कुट्टी यांच्या निधनाने भारत व पाकिस्तान मैत्रीचा दुवा निखळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:25 AM2019-08-29T05:25:17+5:302019-08-29T05:25:43+5:30
गेल्या शनिवारी प्रदीर्घ आजाराने कुट्टीसाहेबांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
जगातील कोणत्याही देशात गेलात, तर तुम्हाला तिथे एखादा तरी मल्याळी नक्कीच भेटेल, असं म्हणतात. मग पाकिस्तान तरी याला कसा अपवाद असेल? आजही पाकिस्तानात चारेक हजार मल्याळी लोक राहतात. त्यात सर्वात वेगळे होते बी. एम. कुट्टी. आई, वडील, भाऊ , बहीण या साऱ्यांना सोडून ते १९४९ साली पाकिस्तानात गेले आणि तिथेच स्थायिक झाले.
गेल्या शनिवारी प्रदीर्घ आजाराने कुट्टीसाहेबांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल पाकिस्तान व भारतात अनेकांनी दु:ख व्यक्त केले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनीही शोक व्यक्त केला. दोन्ही देशांतील अनेक वृत्तपत्रांत त्यांच्याविषयी लेख प्रसिद्ध झाले. गेल्या महिन्यातच मी कराचीत त्यांना भेटलो होतो. प्रकृती चांगली नसतानाही त्यांचे लेखन, वाचन सुरू होते. ते राजकीय कार्यकर्ते असल्याने सतत लोक त्यांना भेटायला येत. त्यांच्याशी ते तासन्तास गप्पा मारत.
पाकिस्तानातील साम्यवादी पक्षांचे बहुतांशी जाहीरनामे व पक्षाचे कार्यक्रम कुट्टी यांनी लिहिले. भारत व पाकिस्तानात मैत्री व्हावी, यासाठी निर्माण झालेल्या पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉस पीस अँड डेमॉक्रसीचे ते संस्थापक सदस्य होते.
कुट्टी हे साम्यवादी व लोकशाहीवादी. अयुब खान, भुट्टो व झिया उल हक यांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं. ते सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. पण अयुब खान यांनी १९५४ साली पक्षावर बंदी घातली. पुढे १९७0 च्या दशकात बलुचिस्तानचे गव्हर्नर मिर यांचे कुट्टी राजकीय सचिव होते. पण भुट्टो यांनी बलुचिस्तान सरकार बरखास्त केले. तेव्हाही कुट्टींना तुरुंगात पाठवण्यात आले. झिया उल हक हे पाकिस्तानचे सर्वात क्रूर शासक मानले जातात. त्यांनी राजकारणात धर्माचा सर्वाधिक उपयोग केला. झियांविरोधात मुव्हमेंट फॉर रिस्टारेशन फॉर डेमॉक्रसीची सुरुवात झाली. त्यात कुट्टी आघाडीवर होते.
मुंबई प्रेस क्लब व कराची प्रेस क्लब यांचे मैत्रीचे संबंध आहेत. मुंबई प्रेस क्लबचे शिष्टमंडळ २0११ मध्ये कराचीला जाणार होते. तेव्हा कुट्टी केरळमध्ये होते. ते या शिष्टमंडळासोबत कराचीला गेले. त्याआधी त्यांनी या पत्रकारांना पाकिस्तानची सारी माहिती दिली. ते पाकिस्तानविषयक एनसायक्लोपीडियाच होते. ते व त्यांचे सहकारी करामत अली यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर लेबर एज्युकेशन रिसर्च या संस्थेच्या होस्टेलमध्ये या शिष्टमंडळाची राहण्याची व्यवस्थाही त्यांनी केली.
त्यांच्या संस्थेचे जे होस्टेल आहे, त्याच्या एका विंगला भारतातील ज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांचे नाव देण्यात आले आहे. निर्मलाताई यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थींचे विसर्जन कुट्टी व करामत अली यांनी पाकिस्तानातील सिंधू नदीत केले होते. कुट्टी यांच्या ‘सिक्स्टी इअर्स इन सेल्फ एक्साइल: नो रिग्रेट्स’ हे त्यांचे आत्मचरित्र सर्वांनी वाचायला हवे. हे नावही सुचविले होते निर्मलाताई देशपांडे यांनीच. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद पत्रकार अरविंद गोखले यांनी केला असून, मराठी पुस्तक पुण्यातील चिनार पब्लिकेशनने ते प्रकाशित केले आहे.
अनेक वर्षे पाकिस्तानात राहूनही बी. एम. कुट्टी पूर्णपणे मल्याळीच होते. त्यांच्या आॅफिसमधील टेबलावर कायम केरळहून आलेली कॉफीच असायची. मागे भिंतीवर मल्याळममधील कॅलेंडर झळकत असे. केरळचे खाद्यपदार्थ व मल्याळम भाषेतील पुस्तके व वर्तमानपत्रे टेबलावर दिसायची. पाकिस्तानात राहत असूनही त्यांचे केरळशी, आपल्या मायभूमीशी असलेले ऋणानुबंध कायम होते, याचा तो पुरावाच म्हणता येईल.
काही वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. वय अधिक असले तरी त्यांनी रेल्वे प्रवासाबद्दल तक्रार केली नाही. नागपूर, पुणे, जळगाव आदी ठिकाणी अनेकांना भेटलो. प्रत्येकाला ते दोन देशांत मैत्रीचे संबंध का हवेत, असे समजावून सांगत. इतरांची मते आवर्जून ऐकून घेत. भारत-पाकिस्तान संबंध मैत्रीचे व्हावेत, यासाठी त्यांनी प्रचंड लिखाण केले. दोन देशांतील चर्चेतूनच संबंध सुधारतील, यावर कुट्टीसाहेबांचा विश्वास होता. पाकिस्तानातील पीपल्स पार्टी, मुस्लीम लीग, अवामी नॅशनल पार्टी तेहरिक-ए-इन्साफ, मुत्ताहिद कौमी मुव्हमेंटसारख्या सर्वच पक्षांतील नेत्यांची व कार्यकर्त्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. सर्वांना त्यांच्याविषयी आदर होता.
बी. एम. कुट्टी यांच्या मृत्यूने भारत-पाकिस्तानात मैत्रीसाठी काम करणारा कार्यकर्ता दोन्ही देशांनी गमावला आहे. त्यांचे विचार मात्र प्रेरणा देत राहतील.
जतीन देसाई । ज्येष्ठ पत्रकार