दीप लक्ष्मी नमोस्तुते..!
By किरण अग्रवाल | Published: November 4, 2021 07:00 AM2021-11-04T07:00:00+5:302021-11-04T07:00:02+5:30
Deep Lakshmi Namostute .. दिपलक्ष्मी नमोस्तुते म्हणत दिपज्योतींच्या प्रकाशाने चहूदिशा उजळूया...
- किरण अग्रवाल
दिवाळीच्या दीपोत्सवाने सारा आसमंत उजळून निघाला आहे. कोरोनाच्या निराशेतून बाहेर पडून आरंभलेल्या नवीन आयुष्याला तेजोमय करणारा हा प्रकाश आहे. जनमानसात दिसून येत असलेला उत्साह, खरेदीसाठीची गर्दी व भेटीगाठीचा वाढलेला सिलसिला हा या आरंभाचा शुभारंभ म्हणता यावा. नवीन आव्हानांना सामोरे जात व बदललेल्या जीवनशैलीला स्वीकारत हा शुभारंभ झाला आहे. भीतीचे सावट झुगारून देत दिवाळीत जो उत्साह दिसून येत आहे तो त्याचाच सूचक आहे. घाबरवून सोडणाऱ्या संकटाच्या वाटेत माणुसकीच्या पणत्या व आत्मविश्वासाचे आकाशकंदील लागताना दिसून येणे, ही समाजाच्या सकारात्मकतेची पावतीच आहे. ही सकारात्मकता, ऊर्जा व उत्साह यापुढील काळातही टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
यंदाची दिवाळी ही कोरोनामुळे ओढवलेले निराशेचे मळभ झटकून टाकणारी आहे. गेल्या वर्षीही दिवाळी कोरोनाच्या सावटात साजरी करावी लागली होती. लॉकडॉउन व तत्सम निर्बंधाना सामोरे जाण्याची ती पहिलीच वेळ होती त्यामुळे समाज मनावर हबकलेपण होते. त्या दडपणात ती दिवाळी गेली, परंतु यंदा याच संकटावर मात करून उभे राहील्याचा आनंद जनमानसात दिसतो आहे. शासनाने वेगाने व सक्षमतेने राबविलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे यासंबंधीचे धाडस एकवटलेले आहे. अर्थात कोरोना अजून गेलेला नाहीच, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे; मात्र त्यामुळे घरात अडकून न बसता लोक खरेदीसाठी बाहेर पडलेले बघावयास मिळत आहेत ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे बाजार ओसंडून वाहत असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखली गेल्याने अर्थव्यवस्थेने उभारी घेतली असून गुंतवणूकदार खरेदीसाठी सक्रिय झाल्याने शेअर बाजारही तेजीत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल १ लाख ३० हजार कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून दुसऱ्यांदा असे सर्वोच्च मासिक कर संकलन झाले. गेले सलग चार महिने जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांहून अधिक होत आहे, यावरून अर्थव्यवस्थेने उभारी घेतल्याचे स्पष्ट व्हावे. कोरोनाचा फटका उद्योग व्यवसायांना बसला असला तरी विविध आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना बोनस दिले असून, शासनानेही कर्मचारी भविष्य निधीवर या आर्थिक वर्षात ८़ ५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेऊन नोकरदारांना दिलासा दिला आहे. राज्य सहकारी बँकेला सप्टेंबर अखेरच्या सहा महिन्यात तब्बल ४०२ कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला असून अन्य वित्तीय आस्थापनांचीही ‘चांगभले'' झाल्याची आकडेवारी समोर येते आहे.
अतिवृष्टीने बरेच नुकसान झाले हे खरे, पण जे अन्नधान्य हाती आले त्याला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने बळीराजाही काहीसा सुखावला आहे. तात्पर्य, आर्थिक अडचणीतून मार्ग काढून व बाहेर पडून दिवाळी खरेदी जोमात सुरू आहे. दिवाळीत पुजल्या जाणाऱ्या लक्ष्मी देवतेच्या प्रसन्नतेची ही चिन्हे ठरावीत.
दिवाळीचे लक्ष्मीपूजन करताना सर्वत्र दिपोत्सव साजरा होत आहे. अंगणा अंगणातील पणत्यांचा प्रकाश हा केवळ परिसरातील अंधारच नव्हे, तर कोरोनामुळे मनामनात ओढवलेली निराशाही दूर करणारा ठरला आहे. तिमिरातून तेजाकडे नेणारा हा उत्सव आहे. या उत्सवाचा आनंद आपल्या पुरता सीमित न ठेवता तो इतरांसोबत वाटून घेणाऱ्यांचे प्रमाणही यंदा वाढलेले दिसत आहे. कोणी रद्दी विकून तर कोणी एक करंजी मोलाची उपक्रम राबवून वाड्या वस्त्यांवरील वंचितांसाठी दिवाळीचा फराळ वाटप चालविले आहे. उघड्या नागड्यांचे अंग झाकण्यासाठी सधनांचे हात पुढे आले आहेत. पिड पराई जाणून घेत तमाच्या तळाशी दिवे लावण्याचे हे प्रयत्न माणुसकीचा जागर घडविणारेच आहेत. सारेच काही संपलेले अगर सरलेले नाही. असंख्य पणत्या मिणमिणत आहेत, चांगुलपणाचा प्रकाश पेरण्यासाठी. या पणत्या लावणाऱ्यांसोबत सामाजिक बळ उभे करूया, कारण संकटांशी लढण्याचा व आव्हाने पेलण्याचा दुर्दम्य आशावाद तसेच माणुसकीचा गहिवर यामागे असून, तोच उद्यासाठीही दिशादर्शक ठरला आहे. तेव्हा, दिपलक्ष्मी नमोस्तुते म्हणत दिपज्योतींच्या प्रकाशाने चहूदिशा उजळूया...