राजकीय साठमारीत ‘विकास’ गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 09:08 PM2020-11-10T21:08:19+5:302020-11-10T21:15:02+5:30
- मिलिंद कुलकर्णी राज्याला दिशा देण्याचे सामर्थ्य असलेले नेते खान्देशात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय साठमारी वाढली. एकमेकांना ...
- मिलिंदकुलकर्णी
राज्याला दिशा देण्याचे सामर्थ्य असलेले नेते खान्देशात आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय साठमारी वाढली. एकमेकांना संपविण्याचा नादात नेत्यांनी शक्तीपात करुन घेतला. त्याचा परिणाम खान्देशच्या विकासावर झाला. दिल्ली आणि मुंबईकडे हात पसरल्याशिवाय काही मिळणार नाही, अशी दयनीय स्थिती निर्माण झाली.
प्रतिभाताई पाटील, मधुकरराव चौधरी, रोहिदास पाटील, एकनाथ खडसे यांच्यासारखे दिग्गज नेते खान्देशात असूनही मुख्यमंत्रीपद कधी मिळाले नाही, याची खंत तमाम खान्देशवासीयांना आहे. प्रतिभाताई पाटील यांना देशाचे राष्टÑपतीपद देऊन काँग्रेसने खान्देशचा बहुमान केला. तार्इंच्या या पदामुळे खान्देशचे काही प्रश्न मार्गी लागले. जळगावचे विमानतळ अस्तित्वात आले. जिल्हा क्रीडांगण तयार झाले. मुक्ताईनगरमधील उपसा सिंचन योजनेसाठी निधी मंजूर झाला. असा प्रत्येक नेत्याने पदावर असताना खान्देशला लाभ मिळवून दिला. परंतु, अलिकडे राजकीय साठमारीत विकासाच्या निव्वळ गप्पा होत आहे, त्यासाठी कोणीही ठोस प्रयत्न करताना दिसत नाही.
नेत्यांनी केलेल्या विकास कामांची खान्देशच्या इतिहासात निश्चितच नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर सुरुपसिंग नाईक व माणिकराव गावीत या जोडगोळीने दुर्गम भागात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. कोरोना काळात आरोग्य क्षेत्रातील हेच जाळे प्रभावशाली ठरले. डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.हीना गावीत यांनी वैयक्तीक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही अलिकडची त्यांची मोठी उपलब्धी आहे.
धुळ्यात रोहिदास पाटील, अमरीशभाई पटेल या नेत्यांनी नेतृत्व केले. दिल्ली - मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉरचा दुसरा टप्पा नरडाणा येथे आणण्यात योगदान दिले. शिरपूरसारख्या छोटया शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे मोठे कार्य अमरीशभाई पटेल यांनी केले. जलक्रांतीचा शिरपूर पॅटर्न तर देशभर सुपरिचित आहे.
जळगावात मधुकरराव चौधरी, जे.टी.महाजन, प्रतिभाताई पाटील, प्रल्हादराव पाटील, सुरेशदादा जैन, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी नेतृत्व आणि कर्तुत्वाची छाप उमटवली. जळगाव जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे मोठे जाळे चौधरी यांच्या प्रयत्नाने उभे राहिले. सिंचन प्रकल्प उभारले गेले. जे.टी.महाजन यांचे सहकार क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. सुरेशदादा जैन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी व्यापारी संकुलाचा अभिनव प्रयोग राबविला. स्वमालकीची १७ मजली प्रशासकीय इमारत बांधणारी देशातील पहिली ह्यअह्ण वर्ग नगरपालिका म्हणून जळगावचा लौकीक झाला. एकनाथ खडसे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषी महाविद्यालयापासून तर तापी पाटबंधारे विकास महामंडळापर्यंत विकासाची गंगा आणली. गिरीश महाजन यांनी जळगावला मेडिकल हब बनविण्याचा अभिनव प्रकल्प राबविला. पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले. इतर पॅथी आणि रुग्णालयांचा पुढील टप्प्यात समावेश आहे.
२०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर खान्देशच्या राजकीय चित्रात अचानक मोठा बदल झाला. त्याचे पडसाद अद्यापही उमटत आहे. नंदुरबारातील सुरुपसिंग नाईक - माणिकराव गावीत ही जोडगोळी फुटली. गावितांचे पूत्र भरत हे नाईकांच्या पूत्र शिरीष यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीत लढले. चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेचे धन्युष्यबाण हाती घेतले. धुळ्यात अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे यांचा गट भाजपमध्ये सहभागी झाला. अनिल गोटे राष्टÑवादीत गेले. जळगावात खडसेवर भाजपची खप्पा मर्जी कायम राहिली. त्यांचे तिकीट कापून कन्येला दिले मात्र ती पराभूत झाली. आता तर त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधत राष्टÑवादीत प्रवेश केला. डॉ.सुभाष भामरे यांच्यारुपाने केद्रीय मंत्रिमंडळात गेल्यावेळी मिळालेले स्थान यंदा मात्र राहिले नाही. के.सी.पाडवी, गुलाबराव पाटील हे काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री वर्षभर प्रभावशाली आहेत. खडसे यांच्या राष्टÑवादी प्रवेशामुळे समीकरणे बदलली. अनिल गोटे, उदेसिंग पाडवी हे त्यांना खान्देशचे नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राजकीय साठमारी सुरु झाली आहे. आरोप - प्रत्यारोपांचा धुराळा कायम आहे. यात विकासाचे विषय गायब आहे. वरणगावचे राज्य राखीव पोलीस दलाचे दोनदा मंजूर झालेले प्रशिक्षण केद्र रोहित पवार यांनी जामखेड या त्यांच्या मतदारसंघात पळवून नेले. ते परत आणण्याच्या राणा भीमदेवी गर्जना झाल्या. अलिकडे तीनदा गृहमंत्री जिल्ह्यात येऊन गेले. पण त्याविषयी चकार शब्द बोललेले नाही. हे एक उदाहरण झाले. अशी मोठी प्रलंबित कामांची यादी आहे. खान्देशच्या विकासासाठी तरी सर्व नेते एकत्र येतील काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.