दीपालीच्या आत्महत्येला कारणीभूत जंगली विषवल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 07:11 AM2021-03-29T07:11:20+5:302021-03-29T07:11:57+5:30
Deepali Chavan Suicide Case: घनदाट अरण्यामध्ये वनविभागाच्या भ्रष्ट, सरंजामी वृत्तीच्या विषवल्ली रुजलेल्या आहेत ! तरुण महिला अधिकाऱ्याचा जीव घेणारी ही मुजोरी उखडून फेकली पाहिजे!
- श्रीमंत माने
( कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर)
महाराष्ट्रातील पहिले डिजिटल व्हीलेज म्हणून गाजलेल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील हरिसाल येथे परवा दीपाली चव्हाण नावाच्या वनपरिक्षेत्राधिकारी पदावरील तरुण महिला अधिकाऱ्याने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केली. याच महिन्याच्या सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील लाखनीच्या बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल फाळके यांनीही गळफास लावून आत्महत्या केली. अकाली गेलेल्या या दोघींमध्ये बरेचसे साम्य. दोघीही पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याच्या. या दोन्ही आत्महत्यांनी विदर्भ हळहळला.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी तीन चिठ्ठ्या लिहिल्या. पहिली अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे, दुसरी व तिसरी अनुक्रमे पती व आईला उद्देशून. चार पानांच्या पहिल्या चिठ्ठीत विनोद शिवकुमार नावाच्या आयएफएस अधिकाऱ्याकडून होणारा छळ, वाईट हेतूने वेगवेगळ्या प्रकारे अडवणूक, मानसिक व शारीरिक त्रास आदी तपशील असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर संतापाची लाट उसळली. नागपूर येथून बंगळुरूला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवकुमारला पोलिसांनी रेल्वेस्थानकावर अटक केली. आता तो पोलीस कोठडीत आहे. शासनाने तातडीने त्याला निलंबित केले. रेड्डींची बदली केली; पण एवढे पुरेसे नाही.
वडील व भावाच्या मृत्यूनंतर जिद्दीने शिक्षण पूर्ण करणारी, आईचा आधार बनलेली, राज्य लोकसेवा आयोगातून वनसेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन 'वनराणी' बनलेली, मेळघाटातील धुळघाटसारख्या अतिदुर्गम भागात जंगल रक्षणासाठी रात्रीचा दिवस करणारी, रेल्वेने पळून जाणाऱ्या डिंक तस्करांचा प्रसंगी दुचाकीवर पाठलाग करणारी, वनखात्यात ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखली जाणारी धाडसी तरुण अधिकारी असे आत्मघाताचे पाऊल का उचलते, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. शिवकुमारच्या रूपाने ज्या रानटी मानसिकतेचा, जंगली कायद्याचा व झालेच तर वनखात्यातील सरंजामदारी प्रवृत्तीचा सामना दीपाली चव्हाण यांना करावा लागला, ती विषवल्ली मुळातून उखडून फेकण्याची गरज आहे.
शिवकुमार हा या सरंजामी, ऐशआरामी वृत्तीचा केवळ नमुना आहे. मेळघाट किंवा चंद्रपूर, गडचिरोलीतील घनदाट अरण्यामध्ये काही वर्षे काढलेले कोणीही या भ्रष्ट, सरंजामी वृत्तीच्या सुरस कहाण्या सांगतील. शिवकुमार हे त्या मनमानीचे प्रतीक असते. आपल्या कनिष्ठ महिला सहकाऱ्याला गरोदर अवस्थेत दगडधोंड्यांच्या रस्त्यावर चालविण्याची, त्यातून तिचा गर्भपात घडवण्याला कारणीभूत ठरण्याची, राऊंडच्या निमित्ताने वेळी-अवेळी बोलावण्याची, शिवीगाळ व घालूनपाडून बोलण्याची, अपमानित करण्याची, तिने शरण यावे म्हणून आर्थिक अडवणूक करण्याची मस्ती त्यातून येते.
दीपाली चव्हाण व शिवकुमार यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप ऐका. मस्तीखोर वरिष्ठाच्या हाताखाली त्यांनी कशी नोकरी केली असेल, याची कल्पनाही करवत नाही. अशा मस्तीपुढे मग नोकरदार महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे प्रयत्न फोल ठरतात. विशाखा समित्या नावाच्या उपाययोजनांनी केवळ कागद रंगतात. ज्यांच्याकडून छळ त्यांच्याच हाती समित्यांचे अहवाल, असे कुंपणच शेत खाते. हे थांबविण्यासाठी, आणखी कुणाची दीपाली होऊ नये, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी विशेष तपास पथक नेमून या आत्महत्येच्या मुळाशी जायला हवे.
shrimant.mane@lokmat.com