उद्योगाची परिभाषा; व्यापक दृष्टीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:36 AM2020-05-11T04:36:32+5:302020-05-11T04:38:50+5:30
महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव व विस्तार उत्पादन क्षमतेत निश्चितच वाढ करेल, पण त्यासाठी आवश्यकता आहे व्यापक दृष्टिकोनाची, सुयोग्य व्यवस्थापनाची आणि अंमलबजावणीची.
- संजीव पेंढरकर
संचालक, विको लॅबोरेटरीज
‘न भूतो न भविष्यति’ अशी परिस्थिती ‘कोरोना’मुळे निर्माण झाली आहे. ही वैश्विक आपत्ती संपूर्ण जगापुढे अनेक आव्हाने घेऊन आली आहे. संपूर्ण जगात अतिप्रगत-प्रगत-विकसनशील व अप्रगत देश आहेत. कोविड-१९ने सगळ्यांना हादरा दिला आहे. लॉकडाऊन स्थितीत करोडो लोक आहेत. या लोकांमुळेच जगरहाटी चालू होती-आहे-असेल. कोणत्याही व्यवसायात कुशल प्रशिक्षित कामगारवर्ग उत्पादनाचा दर्जा वाढवितो. प्रत्यक्ष काम करणारे, राबणारे हात काही मर्यादांमुळे आपले योगदान देऊ शकत नाहीत.
थोड्याफार फरकाने महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव व विस्तार उत्पादन क्षमतेत निश्चितच वाढ करेल, पण त्यासाठी आवश्यकता आहे व्यापक दृष्टिकोनाची, सुयोग्य व्यवस्थापनाची आणि अंमलबजावणीची. आपली अफाट लोकसंख्या आपले शक्तिस्थान ठरू शकते. प्रगतीची क्षितिजे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विस्तारलेली आहेत. मराठीत ‘इष्टापत्ती’ म्हणतात ती आलेल्या संकटातून संधी निर्माण करणे. प्रचंड संधी आणि विस्तृत क्षेत्र देशापुढे आहे. महाराष्ट्रात संधीचा पूरच येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उलाढाल होईल. ‘कोरोना’ने अनेक गोष्टी शिकविल्या आहेत. ‘कोरोना’पूर्व काळातील आपल्या सवयी आणि समाजाचा विचार करता अनेक बाबींमध्ये बदल करायला हवा. समाजजीवनाचा भाग म्हणून ‘लॉकडाऊन’च्या काळातील काही महत्त्वाचे नियम कसोशीने पाळायला हवेत. केवळ घरातच नव्हे, तर घराबाहेरदेखील स्वच्छता प्राणपणाने जपायला हवी. खरंच आपण बदलायला हवे. ‘कोरोना’मुळे जगाला कळलंय काय करायला हवं होतं? आणि आपण काय केलं? असे प्रश्न भविष्यात उद्भवले तर त्यांना आपण तोंड देण्यास सक्षम आहोत का?
आपत्कालीन व्यवस्था सर्वच स्तरांवर खंबीर हवी. शत्रू केवळ सीमेवरच असतो असे नाही, तर पंचमहाभूतांपासून तो कधीही, कुठेही अवतरूशकतो. एखाद्या उद्योगधंद्यात, व्यवसायात त्या त्या उद्योजकाने गंगाजळी ठेवायला हवी. कोणत्याही कारणास्तव अडचणी निर्माण झाल्यास किमान वर्ष-दीड वर्ष सर्व सुरळीत राहायला हवं. ‘कोरोना’मुळे हे शिकायला मिळालं. हा धडा सर्वांनी शिकायला हवा. निसर्गापुढे मानव काही करूशकत नाही, ही अगतिकता आपण अनुभवत आहोत. निसर्गनियमांना डावलून आपण काही करायला गेलो, तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. याचे विपरीत परिणाम सर्वांच्याच आरोग्यावर, वैयक्तिक समाजजीवनावर, प्रत्येकाच्या ब्रेड-बटरवर होतात. अन्न-वस्त्र-निवारा ही साखळी पूर्ण व्हायला हवी. आतापर्यंत जगभरात अनेक क्रांती घडून आल्या आहेत. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. आता अशक्य असे काही नाही. ‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ अशी ही अद्भुत क्रांती आहे. डिजिटल क्रांतीमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविता आली. कनेक्टिव्हिटी ही देणगीदेखील याच क्रांतीची. जगभरात काय चाललं आहे, याची कल्पना एका क्लिकसरशी डोळ्यांपुढे येते. माहितीचा प्रचंड साठा अथवा विस्फोट डिजिटल युगात झाला आहे. नवनवीन तंत्रज्ञान, आरोग्य, शेतकी, औषधी, अन्नोत्पादन, आदी क्षेत्रांत मदत करीत आहेत. मानवी जीवनाचा राहणीमानाचा स्तर आणि जीवनमान उंचाविण्यासाठी या तंत्रज्ञानाची मदत होत आहे.
