विवाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:34 AM2018-03-12T00:34:42+5:302018-03-12T00:34:42+5:30

माणूस कुणीही असो तो चालतो त्याच्यासोबत विवादही चालत असतात. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. केवळ राजकारण नाही. ते तर विवाद्य विषयांसाठी कायम असतं. खूपवेळ विरोधक म्हणून काम केले आणि अचानक सत्ताधारी झालं तर होणारी पंचाईत मोठी.

 Debate | विवाद्य

विवाद्य

Next

- किशोर पाठक

माणूस कुणीही असो तो चालतो त्याच्यासोबत विवादही चालत असतात. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. केवळ राजकारण नाही. ते तर विवाद्य विषयांसाठी कायम असतं. खूपवेळ विरोधक म्हणून काम केले आणि अचानक सत्ताधारी झालं तर होणारी पंचाईत मोठी. विरोधाची सवय एवढी मोठी की आपण स्वकीयाच्या विरोधात हात वरती करतोय हेही कळत नाही. हेच साहित्य, कला, संगीत, क्रीडा, सहकार सर्वच क्षेत्रांना लागू असते. एक चांगली कलाकृती निर्माण करणारे दोन शत्रू निर्र्माण करतो. एक मत्सरी आणि दुसरा क्रांतिकारी. कधी कधी सर्वसामान्य परवडला. तो सरळ हात झटकून मोकळा होतो.
म्हणजे आपल्याला कळत नाही बुवा तुमचं हा त्याचा परवलीचा वाक्प्रचार. खरंतर सुटण्याचा प्रकार, परंतु नवीन काय कलाकृती केलीय हे झटून, समजून घेण्याची इच्छा असणारा खरा! तो मूळ विषयाशी भिडण्याचा प्रयत्न करतो. ही झटापट प्रेक्षणीय असते. अर्थात खरा कलाकर ती कलाकृती समजून सांगण्याच्या फंदात पडत नाही. तो करून मोकळा होतो. पण त्याचेही दोन अर्थ होतात. काय माणूस आहे? काय केलं तेच सांगता येत नाही. मग ही कलाकृती तरी त्याची आहे का? हा प्रश्न येतो. खरंतर आपण काढत असलेली प्रत्येक रेषा, रंग, थेंब, आकार, शब्द, अक्षर समजून सांगता यायलाच हवं. आत्ता ही मी तान घेतली, आलाप घेतला, पण तो का? त्याचीही जागा मी का निवडली हे सांगता यायला हवं. हा राग मी याचवेळी का गातो याचं शास्त्र आहे. एखादी कविता आहे त्यातील अमुक एक शब्द मी का वापरला आणि तोच का वापरला याची खूप काहीतरी खूणगाठ म्हणून मनात असते. नव्हे प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत ती असते. एखादा गोलंदाज आपली स्टाईल बदलतो किंवा अमुक एका संघाशी खेळताना तो गोलंदाजीचा प्रकार बदलतो तसे असेल तर प्रत्येकाला ते करण्याचा अधिकार आहे.
नाटक फक्त लांबी-रुंदीत नसतं. ते खरंतर उंचीत असतं. खरा दिग्दर्शक नाटकाला व्दिमितीत पहातच नाही. तो त्रिमितीत घुसतो. अवकाशात घुसतो. चौथे परिमाण शोधतो. तो या परिमाणाला भिडला. खरंतर खेटला तो नवीन काही करू शकला. ज्याला हे परिमाण गवसलं तो नक्कीच विवाद्य. कारण तुमचे रूढ संकेतांना दूर करण्याचं धाडस त्याच्यात आहे. तुमच्या हातात असलेल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच साधनांचा वेगळा उपयोग तो करतो, पण त्याचे अर्थ बदलून, उपयोग बदलून. असा विचारवंत कलाकार कायम पुढेच पाहतो. तो आपल्यापुढे चार पावलं असतो. मग शास्त्रज्ञ, विचारवंत साहित्यिक असो. भले तो विवाद्य होत जातो. नव्हे तो विवाद्य नाही झाला तर तो प्रगतिशील, विकासशील लेखक कलाकार होऊच शकत नाही. बघा! फक्त विवाद्य जातीवंत हवा फॅडिस्ट नको!

Web Title:  Debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या