दानवे साहेब, आपण आहात म्हणून..!
By अतुल कुलकर्णी | Published: November 22, 2017 12:14 AM2017-11-22T00:14:22+5:302017-11-22T00:18:03+5:30
नमस्कार. खूप दिवसापासून आपल्याला पत्र लिहायची इच्छा होती. पण हिंमत होत नव्हती.
प्रिय रावसाहेब दानवे पाटील,
नमस्कार, खूप दिवसापासून आपल्याला पत्र लिहायची इच्छा होती. पण हिंमत होत नव्हती. आज रहावलं नाही बघा. आपल्या सारखा हिंमतवान नेता भाजपात आहे याचा भाजपाने गर्व बाळगावा तेवढा थोडाच...! कोणत्या वेळी काय बोलावं याचा आपल्याएवढा अभ्यास तर कुणाचाच नाही. अगदी काँग्रेसचे दिग्विजयसिंह देखील फिक्के पडावे आपल्यापुढे साहेब... आता परवाचंच पाहा ना... नगर जिल्ह्यात शेतक-यांनी आंदोलन केलं तर त्या देवेनभाऊंच्या पोलिसांनी त्यांच्या अंगावर गोळ्या घातल्या. ही काय पध्दत आहे का साहेब...? शेवटी तुम्हालाच पुढे येऊन सांगावं लागलं की, गोळ्याच घालायच्या तर पायावर मारा... आपली मात्रा एकदम लागू पडली ना साहेब. सगळे शेतकरी आता लांबून जरी पोलीस येताना दिसला तरी पाय लपवून पळून जातात. शेवटी कसं आहे ना, आपण पडला हाडाचे शेतकरी. त्यांना कोणत्या भाषेत सांगितलं म्हणजे कळतं हे आपल्याशिवाय कुणाच्या लक्षात येणार...? मागे नाही का, एवढं सगळं आपल्या सरकारनं शेतकºयांना देऊ केलं तरी त्यांच्या मागण्या काही संपत नव्हत्या. त्यामुळे आपण त्यांना ‘साले ऐकतच नाहीत...’ असं म्हणालात आणि सगळे एकदम गप्पगार झाले ना राव...
मला तर काय वाटतं सांगू का, आपलं सरकार एवढं चांगलं काम करतंय, ते या विरोधकांना पाहवत नाही. म्हणून ते असे संप घडवून आणताय. तेव्हा आपण देवेनभाऊंना आदेश का देत नाही, एक जीआरच काढा म्हणावं... आंदोलन करणाºया शेतकºयांच्या पायावर, अंगणवाडीतार्इंच्या पाठीवर, एसटी कर्मचाºयांच्या पोटावर, शिक्षकांच्या हातावर मारण्याचा आदेशच काढून टाका म्हणावं. म्हणजे एक आंदोलन होणार नाही...
आपण असं काही बोलला की विरोधक लगेच आपला बुद्ध्यांक तपासा म्हणतात. पण त्यांना काय माहिती आपण काय चीज आहात ते...! एकनाथ खडसेंना वाटायचं रावसाहेब आपल्याच बाजूनं आहेत... पण ते मंत्रिमंडळातून घरी जाणार हे आपण दोन तीन महिने आधीच आपल्या मित्रांना सांगून ठेवल्याचं गुपीत कुठं त्यांना माहितीयं... आता नारायण राणे मंत्री व्हावेत असं फक्त आपल्याला आणि चंद्रकांत दादांनाच वाटतं, असा समज करून देत राणेंच्या विरोधात आपणच फटाके लावल्याचं अजूनही त्यांना कळालेलं नाही. काही म्हणा साहेब, आपण आहात म्हणून पक्ष चालूयं... नाहीतर एकट्या देवेनभाऊंचं काही खरं नव्हतं...