मृत्युंजयची पन्नाशी
By Admin | Published: April 2, 2017 01:18 AM2017-04-02T01:18:52+5:302017-04-02T01:18:52+5:30
शिवाजी सावंतांची पहिलीच कादंबरी -‘मृत्युंजय’ची लोकप्रियता वादातीत आहे. आजही कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात ‘मृत्युंजय’ नाही असं होऊच शकत नाही
- रविप्रकाश कुलकर्णी
शिवाजी सावंतांची पहिलीच कादंबरी -‘मृत्युंजय’ची लोकप्रियता वादातीत आहे. आजही कुठल्याही पुस्तक प्रदर्शनात ‘मृत्युंजय’ नाही असं होऊच शकत नाही. पुस्तक प्रदर्शनात ‘मृत्युंजय’ला मागणी नाही असं कादंबरी प्रकाशित होऊन पन्नास वर्षे झाली तरी झालेलं नाही! मराठी गं्रथजगतात ही अतिदुर्मीळ गोष्ट आहे, असं एरव्ही सरसकट विधान करतात तसं मी म्हटलं असतं.
पण ‘मृत्युंजय’चं आणखी एक वेगळेपण सहसा कुणी नोंदवत नाही. ते सांगायला हवं. आज बाजारात दोन वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या ‘मृत्युंजय’च्या आवृत्त्या उपलब्ध आहेत. दोघेही प्रकाशक या पुस्तकाचा कॉपीराईट आपल्याकडेच आहे असा दावा करतात. याबाबत कोर्ट-कचेऱ्यादेखील झालेल्या आहेत. पण प्रश्नाची तड लागलेली नसावी. त्यामुळे दोन्ही प्रकाशक ‘मृत्युंजय’ प्रकाशित करत आहेत हे मात्र खरं.
विशेष म्हणजे या दोन्ही प्रकाशकांच्या पुस्तकाच्या किमती वेगवेगळ्या आहेत, तरीही दोघांच्या पुस्तकाच्या विक्रीवर अजिबात परिणाम झालेला नाही! अशा दोन प्रकाशकांच्या दोन आवृत्त्या शेजारी-शेजारी मांडलेल्या दिसतात. त्याबाबत पुस्तक विक्रेत्यांना विचारताच ते सांगतात, ‘‘वाचकांनी कुठली आवृत्ती घ्यायची हे आम्ही त्या वाचकांवरच सोपवतो.’’
या जोडीला आणखी एक सांगायला हवं ‘मृत्युंजय’ची पायरेटेड कॉपी- अनधिकृत प्रकाशित झालेली आवृत्ती राजरोसपणे मिळते हे वेगळेच..
तरीसुद्धा ‘मृत्युंजय’च्या मागणीला घट नाही.
मराठी ग्रंथजगतात ही अशी एकमेव घटना आहे, असेही ‘मृत्युंजय’चं वेगळेपण सांगता येईल. पण त्याच वेळेच मराठी समीक्षकांनीच ‘मृत्युंजय’ची फारशी दखल घेतलेली नाही.
अर्थात लोकप्रियता आणि मान्यता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे शिवाजी सावंतांचे एक प्रशंसक डॉ. सागर देशपांडे यांचे मत नोंदवतो - ते लिहितात,
‘१९७४ ते १९९९ यादरम्यान ‘मृत्युंजय’चे हिंदी, बंगाली, गुजराती, राजस्थानी, मल्याळम्, कन्नड आणि इंग्रजी अशा देशी-विदेशी भाषांमध्ये सशक्त अनुवाद झाले आहेत. प्रा. प्रतिभा दवे यांनी गुजराती भाषेत केलेल्या दोन आवृत्त्या १९९०मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्याला गुजरात राज्य शासनाच्या आणि दिल्लीच्या साहित्य अकादमीचाही पुरस्कार लाभला आहे. मात्र मूळ मराठी भाषेतील कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला नाही. कदाचित निवड मंडळातल्या काही परीक्षकांचीच आपल्या माणसांना मोठं न होऊ देण्याची खेकडा वृत्तीही त्याला कारणीभूत असावी. हाच अनुभव भारतीय ज्ञानपीठाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवडीच्या वेळीही आला. भारतातील प्रख्यात विचारवंत डॉ. करण सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी या ग्रंथाची शिफारस केली असतानाही महाराष्ट्रातल्याच एका मराठी साहित्यिकानं मात्र नकाराची भूमिका घेतली होती. एक परीक्षक म्हणून त्यांच्या मतस्वातंत्र्याचा मान राखूनसुद्धा प्रश्न पडतो की, मानवी द्वेष भावनेचा हा सर्वाधिक संसर्ग मराठी माणसांनाच इतका का होत असावा?
डॉ. देशपांडे यांनी एकाच वेळी ‘त्या’ समीक्षकाला आणि तसाच मराठी माणसांना एकाच मापात तोलावं याचं आश्चर्य वाटतं.
पुरस्काराच्या तोलण्यावर ‘मृत्युंजय’चं मोठेपण अवलंबून आहे काय? अशा वेळी ‘मृत्युंजय’संदर्भात जे काही टीकाकारांनी आक्षेप घेतलेले आहेत त्याचा प्रतिवाद करायला कोण पुढे कसं येत नाही?
वाङ्मयीन महत्ता केवळ आग्रहीपणामुळे उभी राहत नसते आणि उभी राहिल्यास म्हणण्यापेक्षा उभी राहिली आहे असं वाटलं तरी त्याचं अस्तित्व फार काळ टिकत नाही. युगप्रवर्तक म्हणवून घेणाऱ्या लेखकाचं अल्पावधीत काय झालं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण म्हणून त्या लेखकाला कमी लेखण्याचं काहीच कारण नाही. त्यानं त्याचा काळ गाजवला; मात्र खरं ही गोष्ट शिल्लक राहतेच ना!
अशावेळी खुद्द शिवाजीरावांनी या गोष्टीचा मागोवा घेताना म्हटलंय... ‘हजारो वर्षे अंधारात गाढले गेलेले महारथी, महादानी कर्णाचे अंतर्विश्व ‘मृत्युंजय’मध्ये रसाळ, लालित्य शैलीत व्यक्त झाले आहे. म्हणूनच वाचकांनी ते स्वीकारले आहे. प्रत्येक मानवाठायी कुठं ना कुठं अंशरूपानं कर्ण असतो. त्याला ‘मृत्युंजय’ नकळत हळुवार हातानं स्पर्श करतं. कर्णाची अंधारातील बाजू ‘मृत्युंजय’ने उजेडात आणली.’
बहुसंख्य वाचकांना ‘मृत्युंजय’चं आकर्षण अजूनही वाटतं त्याचं हेदेखील कारण असावं. काय ते असो, असं भाग्य पन्नास वर्षांपेक्षा जास्त लाभणाऱ्या किती कलाकृती आहेत?
हे वेगळेपण मान्य करायला कुणाची आडकाठी नसावी.’