पावसाचे घटणारे प्रमाण दिवसेंदिवस चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 05:43 AM2019-05-21T05:43:05+5:302019-05-21T05:43:21+5:30
भारतीय हवामान खात्याने मान्सून आणखी दोन दिवस उशिराने केरळात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे एकूच सर्व चर्चा बेभरवशाच्या मान्सूनवर केंद्रित झाली.
भारतीय हवामान खात्याने मान्सून आणखी दोन दिवस उशिराने केरळात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे एकूच सर्व चर्चा बेभरवशाच्या मान्सूनवर केंद्रित झाली. अर्थात, यातदेखील आपल्या एकूण परंपरेला अनुसरून राजकीय फायदा वा नुकसान हा भाग अधिक महत्त्वाचा होता. त्यामुळे नेमकं वातावरण बदल ही संकल्पना प्रत्यक्षात येऊनदेखील, म्हणजे अगदी अनुभवास येत असूनही त्याबाबत मात्र फार जागरूकता दिसत नाही. तेव्हा पाऊस उशिराने येणं-जाणं या गोष्टीचा संबंध आपण जी परिस्थिती भविष्यात प्रत्यक्ष उद्भवणार आहे, त्या विषयाशी आहे, हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून तात्कालिक मलमपट्टीद्वारे कर्जमाफी वा तत्सम उताऱ्यांचा उपाय रोगापेक्षा औषध भारी असा ठरणार आहे.
भारत सरकारच्या केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्रालयाने मान्सून मिशनअन्वये मान्सून अंदाजाविषयी जे उपक्रम राबविले आहेत, त्यामधील संशोधनाकडे लक्ष देऊन विचारपूर्वक उपाययोजना करणं अभिप्रेत आहे. हिंदी महासागर हा वेगाने तापू लागल्यामुळे दक्षिण आणि मध्य आशियातल्या मान्सूनचा जोर कमी आणि त्याबरोबर कालावधी कमी होऊन एकूणच संपूर्ण ‘लँडमास’ (भूपृष्ठ) अधिकाधिक शुष्क बनत चाललंय. गेल्या एक शतकाच्या मान्सूनविषयक आकडेवारीच्या नैऋत्य पाकिस्तान ते हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या आणि पूर्वकडे बांगलादेशपर्यंत पावसात सुमारे एक पंचमांशाने घट झालीय. त्यामुळे कराचीत गेल्या साडेतीन दशकांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती असण्यामागे हे प्रमुख कारण आहे.
नैऋत्य मान्सून जून ते सप्टेंबर या कालावधीत सक्रिय असतो आणि त्यामुळे प्रामुख्याने कोरडवाहू शेती अजूनही असलेल्या दक्षिण आणि मध्य आशियातील पावसाची ८० ते ९० टक्के निकड भागते. त्यामध्ये काही बिघाड झाल्यास या संपूर्ण क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्राला त्याचा तडाखा बसतो. ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात प्रकाशित निष्कर्ष हा व्यापक अभ्यासाअंती काढण्यात आला होता. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मिटीरिआॅलॉजी (भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था) मधील रॉक्सी मॅथ्यू कोल आणि त्यांच्या विद्यार्थिनी रितिका कपूर आणि अमेरिकेच्या मेरी लँड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केलं होतं. पाठोपाठच्या वर्षी अनुभवास येत असलेली स्थिती आणि गेल्या १८ वर्षांपैकी सात वर्षांत पडलेला दुष्काळ या दृष्टीने विचार करता हे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. चेन्नईत नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ मध्ये पडलेला प्रचंड पाऊस आणि पावसात वारंवार पडत असलेल्या खंडाची स्थिती या दोहोंच्या वारंवारितेत वाढ होणार आहे. २०१५ मधील अल निनोदेखील नोंदविलेल्या इतिहासातील सर्वात तीव्र होता. त्याचबरोबर, हिंदी महासागर वेगाने तापू लागल्यामुळे पावसाची तीव्रता संपूर्ण दक्षिण-पूर्व किनारपट्टीवर व्यापक होती.
भारत आणि दक्षिण आशियाच्या इतर भागांत फारसा पाऊस पडताना दिसत नाही, उलट कोरडेपणा वाढतोय. मान्सून म्हणजे जणू महासागरांचं पाणी भारतीय भूभागावर पोहोचणं. या ओलाव्याने थबथबलेल्या मोसमी वाºयावर सत्ता असते सागर आणि जमिनीमधील तापमान फरकाची. उन्हाळ्यात जमीन तापते आणि सागर गार असतात. त्यामुळे वारे जमिनीच्या दिशेने वाहतात, परंतु डॉ. नील यांच्या संशोधनातून असं लक्षात आलंय की, यात खूप फरक पडतोय. कारण हिंदी महासागर खूप मोठ्या प्रमाणात तापू लागलाय. यात हवेतील प्रदूषकांमुळे सौर प्रारणांचं परावर्तन झाल्यामुळे जमीन कमी तापण्याची बाब भर घालताना दिसतेय. त्यामुळे हिंदी महासागर वातावरणातील आर्द्रता वाढवत असला आणि अधिक पाऊस पाडत असला, तरी कमकुवत मान्सून वाऱ्यांमुळे जमिनीवर पाऊस पोहोचणं अवघड बनलंय. त्यामुळे पाऊस महासागरांवरच मोठ्या प्रमाणात पडताना अनुभवास येतोय. त्यामुळे भारतामध्ये पावसाचं प्रमाण झपाट्यानं कमी होतेय. ते मध्य आणि पूर्व भारतामध्ये खूपच लक्षणीय म्हणजे, गेल्या अर्ध्या शतकात १० ते २० टक्क्यांनी कमी झालेय.
हिंदी महासागर तापल्याने वाईट परिणाम दीर्घकालिक असून, त्यामुळे हळूहळू पावसाचं प्रमाण घटतंय. एखाद्या विशिष्ट वर्षाच्या म्हणजे उदाहणार्थ, २०१९ च्या पावसावर त्याचा काय परिणाम होईल, हे ठरवणं तसं कठीण आहे, परंतु अल निनो आणि हिंदी महासागर तापणं यांचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रातील ६० टक्के अवर्षण परिस्थिती बघता, संपूर्ण देशाचा एकत्रित विचार करता वाईट आहे.
-शैलेश माळोदे । विज्ञान पत्रकार