पराभूत ‘योद्धा’!

By admin | Published: December 13, 2015 01:31 AM2015-12-13T01:31:28+5:302015-12-13T01:31:28+5:30

अत्यंत अस्ताव्यस्त, पसरट, असंघटित, परस्पराशी फारसे साधर्म्य नसणारा आणि निसर्ग व सरकार यांच्या पुढ्यात सतत मान झुकवित राहणारा देशातील शेतकरी वर्ग, कधी काळी

Defeated 'warrior'! | पराभूत ‘योद्धा’!

पराभूत ‘योद्धा’!

Next

- हेमंत कुलकर्णी

अत्यंत अस्ताव्यस्त, पसरट, असंघटित, परस्पराशी फारसे साधर्म्य नसणारा आणि निसर्ग व सरकार यांच्या पुढ्यात सतत मान झुकवित राहणारा देशातील शेतकरी वर्ग, कधी काळी एकत्र येईल आणि सतत पिचत जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आवाज मिळवून देईल, ही कल्पना करणेही अशक्य कोटीतील मानले जाणाऱ्या काळात शरद जोशी यांचा उदय झाला आणि काही काळापुरता का होईना, देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात एक झंझावात निर्माण झाला...

एके काळी शरद जोशी यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे विजय जावंधिया, राजू शेट्टी आणि अनेक नेते त्यांची संगत सोडून गेले. ‘योद्धा शेतकरी’ या शीर्षकाखालील त्यांचे चरित्र केविलवाणे होत गेले, पण त्याची जाणीव त्यांना स्वत:ला फार उशिरा झाली. अगदी अलीकडच्या काळात त्यांनीच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘मी शेतकऱ्यांची संघटना बांधली, त्यांच्या समस्या वेशीवर टांगल्या, त्यांच्यासाठी आंदोलने केली, आपल्या उत्पादनाचे मूल्य कसे काढावे हे शिकविले, पण मी त्यांना शहाणे करू शकलो नाही, समस्यांवरील उपाय त्यांना सांगू शकलो नाही.’

