‘डेमॉक्रसी आॅफ द डेड’... व्हॉल्टेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:39 AM2017-10-10T00:39:37+5:302017-10-10T00:39:46+5:30
प्रथम दिल्ली, नंतर हैदराबाद, पुढे कानपूर, पाठोपाठ नालंदा व कोलकाता झाल्यानंतर राममाधवांच्या पगारी प्रचारकांनी (ट्रोल्स) त्यांचा मोर्चा जम्मू विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे वळविला आहे.
-सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)
प्रथम दिल्ली, नंतर हैदराबाद, पुढे कानपूर, पाठोपाठ नालंदा व कोलकाता झाल्यानंतर राममाधवांच्या पगारी प्रचारकांनी (ट्रोल्स) त्यांचा मोर्चा जम्मू विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे वळविला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व नवी जीवनप्रणाली याविषयीच्या विद्यार्थी व तरुणांच्या आग्रहाला देशविरोधी ठरविण्याचा आपला इरादाही त्यांनी स्पष्ट केला आहे. जम्मूचे विद्यापीठ सा-या देशातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणारे राष्ट्रीय प्रकृतीचे आहे. त्यावर एकचएक भगवी संस्कृती लादण्याचा प्रयत्न यशस्वी कसा होणार? तेथील विद्यार्थ्यांनी आपली भोजनगृहे स्वच्छ असावी आणि त्यात आठवड्यातून दोनदा मांसाहारी जेवण दिले जावे अशी मागणी कुलगुरूंकडे केली. ती अमान्य करतानाच मांसाहार अराष्ट्रीय असल्याचे भगवे भाष्यही त्यांनी विद्यार्थ्यांना ऐकवले. (देशातील ७० टक्क्यांएवढे लोक मांसाहारी आहेत. कुलगुरूंच्या या मतानुसार ते सारे देशविरोधी ठरतात.)
या विद्यापीठात केरळातून आलेल्या एका कलापथकाने आपल्या कार्यक्रमाच्या शेवटी ‘लाल सलाम’ अशी घोषणा केली. तेथे हजर असलेल्या राममाधवी ट्रोलांनी ती व्हायरल करून हे विद्यार्थी तेलंगणातील नक्षलवाद्यांशी, काश्मिरातील अतिरेक्यांशी, पाकिस्तानातील घुसखोरांशी आणि थेट म्यानमारमधील रोहिंग्यांशी जुळले असल्याचा प्रचार सुरू केला. त्यातून गोंधळ, हाणामाºया, कुलगुरूंची नाचक्की, सरकारची बदनामी आणि कुलगुरूंची हकालपट्टी असे सारे झाले.
जेव्हा विद्यार्थी एखादे आंदोलन हाती घेतात तेव्हा ते क्रमाने समाजाचे होते. १९६७ मध्ये कोहन बेंडिटने पॅरिसमध्ये केलेल्या तशा आंदोलनाने युरोपातील ११ सरकारे जमीनदोस्त केली. १९८० मध्ये आसामातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने तेथील राजकारणच संदर्भहीन केले व तेथे सत्तांतर घडवून आणले. विद्यार्थी आणि तरुणाईला डिवचू नये हा धडा यातून जगभरच्या राज्यकर्त्यांनी घेतला. पण आपल्या जुनाट परंपरा इतरांवर लादण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या सध्याच्या सत्ताधारी मनोवृत्तीच्या गावीही या धड्याची जाण पोहचलेली दिसत नाही. तीत फक्त आज्ञा करणारे आणि त्याबरहुकूम हातपाय व लाठ्या चालवणारेच तेवढे असतात. त्यातली बौद्धिकेही गेल्या ७५ वर्षांत बदलली नसतात. बदलांकडे पाठ फिरविणाºया बंदिस्त संघटनांचे एकारलेपण तरुणाईला