धर्माच्या आधारावर राज्य करण्याचे दिवास्वप्न; गाझावर हमासचा ताबा, इस्रायल शांत कसा बसेल...

By विजय दर्डा | Published: October 16, 2023 07:25 AM2023-10-16T07:25:25+5:302023-10-16T07:26:50+5:30

हमासने स्त्रियांना नग्न करून त्यांची धिंड काढली आहे, निरपराध मुलांच्या माना चिरल्या आहेत.. अशा निर्मम प्रवृत्तींना धडा शिकवलाच पाहिजे!

Daydreaming of ruling on the basis of religion; Hamas did womens nude, killed childrens, Israel have to action | धर्माच्या आधारावर राज्य करण्याचे दिवास्वप्न; गाझावर हमासचा ताबा, इस्रायल शांत कसा बसेल...

धर्माच्या आधारावर राज्य करण्याचे दिवास्वप्न; गाझावर हमासचा ताबा, इस्रायल शांत कसा बसेल...

- डाॅ. विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

एखाद्या देशावर दहशतवादी संघटनेकडून हजारो रॉकेट्स डागले जातात, या देशाच्या सीमा ओलांडून संगीत समारोहात नरसंहार केला जातो, मुलांची शिरे धडावेगळी केली जातात, स्त्रियांना नग्न करून फिरवले जाते, नंतर त्यांना ओलिस ठेवले जाते, असे झाले तर तो देश काय करील? तेच करील जे आता नाइलाजाने इस्रायलला करावे लागत आहे. त्या देशावर टीका करण्याचा अधिकार आता कोणालाही राहिलेला नाही. मी इतिहास सांगत नाही; परंतु, आता हा मुद्दा यहूदी आणि मुसलमान यांच्यातला मुळीच राहिलेला नाही. हमास नावाच्या दहशतवादी संघटनेने एक बहाद्दर देश मानल्या जाणाऱ्या इस्रायली नागरिकांवर केलेला हा हल्ला आहे. याच अनुषंगाने त्याकडे पाहिले पाहिजे. खोलात गेलात तर आपल्याला सहजपणे लक्षात येईल की, हमास पॅलेस्टाइनचाही शत्रू झाला आहे. इस्रायलवर हल्ला केल्यामुळे पॅलेस्टाइनच्या योग्य मागण्या कमजोर पडल्या आहेत.

पॅलेस्टाइनबद्दल बोलणाऱ्या हमासनेच त्या देशाच्या गाझा पट्टीवर कब्जा केलेला आहे हे आपल्याला ठाऊक आहे काय? गाझा पट्टी वगळता बाकी देशावर ‘पॅलेस्टाइन ॲथॉरिटी’चे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या सरकारचे राज्य आहे. मात्र, गाझा पट्टीवर हमासची हुकमत चालते. पॅलेस्टाइन कायदेमंडळाचे १३२ सदस्य वेस्ट बॅंक, गाझा पट्टी आणि जेरूसलेममधील पॅलेस्टिनी लोक निवडतात. पॅलेस्टिनी मुक्ती संघटना आणि इस्रायलमध्ये ओस्लो येथे एक करार झाला होता. या कराराअंतर्गत अंतरिम प्रशासनिक संस्था म्हणून १९९४ मध्ये पॅलेस्टिनी ॲथॉरिटीची स्थापना झाली होती.
भारताने कायमच पॅलेस्टाइनला साथ दिली आहे. यासर अराफत यांच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेला मान्यता देणारा भारत पहिला बिगर अरब देश होता. १९८८ मध्ये भारताने पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता दिली. तेथील राष्ट्रपती महमूद अब्बास २०१७ साली भारतात आले होते. संयुक्त राष्ट्रात भारताने पॅलेस्टाइनला संपूर्ण सदस्यत्व देण्यासाठी बाजूने मतदान केले होते. २०१५ साली संयुक्त राष्ट्राच्या परिसरात पॅलेस्टिनी झेंडा लावण्याचेही भारताने समर्थन केले. केवळ भारतच नाही तर जगातले बहुतेक देश पॅलेस्टाइनबद्दल सहानुभूती बाळगतात. पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांनी शांततेत एकमेकांबरोबर राहावे, हीच भारताची आजही इच्छा आहे. एक भारतीय म्हणून माझे व्यक्तिगत मतही हेच आहे; परंतु, हमासने तर पॅलेस्टाइनचेच नुकसान केले आहे. पॅलेस्टाइनचे समर्थक असणारेही आज हमासच्या कारनाम्यांमुळे इस्रायलच्या बाजूने जाऊन उभे राहिले आहेत. या संकटकाळात भारत इस्रायलबरोबर आहे असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेही आहे. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनमध्ये गेले होते, याची मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो. राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ देऊन गौरविले होते. सांगण्याचा मुद्दा हा की, पॅलेस्टाइनबरोबर आपले सहकार्य राहिले असून इस्रायलशी मैत्रीही आहे.

इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याचे चित्रण पाहून मी अंतर्यामी दु:खी झालो. लहान मुलांची मुंडकी धडावेगळी करण्याइतके क्रूर कोणी कसे काय होऊ शकते? स्त्रियांना नग्न करून फिरवून नंतर ओलिस म्हणून घेऊन जाणे इतके घृणास्पद कृत्य कोणी कसे करू शकतो? काळजाचा थरकाप उडविणाऱ्या हमासच्या कृत्यांचे चित्रण समोर येत आहे. ‘मोसाद’सारख्या जगातल्या श्रेष्ठ गुप्तचर संस्थेला अपयश आले ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. आपले राक्षसी कारनामे दाखवण्यात हमासला यश यावे इतपत इस्रायलची सुरक्षा यंत्रणा कशी नाकाम ठरली?

