राजकीय नाट्यात देशमुखांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

By किरण अग्रवाल | Published: June 26, 2022 05:43 PM2022-06-26T17:43:00+5:302022-06-26T17:47:27+5:30

सारांश : बुलडाण्यात पक्षाऐवजी नेत्यांशी निष्ठा असल्याचे अधोरेखित

Deshmukh did 'correct program' in political drama! | राजकीय नाट्यात देशमुखांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

राजकीय नाट्यात देशमुखांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

Next

किरण अग्रवाल

शिवसेनेतील बंडातून आमदार नितीन देशमुख यांनी बाहेर पडून सत्तेचे राजकारण करू पाहणाऱ्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला आहे. उद्या राजकीय जोडतोड काहीही होवो; पण देशमुखांची ही व्हाया गुवाहाटी, सुरतेहून सुटकेची हाराकिरी नोंद घेण्याजोगीच ठरून गेली आहे, हे नक्की.

--------------------------

राज्याच्या राजकारणात घडून आलेल्या भूकंपामुळे सध्या जर-तरच्या शक्यतांची चर्चा जोरात आहे; पण त्याचसोबत पक्षाऐवजी व्यक्तिगत निष्ठांची चलतीही अधोरेखित होऊन गेली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही आमदार गुवाहाटी मुक्कामी असून, आता त्यांचे समर्थनही सुरू झाल्याने ही व्यक्तीनिष्ठा उघड झाली आहे.

---------------------

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षात घडवून आणलेल्या बंडामुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. अर्थात शिवसेनेला बंडाळ्या नवीन नसल्या तरी, यंदाचे बंड मोठे आहे व त्याची धग पक्ष संघटनेला मोठ्या प्रमाणात बसण्याची लक्षणे दिसत आहेत. विशेष बाब अशी की, या बंडातही वऱ्हाडातील नेत्यांनी चर्चेचा झोत आपल्याकडे राखून या संदर्भातील परंपरा अबाधित राखली म्हणायचे. विद्यमान सरकारच्याच प्रारंभीच्या काळात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित दिसलेले राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे नंतर माघारी फिरत पक्षासोबत राहिल्याचे दिसले होते, त्याचप्रमाणे आताच्या शिंदे यांच्या बंडात प्रारंभी सहभागी दिसलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख हे तेथून सुटका करून घेत अकोलामार्गे मुंबईत परतले आहेत. या सुटकेच्याही वेगवेगळ्या कथा पुढे येत आहेत, हा भाग वेगळा; परंतु यासंदर्भाने तेव्हाही व आजही घडलेल्या राजकीय नाट्यात अडचणीत आलेल्या पक्षासाठी या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचा इतिहास मात्र नोंदला गेला आहे.

---------------------

उद्या काय होईल, याबाबत सारे जर-तरच्याच पातळीवर असले तरी आमदार देशमुख यांनी यात बहुतेक साथीदारांच्या भूमिकेपेक्षा वेगळा विचार करीत त्यांच्यापासून निसटण्याची जी बाजी लावली ती कौतुकास्पद म्हणता यावी. पक्षातील अन्य काही सहकारी एकापाठोपाठ एक प्रवाहपतित होत असताना देशमुख यांनी असा बाणेदारपणा दाखवावा, हे यात लक्षणीय आहे. त्यामुळेच नागपुरात व अकोल्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. यातून देशमुख यांची उंची तर वाढलीच, शिवाय सामान्य शिवसैनिकांची द्विधा अवस्थाही दूर झाली. राजकारणात सर्वच निर्णय लाभाचे ठरतात असे नाही. प्रसंगी नुकसान पत्करण्याची तयारी ठेवूनही निर्णय घ्यावे लागतात; पण असे होते तेव्हा त्यातून संबंधितांची प्रतिमा अधिक उजळून निघाल्याखेरीज राहत नाही. देशमुखांच्या वापसीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाकडे त्याच दृष्टीने बघता यावे.

--------------------–-

बुलडाण्यात मात्र संजय रायमुलकर व संजय गायकवाड हे दोन्ही आमदार शिंदे यांच्यासोबत आहेत. या दोघांच्या निवडीत महत्त्वाची भूमिका असलेले खासदार प्रतापराव जाधव हे शिंदेंसोबत नसल्याचे सांगत असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा भाजप परवडली, असे ते म्हणतात; यावरून त्यांचा कल लक्षात यावा. पूर्णपणे जाधव यांच्या मर्जीतील दोन्ही आमदार थेट काटकोनात वळून शिंदेंकडे जातात कसे, असा प्रश्न म्हणूनच शंकांना जन्म देणारा ठरला आहे. यातही लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्यांनी घडविले त्या जाधवांना विश्वासात न घेता हे दोन्ही आमदार शिंदेंकडे गेले असतील याबाबत कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. ज्येष्ठतेसोबतच पक्षातील संपर्क प्रमुख पदाचीही जबाबदारी असलेल्या जाधवांच्या जिल्ह्यात अपवाद वगळता त्यांचे समर्थनच होतांना दिसते, ते त्यामुळेच. खासदार जाधव असोत की दोघे आमदार, बुलडाणा जिल्ह्यात पक्षापेक्षा या नेत्यांवर निष्ठा असणाराच वर्ग असल्याचे यातून स्पष्ट व्हावे. तेव्हा असे का झाले?, जागोजागी पक्षापेक्षा नेत्यांच्या निष्ठेचे पेव का वाढीस लागले, याचाच विचार पक्षाने गांभीर्याने करण्याची गरज आहे.

--------------------

विदर्भातील शिवसेनेच्या तिघा खासदारांपैकी एक असलेल्या वाशिमच्या भावना गवळी यांनीही बंडखोरांची भावना समजून घेण्याची वकिली पक्षप्रमुखांकडे केल्याचे पाहता शंकांना संधी मिळून जावी. त्यांच्यामागे लागलेल्या ‘ईडी’च्या चौकशीचा फेरा लक्षात घेता या शंकांना आधार लाभत असल्याचा अंदाज बांधला गेला तर त्याकडेही दुर्लक्ष करता येऊ नये; पण वाशिममध्येही व्यक्तीनिष्ठांची मांदियाळी अधिक असल्याने संभ्रमाचेच चित्र आहे.

-------------------------------

सारांशात, राज्यातील राजकीय उलथापालथीच्या प्रयत्नातून निष्ठांचा बाजार चर्चेत येऊन गेला असून, या बंडात बुलडाणा जिल्ह्यातील दोघा आमदारांचा समावेश असल्याने व अकोल्याचे देशमुख माघारी आल्याने वऱ्हाडाचा डंका वाजून जाणे स्वाभाविक ठरले आहे.

Web Title: Deshmukh did 'correct program' in political drama!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.