पाणी पातळीत घट; फ्लोरोसिसचा धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:49 PM2018-11-12T20:49:33+5:302018-11-12T20:49:49+5:30
महाराष्ट्रात विशेषत: दुष्काळाची स्थिती आहे. हिवाळ्याच्या प्रारंभालाच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.
- धर्मराज हल्लाळे
महाराष्ट्रात विशेषत: दुष्काळाची स्थिती आहे. हिवाळ्याच्या प्रारंभालाच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा उपसा विंधन विहिरीतून होणार आहे. अनेक ठिकाणी पाणी पातळी खोलवर गेली आहे. परिणामी अधिक खोलीवरच्या पाण्याचा उपसा करणे म्हणजेच फ्लोरोसिसचा धोका वाढविणे आहे. महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये घातक प्रमाणात फ्लोराईड आढळलेले आहे. जेव्हा जेव्हा पाणी पातळीत घट होते त्या त्या वेळी अधिक खोलवर बोअर घेतले जातात. त्याच्या पाण्याची तपासणी होत नाही. सर्रास टँकरद्वारे बोअरचे पाणी पुरवठा केले जाते. ज्यामध्ये फ्लोराईड हे घातक प्रमाणात अर्थात १.५ पीपीएम पेक्षा जास्त असते.
मानवी शरीराला १.५ पीपीएमपर्यंत फ्लोराईड उपयुक्त ठरते. परंतु त्यापेक्षा अधिक प्रमाण असेल तर मानवी शरीराला इजा पोहोचते. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये घातक प्रमाणात फ्लोराईड आढळले आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात खोलवरच्या जलसाठ्याचा उपसा करून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सगळ्यात मोठी अडचण आहे ती पाणी तपासणीची. दुष्काळाचे चटके बसत असताना पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य दिले जाते. टँकरने आणलेले पाणी कोठून आणले आहे आणि ते कसे आहे याची तपासणी केली जात नाही.
१.५ पीपीएमपेक्षा अधिक फ्लोराईड असेल तर पहिल्यांदा दातांवर परिणाम होतो. दात पिवळेजर्द होतात. तपकिरे ठिपके पडतात. पाण्यात अधिक फ्लोराईड असेल तर अक्षरश: दात गळून पडतात. तोंडाचा बोळका होतो. त्याही पुढे जाऊन अनेकांना कायमचे अपंगत्व येते. ज्यामध्ये माणसे कमरेपासून वाकल्याची उदाहरणे आहेत. हाडांचे दुखणे वाढते. फ्लोराईडमुळे होणारा फ्लोरोसिस हा आजार नसून विकार आहे. म्हणजेच तो एकदा झाला की तो दुरूस्त होत नाही, त्याचे व्यंग आयुष्यभर राहते. ज्यामध्ये डेंटल फ्लोरोसिस हा दातांवर परिणाम करतो. ज्याची दुरूस्ती होत नाही. घातक प्रमाणात फ्लोराईड पाण्यात असेल तर स्केलेटल फ्लोरोसिस होतो. ज्यामध्ये हात, पाय वाकडे होणे, हाडे ठिसूळ होतात. महाराष्ट्रात चंद्रपूर व नांदेड जिल्ह्यात याचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल लातूर, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्यातही घातक प्रमाणात फ्लोराईड आढळलेले आहे.
साधारणत: ५0 फुटांपेक्षा खालील पाण्यामध्ये घातक प्रमाणात फ्लोराईड असते. दुष्काळात याची आठवण प्रकर्षाने होते. कारण भूजल पातळी खोलवर जाते. दुष्काळ निर्मूलनासाठी खोलवर विंधन विहिरी घेतल्या जातात. लातूरसारख्या भागात ४०० ते ५०० नव्हे तर ७०० फुटांपर्यंत बोअर आहेत. जितक्या खोलवरचे पाणी तितके घातक फ्लोराईड असण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे पाणी उकळून अथवा नेहमीच्या साधनाने फिल्टर करूनही घातक प्रमाणातील फ्लोराईड कमी होत नाहीत. त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया आहे. शासनाने काही ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत, ज्या अत्यंत तुटपुंज्या आहेत. परंतु, खाजगी बोअरचे नियंत्रण कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी पाणी तपासणी करून घेणे हा उत्तम पर्याय आहे. त्यात अधिक प्रमाणात फ्लोराईड आढळले तर ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. असे पाणी वर्षानुवर्ष पिल्याने कमरेचे, हाडाचे दुखणे वाढते. शारीरिक व्यंग निर्माण होतात. हे परिणाम तत्काळ दिसत नाहीत. त्यामुळे फ्लोरोसिस हा सायलेंट किलर आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा कमी करताना पिण्याचे पाणी योग्य आहे का, हे तपासण्याची नितांत आवश्यकता आहे.
या विषयावर खूपदा लिहून आले. हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल झाली. संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना न्यायाधिकरणाने वॉरंट बजावले होते. विषयाचे गांभिर्य शासनाच्या लक्षात आणून दिले. ज्या ज्या वेळी दुष्काळाची स्थिती निर्माण होते, त्यावेळी उपाययोजनांवर भर दिला जातो. खबरदारीकडे दुर्लक्ष होते.