प्रिय फँटम, तुझं बलिदान वाया जाणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 08:58 AM2024-11-02T08:58:43+5:302024-11-02T08:59:12+5:30
अखनूर येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी दोन हात करताना ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’ युनिटचा लाडका फँटम गोळीबारात शहीद झाला.. त्यानिमित्ताने!
- रवींद्र राऊळ
(मुक्त पत्रकार)
जम्मू-काश्मीरसारख्या सीमावर्ती भागात नियंत्रणरेषेवर अतिरेक्यांशी कडवी झुंज देणाऱ्या भारतीय लष्कराच्या ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’ युनिटमधील कुणीही यंदा दिवाळी साजरी करत नाहीये. कारण प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांना पुरेपूर साथ देणारा के. नाइन युनिटमधला साडेचार वर्षांचा त्यांचा लाडका लष्करी श्वान फँटम अखनूर येथे अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झाला आहे. त्याचं वीरमरण सर्वांनाच चटका लावून गेलं आहे.
मिरत इथल्या श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सव्वादोन वर्षे वयाचं बेल्जियम मेलिनोइस प्रजातीचं हे रुबाबदार पिलू वर्ष २०२० मध्ये भारतीय लष्करात दाखल झालं होतं.
जंगलासह अतिदुर्गम भागात आपले प्राण पणाला लावत हा श्वान आजवर अतिरेक्यांच्या कारवायांपासून भारतीय लष्कराच्या जवानांना वाचवत आला होता. अतिरेक्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटकं शोधून भारतीय लष्कराचा मार्ग निर्धोक करून देणं हे त्याचं मुख्य काम. ते पार पडताना त्याला ना कुठल्या पदकाची अपेक्षा, ना कुठल्या शाबासकीची. त्याला ठाऊक होतं ते फक्त आपल्यावर सोपवलेली कामगिरी एकही क्षण वाया न दवडता फत्ते करायची इतकंच. यावेळी अखनूर येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांशी दोन हात करताना अतिरेक्यांच्या काही गोळ्यांनी फँटमचा वेध घेतला.
गेल्याच वर्षी केन्ट या सहावर्षीय श्वानाचा राजौरी येथील चकमकीत आपल्या हँडलरला वाचवण्याच्या प्रयत्नात असाच मृत्यू झाला होता. तिरंग्यात लपेटलेल्या केन्टला अखेरची सलामी देताना कणखर लष्करी अधिकाऱ्यांना अश्रू रोखणं कठीण जात होतं. तब्बल नऊ धाडसी मोहिमांमध्ये केन्टने शेकडो जवानांचे प्राण वाचवले होते. नेहमीच बेडरपणे सर्वांत पुढे धावण्याची सवय असलेल्या केन्टला अखेरच्या मोहिमेत अतिरेक्यांच्या गोळ्या झेलाव्या लागल्या.
तीव्र घाणेंद्रियांची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या या श्वानांना किमान दहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं की, ते इतके कमालीचे तयार होतात की, मानव अथवा कुठलीही अत्याधुनिक यंत्रं त्यांच्यासमोर कुचकामी ठरतात.
लष्करात या श्वानांना गस्त घालणं, ‘आयईडी’सह स्फोटके हुंगून ओळखणं, अतिरेक्यांनी जमिनीखाली पेरलेले भूसुरुंग हुडकणं, अमली पदार्थ शोधणं, हिमस्खलनाचा ढिगारा शोधणं अशी ड्यूटी सोपवली जाते. आपली सेवा ते इतक्या मनापासून बजावतात की, असंख्य जवानांचे प्राण वाचवून निमूटपणे आपल्या हँडलरकडे जाऊन बसतात. आपण काय पराक्रम केला हे त्यांच्या गावीही नसतं. लष्करासह पोलिसांसारख्या तपास यंत्रणांचं मोहिमेदरम्यान या श्वानांशिवाय पानही हलत नाही. जवानांचं या श्वानांशी एक भावनिक नातंच तयार होतं. आजारी पडलेल्या श्वानाची काळजी घेत कुटुंबातील व्यक्तीसारखी शुश्रूषा त्यांच्या हँडलरकडून केली जाते.
अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर आपलं कर्तव्य पार पाडून प्राण सोडणाऱ्या अशा श्वानांची परंपरा मोठी आहे. दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्येच शोधमोहिमेत भाग घेताना दोन वर्षांचा ‘एक्सेल’ हा लष्करी श्वान मृत्युमुखी पडला होता. दफनविधीपूर्वी त्याला लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर काही महिन्यातच ‘झूम’ अतिरेक्यांच्या गोळीबारात शहीद झाला. ‘मानसी’ या श्वानाला घुसखोर अतिरेक्यांना रोखताना आपले प्राण गमवावे लागले. त्याची मरणोत्तर युद्ध सन्मानासाठी निवड करण्यात आली.
लष्करी श्वानांप्रमाणेच पोलिसी श्वानही कामगिरीत अजिबात मागे नाहीत. मार्च १९९३ मध्ये दाऊद इब्राहिमच्या हस्तकांनी मुंबईत पेरलेले स्कूटर आणि कारबॉम्ब हुडकून ‘जंजीर’ या श्वानाने असंख्य मुंबईकरांचे प्राण वाचवले होते. आपल्या कारकिर्दीत अनेक शस्त्रे आणि स्फोटके शोधण्यात मुंबई पोलिसांना मदत करणारा ‘जंजीर’ मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत झाला होता. ‘जंजीर’चं २००२ मध्ये वयाच्या आठव्या वर्षी हाडाच्या कर्करोगाने निधन झालं. आजही मुंबईकर त्याचा स्मृतिदिन साजरा करतात. स्फोटकं शोधून अथवा अमली पदार्थ हुडकून असंख्य नागरिकांचे प्राण वाचविणारे श्वान कालांतराने असाध्य विकारांनी ग्रस्त होतात. घातक रसायनांनी तयार केलेली स्फोटकं हुंगून हुंगून त्यांची फुप्फुसं निकामी होतात किंवा कर्करोग गाठतो. हे ठाऊक असतानाही श्वानांची मदत घेणं सध्या तरी थांबवता येत नाही, हा नाइलाज आहे. जन्मजात असलेली जाणीवच त्यांना मृत्यूच्या दारी घेऊन जाते. यावर दुसरा काही वैज्ञानिक पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण तोवर आपल्या सुरक्षेची मदार या मुक्या प्राण्यांवरच आहे.