ओढवून घेतलेला पराभव

By admin | Published: February 26, 2017 11:17 PM2017-02-26T23:17:44+5:302017-02-26T23:17:44+5:30

पंतप्रधानांच्या कार्यालयात दीर्घकाळ राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पेलले नाही.

Defeats | ओढवून घेतलेला पराभव

ओढवून घेतलेला पराभव

Next


पंतप्रधानांच्या कार्यालयात दीर्घकाळ राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पेलले नाही. आपला प्रभाव मंत्रालयाबाहेर वाढविण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केल्याचेही कधी दिसले नाही. त्यातून विधान परिषदेतील आपली सुरक्षित जागा सोडून कऱ्हाडमधून सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पक्षाच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवून त्यांनी आपल्या आकांक्षेचे आखूडपणही साऱ्यांच्या लक्षात आणून दिले. परिणामी प्रादेशिक सोडा, पण एखाद्या गटाचे नेते होणेही त्यांना जमले नाही. अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्रिपदाची सुरुवात चांगली झाली. पण काही काळातच त्यांच्यामागे मुंबईच्या आदर्श इमारतीचे झेंगट उभे राहिले आणि त्यांच्या कामगिरीहून त्या बदनाम इमारतीच्याच बातम्या अधिक येत राहिल्या. त्याही स्थितीत विलासरावांशी जुळवून घेण्याऐवजी त्यांच्याशीच दोन हात करण्याची तयारी त्यांनी केली. परिणामी त्यांना नांदेडबाहेर मराठवाड्यातही आपला प्रभाव जमविणे जमले नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून काही अपेक्षा होत्या. पण त्यांना नगरबाहेर जाता आले नाही आणि त्या जिल्ह्यातली पक्षांतर्गत भांडणेही कधी सोडविता आली नाहीत. पुण्यात आणि औरंगाबादेत काँग्रेसजवळ नाव घेण्याजोगा नेता नव्हता आणि नाही. सगळे आपले नुसतेच सांस्कृतिक आणि हवेतले. माणिक ठाकरे बरीच वर्षे पक्षाध्यक्ष होते आणि आता ते विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. पण त्यांना यवतमाळ या त्यांच्या जिल्ह्यात सोडा, स्वत:च्या दारव्हा मतदारसंघातही कधी विजयी होता आले नाही. मुंबईतली भांडणे दिल्लीला मिटवता आली नाहीत आणि गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम ही लढाई निवडणूक काळातही तीव्रच राहिली. सुशीलकुमार यांना त्यांचा पहिला पराभव अजून पचविता आला नाही आणि ते चाकूरकर कुठे आहेत? त्यांना शोधावेच लागते. पतंगरावांना सांगली आणि भारती विद्यापीठ याखेरीज काही सुचत नाही. त्यांच्या पोराला वजन नाही आणि पक्षाचे तथाकथित युवा नेते कसल्या कसल्या भ्रमाखेरीज दुसरे काही मनात आणत नाहीत. २०१४ च्या सत्ताबदलानंतर वर्षानुवर्षे कॉँग्रेसमध्ये राहिलेली व तिची सत्ता उपभोगलेली अनेक माणसे एका रात्रीतून भाजपात गेली. तसे जाताना आपल्या खुर्च्या सांभाळण्याखेरीज त्यांनी काही केले नाही. शिवाय अमुक एक काम करतो तर आपण घरीच राहिलो तर काय, अशा शहाणा व आरामशीर विचार करणारी माणसेही नागपूरपासून मुंबईपर्यंत सर्वत्र दिसली. पक्षाची तिकिटे देताना प्रामाणिक कार्यकर्त्यांची निवड करण्याहून सौदेबाजीतून तिकिटे देण्याची पक्षातील अनेकांना जुळलेली सवय यावेळीही सक्रिय होती. कोणत्या उमेदवाराने किती रुपयात तिकीट घेतले आणि कोणाला ते पैसे कमी म्हणून नाकारले गेले याची चर्चा आता गावोगावी ऐकता येणारी आहे. पक्षाची सगळी यंत्रणा, नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अशी आत्मग्रस्त आणि स्वार्थात बुडालेली, निष्क्रिय व नाकर्ती असताना पक्ष विजयी कसा होईल? इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यकाळात प्रादेशिक पुढाऱ्यांच्या सुभेदाऱ्या मोडल्या आणि सारी सत्ता दिल्लीत एकवटली. त्यांच्या पश्चात पक्ष पूर्ववत व्हायला हरकत नव्हती. पण तेव्हापासूनच इंदिराजी येतील वा सोनिया गांधी येतील आणि आपण तरून जाऊ अशा आत्मवंचनेने पक्षातील सगळ्यांना ग्रासले. आता इंदिरा गांधी नाहीत, सोनिया गांधींना फारसे दौरे जमत नाहीत आणि राहुल गांधी उत्तर प्रदेशात गुंतले आहेत. ही वेळ आपले कर्तृत्व पुन्हा उजळण्याची आणि पक्षाने दिलेले सारे परत फेडण्याची आहे अशी भावना कुणात जागली नाही. परिणामी म. गांधी ते सोनिया गांधी यांच्या पुण्याईवर मिळतील ती मते घ्यायची आणि निवडून येण्याची खात्री बाळगायची असेच काँग्रेसचे राजकारण गेल्या ३० वर्षांत दिसले. पक्षाजवळ पवारांसारखा पुढारी नाही, फडणवीसांसारखा फिरस्ता नाही आणि वक्ते, अभ्यासक व प्रभावी प्रचारकर्ते यांचा तर त्यात दुष्काळच आहे. आपला प्रभाव केवळ पैशामुळे वाढतो याही भावनेने या काळात काँग्रेसमधल्या अनेकांना ग्रासलेले दिसले. त्यामुळे लोकांशी संपर्क नाही, जुन्यांचा आदर नाही आणि नव्यांना वजन नाही असे मतदारांतील काँग्रेसचे आताचे चित्र राहिले. त्यामुळे एखादा पडायला आलेला वाडा वाऱ्याच्या साध्या झुळुकीने जमीनदोस्त व्हावा तसा त्यांचा पराभव परवाच्या निवडणुकीत झाला. काँग्रेसला प्रचार करता आला नाही, सभा घेता आल्या नाहीत आणि आपला कार्यक्रम लोकांसमोर ठेवणेही जमले नाही. बोलणारे नाहीत, ज्यांच्या नावावर लोक जमतील असे पुढारी नाहीत आणि आहे ते आतबाहेरच्या साऱ्यांना नको तसे ठाऊक असणारे. त्यामुळे बहुतेकांच्या वाट्याला टाळ्यांऐवजी टवाळीच येताना दिसली. पक्षाला वैचारिक बैठक आहे, दीर्घ इतिहास आहे आणि नेहरूंपासून मनमोहन सिंगांपर्यंतचे कर्तृत्व त्याच्या पाठीशी आहे. पण ते समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचविणार कोण? राजकारण हे आत्मग्रस्त नाकर्त्यांचे क्षेत्र नाही. ते समाधान मानून झोपी जाणाऱ्यांचे काम नाही. सदैव सावधान व कार्यरत राहणे ही राजकारणाची व लोकशाहीची किंमत आहे. ती चुकविणे ज्या करंट्यांना जमत नाही त्यांच्या वाट्याला पराभवाखेरीज काय यायचे असते?

Web Title: Defeats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.