आता साडेतीन दशकांनंतर मागे वळून पाहताना जाणवणारी एक स्पष्ट बाब म्हणजे संघटनेला वा शरद जोशींना लाभलेले माध्यमांचे जबरदस्त आणि अभूतपूर्व पाठबळ. माध्यमांच्या दृष्टीने शेतकरी एकत्र येतात, आपली संघटना उभारतात, आवाज बुलंद करतात आणि सरकारला दाती तृण धरून आपल्या मागे धावायला भाग पाडतात, हे सारेच मोठे अभूतपूर्व आणि न भूतो होते. त्यामुळे सारी माध्यमे अक्षरश: वेडावल्यासारखी झाली होती. हे वेडावलेपण किती, तर जोशींचे नाशिक जिल्ह्यात कांदा आंदोलन सुरू असतानाच्या काळात दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सभेला जमणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती लाख छापायची हे आदल्या रात्रीच सारी माध्यमे एकत्र बसून ठरवीत असत. मग प्रत्यक्षात सभेला येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या काही हजारातली का असेना! आदेश! आदेश!! आणि आदेश!!! हा त्या काळातील जणू नवाक्षरी मंत्र आणि ‘भीक नको, हवा घामाचा दाम’ हा उद्घोष बनला.
पुणे जिल्ह्यातील चाकण ही जरी या संघटनेची जन्मभूमी असली, तरी तिची कर्मभूमी म्हणजे नाशिक जिल्हा. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कोणत्याही संघटनेला जे निष्ठावान मनुष्यबळ लागते, त्याचा पुरवठा करणारे तीन बलदंड नेते नाशिक जिल्ह्यातूनच शरद जोशींच्या पाठीशी उभे राहिले. त्या काळात महाराष्ट्रातील मोजक्या मजबूत साखर कारखान्यांमध्ये ज्याची गणना होई, त्या निफाड कारखान्याचे अध्यक्ष माधवराव बोरस्ते (आता हयात नाहीत), याच कारखान्याचे एक संचालक प्रल्हाद पाटील कराड आणि जिल्ह्यातील एक प्रगतीशील द्राक्ष बागायतदार माधवराव खंडेराव मोरे ही त्रयी शरद जोशींच्या मागे उभी राहिली. तिघे जिल्ह्यातील वजनदार आणि बोलके नेते.
बोरस्ते-मोरे मराठा समाजातले तर कराड वंजारी समाजातले. त्यामुळे जातीय समीकरणही जुळून आले, पण तरीही त्या काळात चर्चिली जाणारी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, वसंतदादा पाटील यांचा संघटनेला असणारा आशीर्वाद किंवा त्यांचे छुपे समर्थन. राज्यातील बव्हंशी शेतकरी समाज मराठा समाजातला. त्यामुळे या समाजाने एका ‘बामणा’च्या हाकेला ‘ओ’ देणे योग्य नाही असा प्रचार एकीकडे होत होता, तर शरद जोशी फक्त बड्या शेतकऱ्यांचे हितकर्ते आहेत, असादेखील जोरदार प्रचार होत होता, पण गळ्यात संघटनेचं ‘डोरलं’ बांधलेल्या लोकांचे पातिव्रत्य जराही कुठे भंगले नाही. सरकार हीच शेतकऱ्यांची फार मोठी समस्या आहे ही भूमिका लोकांना भावत होती. सामान्यत: सरकार वा व्यवस्थेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे लोक तसेही जनसामान्यांना भावतच असतात. खुद्द जोशीदेखील त्या काळात सभांमधून बोलताना वारंवार सांगत असत की, राजकारणाच्या वाटेला गेलो, तर जोड्याने हाणा! १९८४ची लोकसभेची निवडणूक श्रीमती इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येमुळे वेगळ्या वातावरणात झाली. राजीव गांधींनी देशभर अनेक तरुण उमेदवार दिले. त्यात नाशकात मुरलीधर माने यांचा सनावेश होता. त्यांच्या विरोधात प्रल्हाद पाटील उभे राहिले. शरद जोशींनी काँग्रेसच्या विरोधात भले काही जाहीर सभा घेतल्या, पण कराडांना मतदान करा, असा ‘आदेश’ मात्र दिला नाही. बहुधा तोवर तरी राजकारणाच्या जोड्याचा विटाळ त्यांच्या मनात कायम होता. त्यांच्या या आदेश न देण्याने कराड पराभूत झाले. संघटनेपासून हळूहळू दुरावत गेले आणि आज तर त्यांना संघटना किंवा जोशी यांचा विषयदेखील नकोसा वाटतो.
त्यानंतरच्या काळात मात्र, जोशींची वैचरिक घसरण वेगाने होत गेली. वेगवेगळ्या शेती उत्पादनांच्या प्रश्नासाठी कधी शेतकरी महिला मेळावे घे, रास्ता रोको कर, रेल्वे बंद पाड, डोंगर चढउतार कर हे सारे सुरूच होते, पण सरकार हीच शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या असल्याचे सांगणारे जोशी सरकारच्या आणि सत्तेच्या समीप घेऊन जाणारी पावले टाकू लागले. स्वतंत्र भारत नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. आणि जो नेता जोशींना ‘डेंजर’ म्हणायचा, त्या नेत्याच्या विधानातला उत्तरार्ध सत्यात उतरू लागला. हा उत्तरार्ध होता, ‘जेव्हा हा इसम आमच्या आखाड्यात उतरेल, तेव्हा आम्ही त्याला कच्चा खाऊन टाकू!’ शेवटी तसेच झाले. शरद जोशींची ही खंतच मग मोजक्या शब्दांत योद्धा शेतकरी ते पराभूत योद्धा हा प्रवास सांगून जाते.

(लेखक ‘लोकमत’च्या नाशिकचे आवृत्तीचे संपादक आहेत)

Web Title: Defeated 'warrior'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.