जीवनाच्या प्रवासात चढ-उतार असतातच आणि ते प्रत्येकाला भोगावे लागतात. व्यवसायाच्या दृष्टीनेही असाच आलेख असतो. हे ‘अप अँड डाऊन’ याचे धक्के सहन करण्याइतपत प्रत्येकाने सक्षम असायला हवे. अंथरूण पाहून हातपाय पसरावेत. या काळात सतत सावधान असायला हवे. आपण अनेकांचे आधारस्तंभ असणाऱ्यांनी तर विशेष काळजी घ्यावी. भविष्यकालीन आपत्तीची तरतूद सुरुवातीलाच केल्यास ‘कोरोना’ सारख्या काळात गडबडून जायला होणार नाही.
संकटात मानवी आधाराची गरज असते. अशावेळी एक सामाजिक बांधीलकी म्हणून उद्योजकांनी, धनाढ्यांनी समाजाला सढळ हस्ते मदत करायला हवी. निदान लोकांची तशी अपेक्षा असते. ‘कोरोना’काळात अनेकांनी भरघोस मदत देऊ केली आहे. या देणाऱ्यांमध्ये आपणही असायला हवे अशी मनीषा मनात बाळगायला काय हरकत आहे? मुळात ‘आडात असायला हवे, तर पोहºयात’ येईल. धनसंपत्तीचा आड भरलेला राहायला हवा म्हणून तशी तरतूद व्यक्तिगणिक असायला हवी. शासनाचे सहकार्य सर्वतोपरी असायला हवे. कागदी घोडे नाचविण्यात काही अर्थ नाही. झटपट कृती आणि झटपट निर्णयाची अंमलबजावणी व्हायला हवी, अन्यथा कागदी भेंडोळ्यात अनेक सुंदर योजना नेस्तनाबूत झाल्या आहेत. आपल्याला समाजाचे खºया अर्थाने भले करायचे असेल तर सरकारी पाठबळ मिळायला हवे.
‘विको’च्या निर्मितीनंतर उद्योगजगतातील अनेक चढ-उतार मी अनुभवले आहेत. भविष्यकालीन विचार करूनच प्रत्येक योजना राबविली जाते. त्यामुळे सामाजिक घटनांचे पडसाद आमच्या व्यवसायावर होऊ दिले नाहीत. आपल्या मिळकतीतील किती हिस्सा खर्च करायचा आणि किती सांभाळून ठेवायचा हे नियोजन ज्याला जमले त्याचे आयुष्य समृद्ध होईल. अशिक्षित-अडाणी स्त्रियांनी गृहव्यवस्थापन आजवर उत्तमरीत्या सांभाळले आहे आणि आपण सर्वज्ञ, उच्चशिक्षित आहोत. नेमकं काय करायचं ? याचा अंदाज आला की पुढील सर्व गोष्टी सोप्या होतात.
‘एकमेकां साहाय्य करू’ या तत्त्वावर यापुढे जगावे लागणार आहे. आपत्तीच्या काळात मानवी हात मदतीला पुढे सरसावतात आणि अमूल्य प्राण वाचविले जातात. आपण विश्वाचे घटक आहोत त्यामुळे ही एक बांधीलकी आहे. उत्तमोत्तम समोरच्याला देऊ करावे आणि निर्सगाचा नियम आहे ‘जे पेराल ते उगवेल.’ अगदी नेस्तनाबूत होण्याची वेळ आली तरी कर्माचा पुण्य संचय पुनश्च उभारी देईल. व्यक्ती-कुटुंब-समाज व शासन यांनी या कार्यात पाठीशी उभे राहावे. कार्य करण्याची प्रेरणा यातून मिळते.
कमीत कमी अडथळे असावेत. जेणेकरून विकासाच्या दिशेने सर्वच प्रवास करतील. शासनाने किचकट प्रणाली सोडून त्वरित निर्णय घ्यावेत, जेणेकरून मानवी जीवनावर त्याचा भविष्यात प्रतिकूल परिणाम होणार नाही. अद्ययावत तंत्रज्ञान, कुशल कामगार आणि निरोगी मनं सगळा डोलारा सांभाळण्यात सक्षम आहेत. गरज आहे त्यांना कुशल नेतृत्वाची, योग्य वातावरणाची आणि प्रगतीची द्वारं महाराष्ट्राला, देशाला खुली झाली आहेत. त्याचा लाभ सर्वांनी घ्यायला हवा आणि घेऊ यायला हवा हे महत्त्वाचे!