विकास व पर्यावरणाचा समन्वय गरजेचा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 03:10 AM2018-07-30T03:10:10+5:302018-07-30T03:10:36+5:30
विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा उफाळला आहे.
- रवी टाले
विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष नवा नाही. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा उफाळला आहे.
उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या रेल्वेमार्गांपैकी एक असलेल्या जयपूर-हैदराबाद मार्गाचा एक टप्पा असलेला अकोला-खांडवा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून जातो. मीटरगेज मार्ग असलेल्या जयपूर-हैदराबाद मार्गातील अकोला-खांडवा व इंदूर-खांडवा या दोनच टप्प्यांचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करणे बाकी आहे. पर्यावरण आणि वन्य जीवनासाठी धोकादायक असल्याच्या आक्षेपांमुळे ते रखडले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला-खांडवा टप्प्याच्या रुंदीकरणातील अडथळे दूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र पर्यावरणवाद्यांनी आता पुन्हा एकदा हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यवर्ती समितीपुढे नेला आहे.
आज मनुष्यजात अशा वळणावर उभी आहे, जिथे पर्यावरण रक्षण आणि विकास या दोन्हींची नितांत आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येची भूक आणि इतर गरजा भागविण्यासाठी विकास आवश्यक आहे, तर पर्यावरणाची हानी मनुष्यजातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करू बघत आहे. त्यामुळे दोन्हींचा समन्वय साधणे नितांत गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली मनुष्य जातीने आधीच पर्यावरणाची अपरिमित हानी केली आहे. त्यामध्ये आणखी भर घातल्यास भावी पिढ्या आम्हाला अजिबात माफ करणार नाहीत. दुसरीकडे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली विकासाला नकारही देता येत नाही.
विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्ष काही आमच्या देशापुरताच मर्यादित नाही. इतर देशांमध्येही असे प्रसंग नित्य उद्भवत असतात; मात्र ते तंत्राचा वापर करून पर्यावरणास हानी न पोहोचविता विकास प्रकल्प मार्गी लावतात. केनिया हा आफ्रिका खंडातील एक मागास देश आहे. कोणत्याही बाबतीत भारताच्या पासंगासही न पुरणारा! केनियातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या अभयारण्यातून रेल्वेमार्ग नेण्याचा पेच त्या देशाच्या सरकारपुढेही उभा ठाकला होता; मात्र रेल्वेमार्ग उभारणीचे कंत्राट घेतलेल्या चीनच्या कंपनीने वन्य जीवनास धोका निर्माण न करता रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले. त्यासाठी समतल रेल्वेमार्गाऐवजी उन्नत रेल्वेमार्गाचा पर्याय निवडण्यात आला. वन्य जीवांना रेल्वेमार्गावर जाता येऊ नये, यासाठी मार्गाच्या दोन्ही बाजूंना उंच व मजबूत कुंपण घालण्यात आले आणि त्यांना रेल्वेमार्ग ओलांडता यावा यासाठी ठराविक अंतरावर भरपूर अंडरपास निर्माण करण्यात आले. त्यामुळे रेल्वेमार्गाचा खर्च वाढला खरा; पण वन्य जीवांना सुरक्षितता लाभली. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. अंडरपासखाली सिंह आणि इतर वन्य श्वापदांची पदचिन्हे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. याचा अर्थ त्यांनी अंडरपासचा वापर सुरू केला आहे. भारतातही या तंत्राचा वापर करण्याची चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे; पण अद्याप तरी मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी झालेली नाही. अकोला-खांडवा रेल्वेमार्गाच्या निमित्ताने तो प्रयोग झाल्यास, विकासासाठी आतुरलेली या भागातील जनता दुआ देईल!