तणावमुक्तीच करेल तरुणांची व्यसनमुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 01:03 PM2022-06-26T13:03:03+5:302022-06-26T13:03:50+5:30

87 साली संयुक्त राष्ट्रसंघाने 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन म्हणून प्रतिवर्षी पाळला जावा असा निर्णय घेण्यात आला. त्या निमित्ताने...

De-addiction of youth will only relieve stress | तणावमुक्तीच करेल तरुणांची व्यसनमुक्ती

तणावमुक्तीच करेल तरुणांची व्यसनमुक्ती

Next

डॉ. अजित मगदूम, सामाजिक कार्यकर्ते, मुंबई -

युक्त राष्ट्र संघाने १९६१, १९७१ तसेच १९८८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा भरवल्या होत्या. त्यानंतरही १९९८ व २०१६ या दोन वर्षीही विशेष अशा परिषदा भरवल्या त्यात मुख्यतः  अमलीपदार्थांची मागणी व पुरवठा कमी करण्यावर भर देण्यात आला. परंतु झाले याउलट. अमली पदार्थांच्या विविध  देशातल्या वापराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.  भारताच्या संविधानातील कलम ४७ मध्ये म्हटल्याप्रमाणे अमली पदार्थांवर नियंत्रण आणि बंदी आणण्याबाबत देशाची जबाबदारी असल्याचे म्हटल्याने तसेच भारत हा आंतरराष्ट्रीय करारावर सही करणारा एक देश असल्याने भारत सरकारने सुरुवातीला मागणी आणि पुरवठा कमी करणे तसेच उपचाराची व्यवस्था करणे या त्रिसूत्रीवर काम करण्याचे निश्चित केले. परंतु त्याप्रमाणे कारवाई झाली नसल्याने अमली पदार्थांचे सेवन व व्यापार जोर धरू लागला. भारतात अफू,गांजा हेराॅइन हे तीन महत्त्वाच्या अंमली पदार्थांच्या वापराचे प्रमाण सर्वाधिक असून मेथामेफेटाइनचे  प्रमाण वाढले आहे. ड्रग इंजेक्ट करण्याचे प्रमाणही भारतात खूप मोठं आहे.  

खरेदी-विक्री
अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री  व्यवहाराची पद्धत आता हायटेक झाली आहे. आता समोरासमोर येऊन  पेडलर्स मार्फत खरेदी करणं कमी झालं आहे. डार्कनेट, मोबाईल मेसेंजर यांच्याशी ऑनलाईन संपर्काद्वारे व्यवहार होत आहेत. पैसेही बिटकॉइन या आभासी चलनाद्वारे दिले जातात. पदार्थ पोचवण्यासाठी कुरियर सेवा आहेच. म्हणजे कुणालाही या व्यवहाराचा मागमूसही लागत नाही. केवळ देशांतर्गत नव्हे, तर इतर देशातही असेच व्यवहार होतात.  

अनेक प्रतिबंधित औषधांतून अमली पदार्थ वेगळे करण्याचे धंदेही सुरू आहेत. डॉक्टरांकडून औषध चिट्ठी घेऊन देशातील अनेक ठिकाणाहून एकाच औषध चिठ्ठीद्वारा ही प्रतिबंधित औषधे गोळा केली जातात व त्यातून अमली पदार्थ किंवा प्रतिबंधित रसायने वेगळी करून पुन्हा ड्रग निर्मिती केली जाते. या सगळ्या उच्च तंत्रज्ञानाने आता ग्राहक व विक्रेता यांचा कुठेही सरळ संबंध नसल्याने त्यांना शोधून काढून कायदेशीर कारवाई करणे अवघड झाले आहे अलीकडेच गुजरात मधील मुंद्रा बंदरात 21 हजार कोटींचे हीरोइन साबण वड्याच्या रूपाने अफगाणिस्तानातून आलेले पकडून ते जप्त करण्यात आल. हे हेरॉईन चेन्नई येथील एका ट्रेडिंग कंपनीने आयात केले होते अशा पद्धतीने अमली द्रव्यांचा आपल्या देशात सुळसुळाट वाढल्याने तरुण पिढी त्याची शिकार बनत असल्याचे चित्र आहे. 

व्यसनाची कारणे 
-  बेरोजगारी. -  नोकरीत कामाचे वाढलेले तास.
-  मित्रांचे दडपण. -  व्यसन जन्य पदार्थांची सहज उपलब्धता. -  प्रसिद्ध चित्रपट कलावंतांकडून होणाऱ्या  छुप्या जाहिराती. -  कुटुंबातला दुरावा व ताण तणाव.
-  पालकांचा पाल्यांशी अभ्यासाव्यतिरिक्त संवादाचा अभाव. -  महामारी मुळे ओढवलेले आर्थिक प्रश्न. आई-वडिलांचे तणावपूर्ण संबंध. 

उपाय काय?
पालकांनी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण वेळ दिला पाहिजे. आज मुलांना पालकांचा सहवास पुरेसा मिळत नाही. पालक घरात असले तरी मोबाईलवर त्यांचाही बराच वेळ जाताना दिसतो. त्याऐवजी त्यांनी मुलांशी  गप्पा, मौजमजा, खेळ विनोद यात वेळ घालवला तर घरातलं वातावरण ताजेतवाने उत्साही व तणावमुक्त होण्यास  मदत होईल. प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते संबंध असणे गरजेचे आहे.
शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य व्यवस्था समाजसेवी संस्था इ. सर्वांनी मिळून ठोस उपाययोजना आखून त्याची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजेत. 
 

Web Title: De-addiction of youth will only relieve stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.