फाशीचा दोर तुमच्या मानेच्या मापाचा आहे? -मग, तुम्हीच दोषी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 08:04 AM2024-08-02T08:04:10+5:302024-08-02T08:06:27+5:30
केवळ पावसाने पाणी साठलेल्या रस्त्यावरून वाहन नेले या आरोपाखाली एखाद्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कसा लावता येऊ शकतो?
- अमित आनंद तिवारी, वकील, सर्वोच्च न्यायालय
दिल्लीच्या राजेंद्रनगर भागातील अभ्यासवर्गात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूचा धक्का ओसरत नाही तोच पोलिसांनी मनोज कथुरिया नामक एसयूव्ही चालकाला अटक केल्याने नागरिकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर भयावह घाला घातला गेला आहे. या चालकाचा अपराध काय? - तर ज्या ठिकाणी त्या तीन मुलांचा मृत्यू झाला त्या अभ्यासिकेच्या समोर पाण्याने भरलेल्या रस्त्यावर त्याने गाडी घातली होती.
यासंबंधीच्या बातमीत म्हटल्यानुसार, या कथुरियाने पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाहन घातल्याने उडालेल्या पाण्यामुळे कोचिंग क्लासच्या तळघरातील वाचनालयात पाणी घुसले, असा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, त्यामुळे कायदेशीर तरतुदी आणि सामान्य तर्कसंगतीला हरताळ फासला गेला आहे.
कथुरिया यांच्या अटकेमुळे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ या भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या नाटकाची आठवण येते. राजा आणि त्याच्या राजवटीतला सावळागोंधळ यावरचे हे नाटक प्रसिद्ध आहे. या नाटकातल्या राज्यात एक बकरा मरतो. त्याला कोणी मारले हे ठरवताना कारभारी फाशीच्या दोरखंडात ज्याची मान बसते त्याला दोषी ठरवतात. येथे तसेच काहीसे घडताना दिसते आहे. कथुरिया यांच्या अटकेसंबंधीची वस्तुस्थिती आणि परिस्थिती याविषयी गंभीर चिंता व्यक्त होत असून, गंभीर घटना घडल्यावर एखाद्याला बळीचा बकरा बनवून त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याची प्रवृत्ती वाढते आहे हेच यातून दिसते.
पोलिसांनी कथुरिया यांच्यावर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बादरायण संबंध जोडून ठेवलेले आरोप पूर्णपणे फेटाळून न लावता न्यायालयातही कथुरिया यांना जामीन नामंजूर केला गेला आणि १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. पोलिसांनी हडेलहप्पी करून एखाद्याचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले असल्याचे जाणवले, तर त्याला पहिल्या पायरीवर न्यायालयातच वचक बसावा, असा संकेत आहे. या घटनेत तसेही झालेली दिसत नाही. कथुरिया हे भर पावसात पाणी साठलेल्या रस्त्यातून वाहन हाकत होते, याव्यतिरिक्त त्यांचे काही चुकले आहे असे यासंबंधीच्या बातमीत म्हटलेले नाही. केवळ पावसाने पाणी साठलेल्या रस्त्यावरून वाहन नेले म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एखाद्यावर कसा लावता येऊ शकतो?
आता हाच तर्क लावायचा झाला तर तो दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनाही लावता येईल. जर रस्ता पाण्याने भरलेला होता तर त्यांनी तो वाहतुकीला बंद का केला नाही, असा थेटच प्रश्न यासंदर्भात विचारता येऊ शकतो. पण, तसेही झालेले नाही.
पोलिसी कारवायांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता दिल्ली पोलिसांनी एखाद्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्याचेही हे काही पहिले उदाहरण नाही. न्यायालयातही कथुरिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली गेली. संशयिताला जामीन देण्याच्या प्रकरणात कशी हेळसांड होते याचेही हे द्योतक होय.
व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावले जात असेल तर घटनेने उपलब्ध करून दिलेला तो पहिला बचाव असतो. संशयितासंबंधी बहुतेक कनिष्ठ न्यायालये तांत्रिक वागतात. पोलिसांनी आरोपीला समोर उभे केले की त्याला तुरुंगात पाठवून देतात. याही प्रकरणात हेच झालेले दिसते. तळघरात घुसलेल्या पाण्यात गुदमरून तरुण विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण बरेच गंभीर असल्याने कथुरियांवर झालेल्या अन्यायाची फारशी चर्चा देशात होताना दिसत नाही.
‘अंधेर नगरी’ या नाटकात चौपट राजाच्या हुकूमशाही आणि अविवेकी राजवटीचा शेवट कसा होतो, हेही पाहण्यासारखे आहे. या नाटकात दोषींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेला गुरू शेवटी राजालाच फाशी घ्यायला सांगतो. आपण त्या स्तराला पोहोचायचे आहे का?