अल्पवयीनांमधील विकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 03:26 PM2020-10-21T15:26:05+5:302020-10-21T15:26:22+5:30
एडिटर्स व्ह्यू
Next
म लिंद कुलकर्णी रावेरमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्यासह चौघा भावंडांना कुºहाडीने ठार केल्याच्या धक्कादायक घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. या घटनेने समाजाला सुन्न केले आहे. पोलीस दलाने खून, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे खून झालेल्या भावंडाच्या मोठया भावाचे मित्र असल्याचे आणि तेदेखील अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. अल्पवयीय मुले लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराकडे वळत असल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने हा समाजाच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. रावेरमधील बोरखेडा रस्त्यावरील केळीबागेत महेताब भिलाला हा मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी रखवालदार काही वर्षांपासून कुटुंबासह राहत होता. पत्नी आणि पाच मुलांसह राहणारा महेताब नातलगाच्या विधीसाठी खरगोन जिल्ह्यातील गढी या मूळगावी गेला होता. मोठा मुलगा संजय, पत्नी सोबत होते. दोन मुली, दोन मुुले अशी चौघे भावंडे घरी होते. संजयने त्याच्या मित्राला घराकडे लक्ष दे, असे सांगितले होते. यापूर्वीही या मित्राने भावंडांकडे लक्ष दिले असल्याने महेताबच्या कुटुंबाने त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि तेथेच घात झाला. संजयच्या मित्रांनी दारुचे सेवन करुन महेताब यांच्या झोपडीत प्रवेश केला आणि १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी इतर भावंडांना जाग आली. संजयच्या मित्रांना भावंडे ओळखत असल्याने बिंग फुटेल या भीतीतून त्यांनी कुºहाडीने चौघांचा जीव घेतला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. आरोपी मुले ही अल्पवयीन आहेत की, नाही यासाठी त्यांचे जन्मदाखले मिळविणे, रासायनिक पृथक्करण, न्यायवैद्यक शास्त्र अहवाल, तांत्रिक अहवाल या कामात तपास पथके व्यग्र आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. प्रशासनाने तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपये देऊ केले. हे राजकीय व प्रशासकीय पातळीवर ठीक आहे. परंतु, काही कालावधीनंतर या पीडित कुटुंबाचा सोयिस्करपणे विसर पडेल. त्यांना मदतीचे दिलेले आश्वासन हवेत विरेल, हा सार्वत्रिक अनुभव आहे. बालशौर्य पुरस्कार मिळालेला मुक्ताईनगरचा नीलेश भिल दैन्याला कंटाळून अखेर घरातून पळून गेला. वाकडी (ता.जामनेर) येथील खाजगी विहिरीत आंघोळ केली म्हणून मागासवर्गीय मुलांची नग्न धिंड काढणे, त्याची चित्रफित प्रसारीत केल्याची घटना पावणे दोन वर्षांपूर्वी घडली. त्या कुटुंबाला अद्याप जाहीर केलेली मदत मिळालेली नाही. रावेरचे हे कुटुंबदेखील आदिवासी आहे. मुक्ताईनगर, वाकडी प्रमाणे पुनरावृत्ती होऊ नये, अशी काळजी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घ्यायला हवी.या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यावर समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रखवालदारी करणाºया कुटुंबियांच्या संरक्षणाचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. बागा, बांधकामे याठिकाणी रखवालदार ठेवण्याची पध्दत आहे. त्यातील मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांचे प्रमाण त्यात अधिक आहे. कुटुंबासह राहणारे हे आदिवासी बांधव श्रमजिवी, प्रामाणिक आहेत. त्यामुळे जळगावसोबतच शेजारील जिल्ह्यात त्यांना खास बोलावले जाते. परंतु, त्यांच्या सुरक्षेचा, पुरेशा आर्थिक मोबदल्याचा आणि मुलांच्या शिक्षणाचा विषय अधांतरी किंवा दुर्लक्षित असतो. मूळ गाव सोडून स्थलांतर करुन ते कामासाठी येतात, शासकीय कागदपत्रांअभावी योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. रावेरसारख्या तालुका ठिकाणच्या गावांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये व्यसन आणि अत्याचार, हिंसाचाराची भावना वाढीस लागणे हे देखील चिंताजनक आहे. महानगरे, शहरी भागातील काही मुलांमध्ये असे दुर्गुण आढळतात, या समजाला अशा घटनेने छेद दिला आहे. ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेविषयी गंभीरपणे चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. दारु, गांजा, गुटखा हे मादक पदार्थ सहजपणे उपलब्ध होत आहे, हे उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन व पोलीस दलाच्या कारवायांमधून दिसून येते. कुमारवयात भिन्न लिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे सहजप्रवृत्ती असली तरी अत्याचाराच्या विचारापर्यंत ही मुले कशी पोहोचतात, हा समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीयदृष्टीने अभ्यासाचा विषय आहे. विकृती, अधोगती तर आहेच. पण हे प्रमाण वाढत जाणे हे निकोप समाजाच्यादृष्टीने घातक आहे. रावेरच्या या घटनेतील आरोपी निष्पन्न होतील, कारवाई होईल. पण यानिमित्ताने निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी विचार, अभ्यास आणि तोडगा काढला गेला नाही, तर मात्र परिस्थिती अवघड व्हायला वेळ लागणार नाही.