एका ‘टॉपर’चे अध:पतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:36 AM2017-06-10T00:36:18+5:302017-06-10T00:36:18+5:30
एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते.
एखादे व्यसन मनुष्याच्या अध:पतनाला कसे कारणीभूत ठरते हे वाहनांची चोरी करणाऱ्या जयकिशन या विद्यार्थ्याच्या अटकेतून दिसून येते. चोरलेली वाहने वेबसाइटवर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग या २३ वर्षीय विद्यार्थ्याला नुकतीच पोलिसांनी अटक केली. या बातमीत दडलेली खरी बातमी पुढेच आहे. आरोपी जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून, त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५० टक्के गुण मिळाले होते. या तपशिलाने वाचकांना अधिक धक्का बसला असेल.कुशाग्र बुद्धिमत्तेचा जयकिशन गाड्यांची चोरी करून त्या विकण्याच्या गुन्ह्यांमध्ये पकडला जावा, हा दैवदुर्विलास आहे. अभ्यासात हुशार असणाऱ्या जयकिशनने आपली हुशारी वाहनचोरीसाठीही वापरल्याचे दिसून येते. आपण पकडले जाऊ नये यासाठी जयकिशनने त्या विभागातील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले होते. यावरून तो किती योजनाबद्धरीतीने गुन्हे करीत असे हे लक्षात येते. हा प्रकार केवळ जयकिशनच्या व्यक्तिगत आयुष्यापुरता मर्यादित नाही तर एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. त्याचबरोबर समाजातील नैतिक मूल्यांची घसरण दाखवणारा आहे. उत्तम शैक्षणिक कारकीर्द वाट्यास आलेला विद्यार्थी सहजगत्या गुन्हेगारीकडे वळतो आणि त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही, हे प्रकर्षाने दिसून येते. शिक्षणासोबत अपेक्षित असलेल्या संस्कारांपेक्षा त्याला भौतिक सुखांची अधिक लालसा निर्माण झाली. अशा रीतीने तुरुंगात गेलेले आरोपी सराईत गुन्हेगारीचे शिक्षण घेऊनच तुरुंगाबाहेर पडतात, असा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच तरुण आरोपींचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा नव्या सरळमार्गी जीवनाची वाट दाखवण्याची जबाबदारी व्यवस्थेची आहे. मनुष्य केवळ सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृतही असला पाहिजे. शिक्षणात आघाडीवर असलेल्या जयकिशनवर संस्कार करण्यात कोण कमी पडले, या प्रश्नाची आता चर्चा होईल. पण खरे उत्तर आहे, संपूर्ण समाजच यासाठी उत्तरदायी आहे. जयकिशन हा हुशार विद्यार्थी असल्याने ही बातमी अधिक ठळकपणे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केली. मात्र शिक्षणात फारशी प्रगती नसलेले असे अनेक विद्यार्थी व्यसनाधीनता, नैराश्य, वैफल्याचे बळी ठरतात. कुमारवयीन मुलांमधील ऊर्जेला विधायक वळण देत त्यांना वाममार्गापासून दूर ठेवण्याचे प्रकार जाणीवपूर्वक समाजाने रुजवले पाहिजेत, तेव्हाच असे जयकिशन वाताहत होण्यापासून वाचतील.