प्रणव मुखर्जींच्या मुत्सद्दी आणि प्रगल्भ कारकिर्दीचा अस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 05:07 AM2020-09-01T05:07:59+5:302020-09-01T05:08:22+5:30

२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर मुखर्जी सतत दुसऱ्या स्थानावर राहिले. कॉंग्रेसचे सर्वात मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते म्हणून एकाच वेळी आठ-दहा वादग्रस्त समित्यांचे ते प्रमुख असत व त्यातून योग्य राजकीय तोडगा काढत.

The demise of Pranab Mukherjee's diplomatic and prolific career | प्रणव मुखर्जींच्या मुत्सद्दी आणि प्रगल्भ कारकिर्दीचा अस्त

प्रणव मुखर्जींच्या मुत्सद्दी आणि प्रगल्भ कारकिर्दीचा अस्त

Next

- डॉ. भालचंद्र मुणगेकर
(माजी खासदार)

प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारताच्या गेल्या साठ वर्षांतील यशस्वी, मुत्सद्दी आणि प्रगल्भ जीवनाची अखेर झाली आहे. १९६९ मध्ये बंगलोरच्या अधिवेशनात कॉँग्रेसमध्ये उभी फूट घडवून आणल्यानंतर इंदिरा गांधी यांनी, प्रणव मुखर्जी यांची राजकीय गुणवत्ता ओळखून त्यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर प्रथम राज्यसभेत निवडून आणले आणि त्याच वर्षी त्यांना शिपिंग, परिवहन व अर्थ खात्याचे उपमंत्री केले. त्यानंतर ते चार वेळा, म्हणजे एकूण पाच वेळा राज्यसभेवर निवडून गेले. २००४ व २००९ मध्ये ते दोनदा लोकसभेवर निवडून गेले.
२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर मुखर्जी सतत दुसऱ्या स्थानावर राहिले. कॉंग्रेसचे सर्वात मुत्सद्दी आणि मुरब्बी नेते म्हणून एकाच वेळी आठ-दहा वादग्रस्त समित्यांचे ते प्रमुख असत व त्यातून योग्य राजकीय तोडगा काढत.
मी जुलै २००४ मध्ये योजना आयोगाचा सभासद झालो. आयोगाच्या दोन प्रकारच्या बैठका होत. एक, फक्त आयोगाच्या पूर्ण वेळ सदस्यांची; व दुसरी, पूर्ण योजना आयोगाची. परंपरेनुसार पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्यासोबत योजना आयोगाचे सभासद असलेले जेष्ठ मंत्री उपस्थित असत. आमच्या काळात प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंग, शरद पवार, पी. चिदंबरम , लालू प्रसाद यादव, इ. ज्येष्ठ मंत्री होते. अशाच एका बैठकीत त्यांचा व माझा व्यक्तिगत परिचय झाला आणि तीसुद्धा वित्तीय तूट कमी ठेवण्याच्या त्यांच्या आग्रहाच्या विरोधी मत मी मांडल्यानंतर. २२ मार्च, २०१० रोजी तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभात् पाटील यांनी माझी राज्यसभेवर नियुक्ती केली. ४ मे २०१० रोजी माझे राज्यसभेत पहिले भाषण झाले. आर्थिक विकासाच्या वेगाबरोबरच विकासाचे फायदे गरीबांपर्यंत पोचवण्यात भारत अयशस्वी ठरत आहे, असा माझा मुख्य रोख होता. त्यादिवशी राज्यसभेत वित्तीय बिलावरील चर्चेला उत्तर देताना श्री मुखर्जी म्हणाले, ‘मी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचा खास उल्लेख करतो. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती ही नक्कीच राज्यसभेच्या चर्चेची गुणवत्ता आणि पातळी वाढवणारी ठरेल’ - तो माझ्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. प्रणवदा व माझ्यात काहीशी अधिक जवळीक निर्माण झाली ती, ते राष्ट्रपती झाल्यानंतर. राष्ट्रपती भवनात तीन प्रसंगी आम्ही प्रत्येक वेळी कमीत कमी अर्धा तास चर्चा केली. शेवटची भेट १८ जुलै, २०१७ रोजी झाली. त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता सर्वात शेवटची वेळ दिली. मी त्यांना माझे ‘दि इसेनशील आंबेडकर’ हे नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक सप्रेम भेट दिले. त्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले आणि त्यानंतर बरोबर दीड तास अर्थव्यवस्था, राजकारण, जमातवाद, सामाजिक प्रश्न, कॉंग्रेसबाबतची चिंता अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. ‘आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होता का?’, ‘देशातील एका सर्वात मोठ्या उद्योगपतीवर आपली खास मर्जी होती का?’... असे काही अगदी वादग्रस्त व त्यांच्या अडचणीचे प्रश्न मी त्यांना विचारले. त्यांनी आपल्या पद्धतीने उत्तरे दिली. त्या चर्चेत माझ्याविषयी त्यांनी दाखवलेला विश्वास व आदर माझ्यासाठी प्रेरणादायी होता.
त्यांना माझी विनम्र आदरांजली.

Web Title: The demise of Pranab Mukherjee's diplomatic and prolific career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.