आरडाओरड करूनही भाजपा लक्ष देईना, सेनेचा खेळ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 03:58 AM2018-10-25T03:58:28+5:302018-10-25T03:58:46+5:30
जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही़ महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा, वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार, जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात.
भारताच्या रंगमंचावर सुरू असलेल्या राजकीय महानाट्यात एक विनोदी प्रवेश आहे आणि त्या प्रवेशाने त्या कंटाळवाण्या नाटकात थोडीशी गंमत आणली आहे. या प्रवेशात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही दोन पात्रे आहेत आणि त्यांच्यात ‘सोडवेना, धरवेना’ अशा ओढाताणीचा खेळ चालला आहे. त्या खेळालाही आता चार वर्षे झाल्याने तो संपावा असे प्रेक्षकांना वाटू लागले आहे. पण भाजपा ही पार्टी आपली अहंता सोडायला तयार नसल्याने आणि शिवसेना ही तिची जिद्द संपवित नसल्याने त्या खेळात अजून रममाण आहे. सेनेचा एक पाय सत्तेत आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार तो सत्तेसाठी नसून जनसेवेसाठी आहे, उलट भाजपाचे सारे हातपाय व डोकेही सत्तेत आहे. तो पक्ष मात्र जनसेवेऐवजी ईश्वरी सेवेची भाषा बोलणारा आहे. त्यातून भाजपाने बांधलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी या मोटेबाहेर सेनेला स्थान नाही. एकेकाळी तिला शरदकाकांविषयी विश्वास वाटला होता, पण ते काकाच ऐनवेळी भाजपाच्या मदतीला व फडणवीसांचे सरकार वाचवायला त्या पक्षाकडे गेले. (त्यांचे अनेक सहकारी ईडी किंवा सीबीआय या तपास यंत्रणांखाली अडकले असण्याचाही तो नाइलाज आहे). तसे शरदकाका हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुढारी असले तरी अविश्वसनीयतेबाबतचीही त्यांची ज्येष्ठता श्रेष्ठ दर्जाची आहे. या स्थितीत सेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाषा बोलणे व त्यासाठी जास्तीत जास्त आक्रमक पवित्रे घेणे समजण्याजोगे आहे. तरीही उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत भाजपावर केलेला देशद्रोहाचा आरोप गंभीर म्हणावा असा आहे. ‘खोटे बोलून सत्ता मिळविणे हा देशद्रोहच’ असा घणाघाती घाव त्यांनी भाजपावर घातला आहे. भाजपा त्याला उत्तर देणार नाही, कारण या भाषेतली खरी हवा त्या पक्षाला समजणारी आहे. जाऊन जाऊन कुठे जातील आणि जायला तरी त्यांच्याजवळ दुसरी जागा कुठे आहे हे भाजपाला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे लहान मुलांनी भांडणात शिवीगाळ केली तसेच हे आहे, असा भाजपाचा पवित्रा राहील. सेनेला काँग्रेससोबत जाता येत नाही. राष्ट्रवादीवर तिचा विश्वास नाही, बसपा-शेकाप किंवा रिपब्लिकन हे पक्ष तर तिच्या रिंगणाबाहेरचेच आहेत. त्यातून देवेंद्र फडणवीस अनेकवार नम्रपणे म्हणाले आहेत, ‘आम्हाला युतीशिवाय गत्यंतर नाही.’ सेनेने बहुधा त्यांचा नम्रपणा त्यांच्या खऱ्या अर्थानिशी अद्याप समजून घेतला नाही. जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही आणि महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार आणि जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात. त्यांच्यामागे विकासाचे काम असावे लागते. सेनेचा त्याच्याशी संबंध नाही, तिला सरकारविरोधी आंदोलन करता येत नाही, विरोधकांच्या आंदोलनात सहभागी होता येत नाही, सरकारात राहून त्यावर लहानसहान दगडफेक करणे तिला जमणारे आहे. शिवाय सेनेने धर्माची व राम मंदिराची भाषा उचलली आहे. त्यामुळे स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारा दुसरा कोणताही पक्ष वा संघटना सेनेसोबत येणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीपर्यंत सर्व काही विसरून व केलेली शिवीगाळ मुकाट्याने गिळून सेनेला भाजपासोबतच जावे लागणार आहे. फावल्या वेळात आपली माणसे जोडून ठेवणे आणि त्यातले कोपरे बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेणेच तिला भाग आहे. सेनेची सध्याची दगडफेक हा त्याच मर्यादित राजकारणाचा भाग आहे. एक पर्याय आणखीही आहे, भाजपा व सेनेने निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची व स्वतंत्र युती करायची. पण आपल्यापेक्षा भाजपाचे आमदार जास्त असल्याचा अनुभव पूर्वीसारखाच याही वेळी येईल याची धास्ती सेनेला आहे. त्यामुळे आरोप व शिवीगाळ यांच्या मदतीने आपले वजन व उपद्रवमूल्य वाढविता येईल तेवढे वाढवून घेणे हा सेनेचा प्रयास आहे आणि त्या प्रयासात आता सेनेचे सगळेच पुढारी चांगले तरबेज झाले आहेत. त्यांचे दु:ख एकच आहे, आम्ही आरडाओरड केली तरी भाजपावाले मात्र आमच्याकडे गंभीरपणे सोडा, पण ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे राजकारणातला हा विनोदी प्रवेश येत्या निवडणुकीपर्यंत आपल्याला पाहावा लागेल एवढेच!