व नव्या पिढ्यांना मानवणारेही नाही. परंपरा म्हणून ज्या गोष्टी गौरविल्या जातात त्यांचे खरे स्वरूपही कधीतरी समजून घेतले पाहिजे. दिवंगत झालेल्या पिढ्यांनी त्यांच्या सामाजिक व्यवहारासाठी सोयीचे म्हणून ठरविलेले नियम व पद्धती म्हणजे परंपरा. व्हॉल्टेअर म्हणाला, ‘ट्रॅडिशन इज द डेमॉक्रेसी आॅफ द डेड’. या परंपरा, त्यातले खानपान, त्यातल्या प्रार्थना आणि मुलींनी सातच्या आत घरात होणे या साºया आता कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत. आजच्या मुलांना पुन्हा एकोणिसाव्या शतकात नेऊन त्या त्यांच्यावर लादणे यापेक्षा त्यांच्या आजच्या आशाआकांक्षा समजून घेऊन त्यांच्याशी स्वत:ला जुळवून घेणे हे जुन्या पिढ्यांएवढेच सरकारच्याही गरजेचे आहे. मांसाहार देशविरोधी नाही, सगळे ऋषिमुनी, देवदेवता आणि इतिहासातली पूज्य स्थानेही तो घेतच असत. साºयाच परंपरा वाईट असतात असे कुणी म्हणत नाही. पण सुधारणेचे व स्वातंत्र्याचे लढे ज्या परंपरांविरुद्ध उभे होतात त्यांची चिकित्सा करायची की नाही? व ती करतानाचा आपला कल नव्या पिढ्यांकडे असावा की जुन्या?
ज्यांना करायच्या असतील त्यांनी पंचगव्याच्या पार्ट्या करायला आणि पोथीपुराणे वाचायलाही हरकत नाही. नाहीतरी माणसे बुवाबाबांच्या नादी लागत असतातच. यात्रा करतात, न सापडणाºया दैवतांचा माग घेतात. त्यांना कोण अडवतो? मात्र ज्यांना हे करायचे नाही त्यांच्यावर ते करण्याची सक्ती कराल तर आज सत्तेच्या बळावर तसे करण्यात काहीसे यश मिळेलही. सत्तेने विकत घेतलेली माध्यमेही मग अशा परंपराभिमान्यांचे कौतुक करतील. मात्र तेव्हा तरुणाई आपल्यापासून दूर गेली असेल आणि तिचा विरोध जागा झाला असेल.
तशीही दिल्लीपासून हैदराबादपर्यंतची आणि जम्मूपासून बनारसपर्यंतची विद्यापीठे त्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसह सरकारने दुखावलीच आहेत. आता किमान देशातील तरुणाईला व उरलेल्या विद्यापीठांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना डिवचण्याचे प्रयत्न सरकार व अन्य यंत्रणांकडून यापुढे होऊ नयेत. आताची मुले संगणकाच्या मदतीने विद्यापीठांवाचूनही आपल्या फार पुढे गेली आहेत आणि ती आपल्याएवढी जात्यंध व धर्मांधही राहिली नाहीत ही बाब साºयांनी समजून घ्यायची आहे.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येने आणि गुजरातसह देशातील अनेक राज्यांत दलित तरुणांना गोरक्षकांनी केलेल्या अमानुष मारहाणीने समाजातील एक मोठा वर्ग सत्तेवर नाराज आहे. तसाही समाजाचा प्रवास प्रथा-परंपरा आणि जुन्या रुढी व त्यांनी जीवनावर घातलेले निर्बंध यांच्याविरुद्ध व स्वातंत्र्य व औदार्य यांच्या दिशेने होणारा आहे. या काळात नव्या पिढ्यांच्या पायात जुन्याच संस्कारांच्या बेड्या सत्तारुढांचे वर्ग घालत असतील तर ते त्यांच्यावर व्हॉल्टेअरने सांगितलेली मृतांची लोकशाही लादत आहेत, असेच म्हटले पाहिजे.
(sdwadashiwar@gmail.com)