मी इस्रायलमध्ये गेलो आहे आणि पॅलेस्टाइनलाही भेट दिली आहे. जेरूसलेम या पवित्रस्थळी मी गेलो आहे. मला दोन्ही देश आवडतात. तेथील लोक अतिशय उमदे आहेत. शेवटी शांतता कोणाला नको असते? दोन्ही देशांचे लोक हीच इच्छा बाळगतात. दोन्ही देशांतील वाद शांततापूर्ण मार्गाने सोडविला पाहिजे, असेच मीही म्हणतो. अलीकडे जग याच दिशेने निघाले आहे. संयुक्त अरब अमिरातीबरोबर इस्रायलचे नाते सुधारले आहे. इस्रायल आणि सौदी अरेबियामध्येही सामंजस्याची सुरुवात झाली आहे. मध्यपूर्वेतील देशांत शांतता आणि सद्भावनेचे वातावरण तयार होईल, अशी आशा त्यामुळे वाटू लागली होती. सर्व देश प्रगतीच्या दिशेने पुढे जातील, असे वाटत असतानाच हमासने हा हल्ला केला आहे. कोणत्याही प्रकारची शांतता बोलणी थांबावीत हा त्यांचा उद्देश आहे. अंतर्गत राजकारणामुळे इस्रायल सध्या कमकुवत झाला आहे, असे हमासला वाटते. 

या हल्ल्याचे षडयंत्र रचण्यामागे इराण किंवा दुसरा कुठला देश आहे, यात मी पडू इच्छित नाही. ते कोणीही केलेले असू शकेल. पॅलेस्टिनींच्या मोठ्या हानीचा रस्ता त्यामुळे मोकळा झाला आहे. इस्रायलची आक्रमकता जगाला माहीत आहे. तेथे सरकार कोणाचेही असो, शत्रूने आमच्या एकाला मारले तर आम्ही १० मारू, असेच हा देश म्हणतो. यावेळी तर इस्रायलच्या इतिहासातला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मग तो सहन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रहिवासीच नव्हे तर दुसऱ्या देशामध्ये राहणारे इस्रायलीसुद्धा आपले कामधंदे सोडून हमासशी लढण्यासाठी इस्रायलमध्ये येत आहेत. 

त्यांच्या देशभक्तीचे एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतो. माझे एक मित्र इस्रायलमध्ये राहतात. तेथे प्रत्येक तरुणाला ३२ महिने आणि तरुणीला २४ महिने सैन्यात सेवा करणे बंधनकारक असते. नंतर राखीव दलात सामील केले जाते. माझे मित्र त्यांच्या मुलीला सैन्यात पाठवू इच्छित नव्हते, म्हणून त्यांनी तिला शिक्षणासाठी परदेशात पाठविण्याचे ठरवले; परंतु मुलीने स्पष्ट शब्दात सांगितले, ‘मी सैन्यात सेवा केल्यानंतरच कुठे जायचे तेथे जाईन,’ असा तिथल्या लोकांचा देशाभिमान आहे.
कडव्या देशाभिमानी इस्रायलने हमासला नष्ट करण्याची शपथ घेतली असेल तर हमास नष्ट होणे आता निश्चित आहे. परंतु, लढाईत निरपराध पॅलेस्टिनीही बळी पडत आहेत. गाझामध्ये राहणारे लाखो लोक कुठे जातील? आतापर्यंत केवळ हवाई हल्ले झाले आहेत. फाॅस्फरस बॉम्बचा वापर झाला आहे. इस्रायली सेना जेव्हा गाझा पट्टीतील जमिनीवर चाल करून जाईल तेव्हा परिस्थिती काय असेल? पॅलेस्टाइनसाठी हा अमानुष अशा संहाराचा काळ आहे. हमास, हिजबुल्ला, आयएस, अल कायदा, बोको हराम, तालिबान अशा भयावह दहशतवाद्यांना जन्माला घालणारी मानसिकता याला जबाबदार आहे. धर्माच्या नावावर संपूर्ण जगावर राज्य करण्याचे दिवास्वप्न या संघटना पाहतात. 

आपले राज्य संपूर्ण जगावर असेल असे हमासच्या प्रमुखाने म्हटले आहे. अमेरिका किंवा चीनसुद्धा जगावर राज्य करण्याच्या गोष्टी कल्पनेतही आणू शकत नाहीत तिथे तुमची काय औकात? हे त्यांना कोण समजावून सांगेल? धर्माच्या नावावर या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, इराण, तुर्कस्थान, सोमालिया आणि न जाणे कित्येक देशांना बरबाद केले आहे. अशा दहशतवादी संघटनांना समूळ नष्ट केले पाहिजे. त्यांना पैसा किंवा शस्त्रास्त्रांच्या रूपाने मदत करणाऱ्यांना लगाम घातला पाहिजे. दहशतवादाविरूद्ध सगळ्या जगाला उभे राहावे लागेल.

Web Title: Daydreaming of ruling on the basis of religion; Hamas did womens nude, killed childrens, Israel have to action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.