प्रिय प्रशांत दामले, कृपया इकडे लक्ष द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 09:04 AM2023-05-20T09:04:32+5:302023-05-20T09:06:16+5:30
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्याने तुमच्यावर ‘हाऊसफुल्ल’ प्रेम करणारे नाट्यरसिक आणि नाट्यकर्मींच्या अपेक्षा वाढल्या आहेत!
दत्ता पाटील, नाट्यलेखक -
प्रिय प्रशांत दामले, सप्रेम नमस्कार.
नाट्य संमेलनं आणि सरकारीछाप चारदोन स्पर्धा हे काम वगळले, तर उरलेले महिने केवळ ‘एक भांडकुदळ राजकीय अड्डा’ एवढीच प्रतिमा हल्ली कसोशीने निर्माण केलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन! या संस्थेविषयीची एकूणच आस्था आणि उपयोगिता संपुष्टात येत चालली आहे की काय, याबद्दल शंका घ्यायला भरपूर वाव स्वत: या संस्थेनेच निर्माण केलेला असताना नाट्य परिषदेची सूत्रे तुमच्या हाती आली आहेत. संस्थेच्या लोकशाहीकरणातून संस्थेची पाळेमुळे दूरवर पसरतात आणि तिचा पाया भरभक्कम होतो, असे सांगितले जाते. त्यात तथ्यही आहे. परंतु, संस्था ताब्यात आल्यावर तिच्या एकहातीकरणाला बळ देण्याचाच रिवाज हल्ली आहे. त्याला नाट्य परिषद अजिबात अपवाद नाही.
काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करावेसे वाटतात, एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीत नाट्य परिषदेची आवश्यकता किती आहे? ती कुठे आहे? नाट्य परिषद नसेल, तर मराठी रंगभूमीचं असं काय बिघडेल? मराठी नाटक दर दशकानंतर कात टाकतं नि नवं होत राहतं. मराठी रंगभूमीवरील प्रयोगशीलता अव्वल दर्जाची आहे. मराठी नाटकाच्या या आजच्या समृद्धीत नाट्य परिषदेचा काय वाटा आहे? मराठी नाटकाच्या कथित दर्जाशी किंवा कथित पिछेहाटीशी या महान म्हणून लादलेल्या संस्थेचा काहीच संबंध नसेल, तर या संस्थेचे हेतू, उद्दिष्ट्ये आणि कामाची दिशा याबद्दल पुनर्विचार, पुनर्मांडणी करण्याची संधी आणि क्षमता आपल्यामध्ये आहे, असं मी मानतो.
‘मराठी रंगभूमी’ वगैरे संज्ञा पुणे, मुंबईपलीकडे फार पोहोचलेली नाही, हे सत्य स्वीकारलं पाहिजे. नाट्य परिषदेची पाटी कोरी करण्याचं महत्त्वाचं काम तुम्हाला करावं लागेल. वरवर दिसणारं विकेंद्रीकरण नीट तपासून पाहावं लागेल. नाशिक, पुणे, नागपूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर इत्यादी प्रमुख शहरांतील अनेक पदाधिकारी परिषदेच्या ‘मुख्य शाखेत समाविष्ट’ असल्याच्या ग्लॅमरपोटी किंवा हळूहळू कमावलेल्या राजकीय निर्ढावलेपणातून नाट्य परिषदेशी संलग्न राहण्यासाठी धडपडत राहतात. ते पोहोचतात, पण नाटक त्यांच्या शहराच्या पलीकडे पोहोचत नाही. नाट्य संमेलनांचं आयोजन, एकांकिका स्पर्धांचं आयोजन यास जर कर्तबगारी आणि संस्कृतीचे संचित वगैरे म्हटलं जात असेल, तर लग्न सोहळ्यांपासून राजकीय पहाट पाडवे वगैरे यांचं उत्कृष्ट आयोजन करणाऱ्या इव्हेंट कंपन्यांना किंवा राजकीय पक्षांनाही सांस्कृतिक दूत म्हणून