लोकमानसाची योग्य दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:42 AM2017-08-04T00:42:07+5:302017-08-04T00:42:11+5:30
‘मन की बात’च्या माध्यमाने देशवासीयांच्या नियमित संपर्कात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता लोकांच्या हृदयाचा ठाव घेत त्यानुसार वागण्याबोलण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे.
‘मन की बात’च्या माध्यमाने देशवासीयांच्या नियमित संपर्कात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता लोकांच्या हृदयाचा ठाव घेत त्यानुसार वागण्याबोलण्याची कला चांगलीच अवगत झाली आहे. त्यांच्या विरोधकांनाही हे मान्य करावे लागेल. लोकांशी थेट संपर्क साधण्याचा त्यांचा स्वभाव देशवासीयांना भावला आहे. आपल्या संपर्कात येणाºया प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थात भावनांच्या या देवाणघेवाणीत सोशल मीडियाचीही मोठी भूमिका आहे. मध्यंतरी आग्राच्या मिर्झापूरमधील एका शेतकरी दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव पंतप्रधानांनी ठेवावे अशी इच्छा जाहीर केली होती. एरवी हा खुळेपणाच समजला गेला असता. पण मोदींनी त्यांना निराश न करता त्यांच्या कन्येचे ‘वैभवी’ असे नामकरण केले. अलीकडेच मोदींच्या अॅपचे लाँचिंग झाले. यावर त्यांनी लोकांच्या सूचना मागितल्या होत्या. पंतप्रधानांनी पुष्पगुच्छ स्वीकारु नये अशा आशयाच्या सूचनाही यावर प्राप्त झाल्या होत्या. आपण एकट्याने पुष्पगुच्छ स्वीकारणे बंद केले तरी वर्षाला दीड कोटी रुपयांची बचत होईल, हे लक्षात आणून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशांतर्गत दौºयात पुष्पगुच्छ देऊ नका असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. हा निर्णय स्वागतार्ह असाच आहे. पंतप्रधानांप्रमाणेच इतर नेते, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांनीही त्याचे पालन केल्यास पुष्पगुच्छांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार असून गरिबांसाठी राबविल्या जाणाºया योजना आणि सामाजिक उत्थानासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. पुष्पगुच्छांवर खर्च केला जावा की जाऊ नये यावर नेहमीच चर्चा होत असते. पुष्पगुच्छ खरेदी बंद झाल्यास फुलांचा व्यवसाय करणाºयांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु भावना व्यक्त करण्यासाठी दिला जाणारा ५०० ते १००० रुपयांचा हा पुष्पगुच्छ अवघ्या काही मिनिटातच कोमेजतो आणि कचरापेटीत जातो, हे सुद्धा एक वास्तव आहे. हा पैसा विधायक कार्यात लागू शकतो. यासंदर्भातील एक स्तुत्य उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंटस् असोसिएशनतर्फे राबविला जात आहे. दीक्षाभूमी अथवा चैत्यभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता पुष्पहार अथवा फुले आणण्यापेक्षा एक वही व पेन आणावा, असे आवाहन संघटनेने केले आहे आणि हा उपक्रम यशस्वी ठरतो आहे. या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. देश आणि देशवासीयांप्रती असलेली हीच संवेदनशिलता कुठल्याही देशास प्रगतीपथावर नेत असते.