दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जाण ठेवा!

By विजय दर्डा | Published: March 2, 2020 05:13 AM2020-03-02T05:13:45+5:302020-03-02T07:35:56+5:30

दिल्लीतील या हिंसाचारात जे होरपळले त्यांच्यासाठी माझे मन व्याकुळ होते. मनात विचार येतो कीे, चारचाकी हातगाडीवर फळे किंवा भाजी विकणाऱ्या फेरीवाल्याने धंद्यात गुंतविलेले भांडवल कितीसे असू शकेल?

delhi violence Keep an eye on the families of the riot victims | दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जाण ठेवा!

दंगलीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जाण ठेवा!

googlenewsNext

- विजय दर्डा

सध्या मी परदेशात आहे. इथे भारताविषयी फक्त दोनच गोष्टींची चर्चा ऐकू येते. एक म्हणजे कोरोना विषाणूवर भारत विकसित करत असलेल्या प्रतिबंधक लसीची व दुसरी दिल्लीतील दंगल कशी व कोणी भडकवली याची. तुमचा देश खरे तर अशा गोष्टींसाठी ओळखला जात नाही, मग तुमच्या राजधानीत हे काय चालले आहे? असे परिचयाचे लोक मला विचारत आहेत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, पण पुन्हापुन्हा निरुत्तर होतो. दिल्लीतील या हिंसाचारात जे होरपळले त्यांच्यासाठी माझे मन व्याकुळ होते. मनात विचार येतो कीे, चारचाकी हातगाडीवर फळे किंवा भाजी विकणाऱ्या फेरीवाल्याने धंद्यात गुंतविलेले भांडवल कितीसे असू शकेल? फार तर हजार, दोन हजार रुपये. दिवसभर फेरीचा धंदा करून तो शंभर-दोनशे रुपये कमावतो आणि कुटुंबाच्या तोंडात घास घालतो. अचानक दंगलखोर जमावाने त्याची हातगाडीच जाळून टाकली, तर दुसºया दिवशी त्याने पोट कसे भरावे? एखादा रिक्षा चालवून पोट भरतो. दंगलखोर रस्त्यावर त्याच्या १५ वर्षांच्या मुलाला निष्कारण ठार मारतात. अशा वेळी त्याच्या जीवनात जगण्यासाठी काय शिल्लक राहते?
दिल्ली या देशाच्या राजधानीत नेमके हेच सर्व घडले! शेकडो कुटुंबांचे संसार धुळीस मिळाले. ४० हून अधिक निरपराधांचे बळी गेले, तर २०० हून अधिक गंभीर जखमी झाले. दुकाने व व्यवसाय जाळण्यात आले. शेकडो वाहनांची राखरांगोळी झाली. सरळ सांगायचे तर ईशान्य दिल्लीच्या अनेक मोहल्ल्यांमध्ये नागरिकांचे प्राण कंठाशी आले आणि हे सर्व कोणी केले हे अधिकृतपणे सांगायलाही कोणी तयार नाही. हे कोणाचे कुटिल कारस्थान होते? खरे तर सर्व काही स्पष्ट आहे. विखारी वक्तव्ये करून वातावरण कलुषित करणारे नेते कोण हेही सर्व देश जाणून आहे. सदभावना नेस्तनाबूत करणारी त्यांची भाषणे सर्वांनी ऐकली, पण त्यांच्याविरुद्ध साधा गुन्हाही नोंदला गेला नाही. प्रक्षोभक भाषणांबद्दल गुन्हे नोंंदविण्यास सध्याची परिस्थिती पोषक नाही, ही सरकारची मल्लिनाथी आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. हे कोणी व कशावरून ठरविले? एखाद्याने खरेच प्रक्षोभक भाषण केले असेल तर त्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकत नाही. त्याच्याकडे एक गुन्हेगार म्हणूनच पाहायला हवे व गुन्हेगारांसाठी जे कायदे आहेत तसे त्यालाही वागवले जायला हवे.


कायद्याविषयी बोलायचे तर सुरुवातीच्या दिवसात उघडपणे होणारा हिंसाचार थांबविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काहीच कारवाई का केली नाही? दंगलीत हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला व इन्टेलिजन्स ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांनाही ठार केले गेले, तरी पोलीस गप्प का? या प्रश्नांनीे तर संपूर्ण देश हैराण झाला आहे. कोणीही नेता पोलिसांदेखत गळा फाडून आव्हानात्मक भाषणे देऊच कसा शकतो? जो हिंसाचार झाला ते पाहता याची आधीपासून तयारी झाली होती हे नक्की. दंगलखोरांनी केलेला सुनियोजित गोळीबार हे गुन्हेगारी कारस्थानाचे द्योतक आहे. एवढे होत असताना दिल्ली पोलिसांना त्याचा जराही सुगावा लागू नये?
दिल्लीच्या सार्वजनिक जीवनात तेढ व वैराचे बीज पेरण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. पण, समाधानाची गोष्ट अशी की, दंगलीचे हे थैमान सुरू असतानाही माणुसकी टिकून राहिली, नव्हे माणुसकीचाच विजय झाला. मुस्तफाबाद भागात मंजू सारस्वत या महिलेला मुस्लीम तरुणांनी दंगलखोरांच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले. मोमिन सैफी यांच्या घरात या महिलेला आसरा मिळाला. अशाच प्रकारे एका मुस्लीम महिलेने पिंकी गुप्ता नावाच्या महिलेला वाचविले. सध्या सौदी अरबस्तानात हाजी नूर मोहम्मद यांना त्यांच्या कुटुंबातील लोकांनी फोन करून सांगितले की, आपल्या मोहल्ल्याला दंगलखोरांनी घेरले आहे. हे ऐकून ते घाबरले. त्यांनी अनेक नातेवाइकांना फोन केले, पण दंगलीतून त्यांच्या घरापर्यंत जायला कोणी तयार होईना. हाजी यांनी पूरन चूघ या मित्राला फोन केला. पूरन चूघ तत्काळ हाजी यांच्या घरी गेले. चूघ यांनी फक्त हाजी यांच्याच नव्हे तर आणखी एका कुटुंबाला सुरक्षित स्थळी नेऊन पोहोचविले.

अमानुष दंगलीचे थैमान सुरू असतानाही या घटना अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचेच दाखवतात. खरे तर हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे. समाजातील सांप्रदायिक सलोखा बिघडावा यासाठी काही शक्ती पुन्हापुन्हा प्रयत्न करत असतात, पण माणुसकी, बंधुभाव व प्रेम दरवेळी असे प्रयत्न हाणून पाडते. माझी नेहमीच अशी ठाम धारणा राहिली आहे की, धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे व त्याने आपल्यावर संस्कार होत असतात. पण माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कोणताही धर्म वैर व शत्रुत्वाची शिकवण देत नाही. हिंसाचार ही तर धार्मिक शिकवण असूच शकत नाही. जे धर्माच्या नावाने हिंसाचार करतात त्यांचा कोणताच धर्म नसतो. ते निव्वळ गुन्हेगारच. अशांना पुन्हा अशी कुकृत्ये करण्याची हिंमत होणार नाही, असे कडक शासन व्हायलाच हवे.
हेही लक्षात घ्या, कोणी कितीही प्रयत्न केले तरी समाजात वैराचे बी रुजू न देण्याची काळजी आपल्यापैकी प्रत्येकाने घ्यायला हवी. ऐक्य हीच आपली ओळख आहे व एकोपा हीच ताकद आहे. त्यामुळे नेहमी सावध राहा, एकजूट कायम राखा...!
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

Web Title: delhi violence Keep an eye on the families of the riot victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.