ओळख मिळायला हवी ! तुमच्यासारख्या अत्यंत यशस्वी व्यावसायिक नाट्यधर्मीने या परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्याने तुमच्यावर ‘हाऊसफुल्ल’ प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम नाट्यरसिक आणि नाट्यकर्मींच्या मनात परिषदेबाबत आस्था निर्माण होण्यास नक्कीच जागा आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना खरं तर नाट्य परिषदेसारख्या वादाने ग्रासलेल्या संस्थेची सूत्रं हाती घेणं ही मोठी रिस्कच! तुम्ही लोकशाही मार्गाने निवडून आलात ही समाधानाची बाब असली, तरी नाट्य परिषदेत हल्ली कमालीचा वाढत चाललेला राजकीय हस्तक्षेप नाट्य परिषदेची मूळ ओळख आणि हेतूंना तिलांजली देणारा ठरू शकतो. अर्थात, हा हस्तक्षेप तुमच्या कारकिर्दीतला मोठा धोंडा ठरतो, की तुम्ही चातुर्याने, मुत्सद्दीपणाने त्याचा नाटकाच्या भल्यासाठी वापर करून घेता, हे येणारा काळच ठरवेल.
प्रशांतजी, तुम्ही रंगभूमीवर भरपूर काम केलं आहे. तुम्ही अंगभूत गुणवत्तेतून अतिशय शिस्तीने, मेहनतीने मोठं यश मिळवलं आहे, यात वादच नाही. आता नव्या जबाबदारीत तुमच्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची तुम्हाला नक्कीच कल्पना असेल. तुमच्या मनात काहीतरी योजना असतील. काही ब्लूप्रिंट असतील. ही संस्था लोकाभिमुख व्हावी, यासाठी काही प्रकल्प असतील. ते तुम्ही करालच, पण तरीही काही अपेक्षा आहेतच, नाटकाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामीण भागापर्यंत चळवळ पोहोचावी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोककलांच्या जतनासाठी, दस्तऐवजीकरणासाठी प्रयत्न व्हावेत. लोककलांचा अंतर्भाव असलेल्या नाट्यस्पर्धा व्हाव्यात. नाट्य संमेलनांच्या भरमसाठ खर्चावर नियंत्रण ठेवून संमेलनातील आशय समृद्ध कसा करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रायोगिक रंगभूमीच्या विकासासाठी, मदतीसाठी अटींचं जंजाळ नसलेल्या अनुदान योजनांसारख्या उपक्रमांचा विचार केला जावा. समकालीन लेखक-दिग्दर्शकांची टीम तयार करून जिल्हा, तालुका पातळीवर शाळा महाविद्यालयात नाटकाबाबत प्रेक्षक घडविण्याच्या कार्यशाळा आयोजित व्हाव्यात. जिल्हा, तालुका नि गावपातळीवर लेखन स्पर्धा घेतल्या तर त्यातून नवनव्या गोष्टी रंगभूमीला मिळतील.
- हे असे विविध संस्कृती, लोकभाषांमधले, स्थानिक मातीचा गंध असलेले छोटे प्रवाह मिळूनच रंगभूमी समृद्ध होत असते. तशा अपेक्षा खूपच आहेत, पण तुम्हीही तितके सशक्त आहातच की! कोरोनाकाळात नाटकासाठीची तुमची तगमग, बॅकस्टेज आर्टिस्टसाठी तुम्ही निभावलेली जबाबदारी महाराष्ट्राने अनुभवली आहे. या कामाला नव्या जबाबदारीने नवं बळ मिळो! कार्यालयीन, प्रशासकीय, शासकीय, राजकीय पातळीवरच्या लढाया लढताना रंगकर्मींच्या अपेक्षांचा विसर पडू नये, या सर्व स्तरांवर तुम्हाला ‘हाऊसफुल्ल’ यश लाभावं ही सदिच्छा.
dattapatilnsk@gmail.com