाकडे आम्ही पोचलो होतो. त्यालाच आम्ही उपहासाने ‘लायसन्सराज’ म्हणू लागलो होतो. पण १९९१ च्या सुधारणांनी त्या कल्पनांचा शेवट झाला. तेव्हापासून भारताची झपाट्याने वाढ होत गेली.
आपले १३० कोटींचे संभ्रमित लोकशाही असलेले राष्ट्र, जगातील सर्वात वेगवान अर्थकारण असलेले राष्ट्र कसे झाले हे कुणीच सांगू शकत नाही. कारण भारताने ज्या आर्थिक सुधारणांचा स्वीकार केला होता तसाच अन्य ६० राष्ट्रांनीही केला होता. एकूणच राष्ट्राची दबून असलेली ऊर्जा १९९१ नंतर अकस्मात बाहेर पडली. आपली लोकशाही ६७ वर्षे टिकून आहे. ही गोष्टही आश्चर्यकारक वाटावी अशीच आहे. गरीब समाजात स्वयंशिस्त आणि स्वयंप्रशासनाचा अभाव असतो. हा परंपरागत गैरसमज खोटा ठरविण्यात आला. त्यामुळे राष्ट्र या नात्याने भारत हे अधिक लवचिक आणि टिकावू कसे आहे हेही दिसून आले.
आजचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा नरेंद्र मोदींना लोकांनी का निवडून दिले याचा त्यांनीही विचार करावा, हे मी त्यांना सुचवू इच्छितो. त्यांनी आपल्या प्रचाराच्या काळात ‘विकास’ या शब्दाचा उपयोग ५०० वेळा केला आणि त्या प्रत्येक वेळी त्यांनी हिंदुत्व या शब्दाचाही वापर केला. आपण असे वातावरण मिळवून देऊ ज्या वातावरणात लोकाना आपले व्यवहार लालफीतशाहीत व इन्स्पेक्टर राजमध्ये न अडकता करता येतील, असे मोदींनी अभिवचन दिले होते. पण ते अभिवचन पूर्ण करण्यात त्यांना आतापर्यंत तरी अपयश आले आहे. त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने करयोजना पद्धत सुरू करून व्यवसायातील कामकाजात सुधारणा घडवून आणू या अभिवचनाला हरताळ फासला आहे. त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी भारत हे शत्रू राष्ट्र ठरू लागले आहे.
व्यवसाय करणाऱ्यांसाठी भारत हे विरोधी स्थळ होऊ नये यासाठी मोदींनी बाजाराची विक्री करण्याचे धोरण स्वीकारायला हवे. मार्गारेट थॅचर यांनी ब्रिटनमध्ये आणि डेंग झियाओ मिंग यांनी चीनमध्ये तेच केले. अनेक भारतीयांचा अजूनही समज आहे की बाजारपेठेमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. तसेच त्यातून भ्रष्टाचार आणि स्वार्थी भांडवलशाहीची निर्मिती होते असेही त्यांना वाटत असते. बाजारपेठेमुळे गेल्या दोन दशकात सर्वंकष समृद्धी पाहायला मिळाली. यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. हे राष्ट्र न कळत सुधारणा घडवीत असते असेच त्यांना वाटते, बाजारपेठीय आणि व्यावसायिक यातील फरक लोकांना समजावून सांगण्यासाठी मोदींनी ‘मन की बात’ या व्यासपीठाचा वापर करावा. बाजारपेठीय व्यवस्थेत स्पर्धात्मकता अभिप्रेत असते. त्यामुळे किमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. मालाची गुणवत्ता वाढते आणि भांडवलशाही व्यवस्थेवर आधारित नियमांकडे वाटचाल सुरू होते. जी सर्वांसाठी उपकारक ठरते. पण व्यावसायकीय व्यवस्थेत राजकारणी आणि अधिकारी यांच्या हातात आर्थिक निर्णय केल्याचे अधिकार जातात. त्यातूनच स्वार्थी भांडवलशाही जन्माला येते.
आणखी एक अपूर्ण राहिलेला कार्यक्रम हा आपली राज्य घटना (विशेषत: त्यातील कायद्याच्या राज्याची संकल्पना) लोकांपर्यंत पोचविण्याचा आहे. कायद्याचे राज्य हे सर्वानुमतीच्या संकल्पनेवर आधारलेले असते. ते रोजच्या व्यवहारातही दिसून येत असते. लोक केवळ भीतीतून कायद्याचा आदर करीत नसतात, तर रोजच्या सवयीतून त्याचे पालन करीत असतात. कायद्याचे पालन ही सवय होते. पण दुर्दैवाने आमचे नेते आपल्या घटनेतील उदारतत्त्वे लोकांपर्यंत पोचवू शकले नाहीत. लोकांना
असे वाटते की या देशाची घटना जणू एकाएकी आकाशातून पडली आणि त्यामुळे तिची मालकी
समाज घेऊ शकला नाही.
प्रशासकीय सुधारणा या भारतीय नैतिकतेच्या कल्पनेतूनच तयार व्हायला हव्या. स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधींच्या लक्षात आले की पाश्चात्त्यांच्या उदारमतवादी कल्पना समाजाला स्वीकारार्ह वाटल्या नाहीत. पण लोकांना धर्माने दिलेली नैतिकतेची भाषा मात्र समजत होती. बौद्ध धर्मी सम्राट अशोक यांनी ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात साधारण धर्माची जागतिक तत्त्वे लोकाना सांगितली. या धर्माच्या आधारे त्यांनी हृदयाच्या भाषेचा कार्यक्रम लोकाना सांगितला. आधुनिकपूर्व भारतात धर्माने लोकांच्या मनात नीतितत्त्वे रुजविली आणि लोकांच्या जीवनाची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. अनिश्चितता संपविली. राजधर्माच्या माध्यमातून राजसत्तेचे अधिकार नियंत्रित केले.
म्हणूनच घटनाकारांनी आपल्या भाषणातून लोकांच्या मनावर धर्म बिंबवला आणि राष्ट्रध्वजावरील निळ्या रंगाच्या अशोकचक्राच्या माध्यमातून धर्माची स्थापना केली. आमची घटना हे धर्माची परिभाषा मांडते असे मत डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी मांडले होते. महात्मा गांधींना त्यांच्या आयुष्यात अस्पृश्यता संपविता आली नसती पण त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत प्राण फुंकले. त्याच प्रकारे आपणसुद्धा भारतीय घटनेच्या नीतिमूल्यांचा आरसा तरुणांसमोर ठेवून त्यातील तत्त्वे तोपर्यंत पोचविली पाहिजेत, जोपर्यंत ती त्यांच्या सवयीचा भाग बनत नाहीत.
भारताचा उदय ही माझ्या जीवनाला आकार देणारी घटना होती. पाश्चात्त्य राष्ट्रांना भांडवलवादी पद्धतीचा त्रास होत असताना पूर्वेकडील एक मोठे राष्ट्र राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या आधारावर उदयाला येत आहे ही गोष्ट हेच दर्शविते की खुली समाजव्यवस्था, मुक्त व्यापार आणि जागतिक अर्थकारणाशी अनेक तऱ्हेचे संबंध हेच समृद्धी आणि राष्ट्रीय यशाकडे नेणारे मार्ग आहेत.

Web Title: The day to observe the journey of the nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.