बुलेट ट्रेनमुळे व्हावा महाराष्ट्राचाही विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:21 AM2017-09-16T00:21:35+5:302017-09-16T00:22:31+5:30
ब-याच काळापासून चर्चेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते साबरमती येथे पार पडला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नसताना बुलेट ट्रेनची गरजच काय, असा प्रश्न आतापर्यंत विचारला जात होता. यापुढेही तो विचारला जाईलच. पण आमच्या काळातच बुलेट ट्रेनचा करार झाला होता, असा दावा काँग्रेसने केला असल्याने त्या पक्षाच्या धोरणात बदल झाला, असे दिसते.
ब-याच काळापासून चर्चेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते साबरमती येथे पार पडला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नसताना बुलेट ट्रेनची गरजच काय, असा प्रश्न आतापर्यंत विचारला जात होता. यापुढेही तो विचारला जाईलच. पण आमच्या काळातच बुलेट ट्रेनचा करार झाला होता, असा दावा काँग्रेसने केला असल्याने त्या पक्षाच्या धोरणात बदल झाला, असे दिसते. गुजरातमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदी यांनी घाईघाईने आपल्या राज्यात भूमिपूजन केले, अशी टीका सुरू झाली आहे. त्यात तथ्यही आहे. पण प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेत असताना असे फायदे घेतच असतो. भाजपा त्यापेक्षा अजिबातच वेगळा नाही. किंबहुना यूपीएच्या सरकारने काश्मीरमध्ये कटरा हे भव्य रेल्वे स्थानक उभारण्याची सुरुवात केली, हे सर्वज्ञात असूनही मोदी यांनी उद्घाटनाच्या निमित्ताने त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बुलेट ट्रेन आपल्यामुळेच आली, असे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आश्चर्य वाटण्यासारखा नाही. मात्र बुलेट ट्रेनच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला अनेक प्रश्न पडले आहेत, त्यांचे निराकरण व्हायलाच हवे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचे महत्त्व कमी करून, येथील व्यापार, आर्थिक संस्था, महाराष्ट्रातील काही मोठे प्रकल्प यापुढील काळात गुजरातमध्ये नेले जातील, असे मराठी माणसाला वाटत आहे. बुलेट ट्रेनमुळे मुंबई व अहमदाबाद हे अंतर अवघ्या तीन तासांवर येणार असल्याने बरेच जण मुंबई सोडून गुजरातकडे धाव घेतील आणि त्यांना प्रोत्साहनही दिले जाईल, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यात कितपत तथ्य आहे, हे आताच सांगणे अवघड आहे. पण तसे होऊ नये आणि बुलेट ट्रेनमुळे जो आर्थिक विकास होईल, असे नरेंद्र मोदी म्हणत आहेत, त्यात महाराष्ट्रालाही वाटा मिळायला हवा. बुलेटच्या वेगाने आर्थिक राजधानीतील महत्त्वाच्या संस्था व यंत्रणा गुजरातच्या दिशेने धाव घेऊ लागल्यास, त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी मुंबईवर दावा सांगण्याचा प्रयत्न गुजराती नेत्यांनी केला होता. तेव्हापासून महाराष्ट्र व गुजरात यांच्यात काहीशी अढी आहेच. आताही कर्जाबरोबर जपानचे अनेक प्रकल्प गुजरातमध्येच येऊ घातले आहेत. असेच प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्याच्या भाजपा नेत्यांवर जबाबदारी मोठी आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक वाक्याला ‘हो’ म्हणण्याची सवय लागलेल्यांनी महाराष्ट्र अधिक महत्त्वाचे आहे, हे विसरून चालणार नाही. मुळात ही बुलेट ट्रेन गुजरातच्या अधिक भागातून आणि महाराष्ट्राच्या कमी भागातून धावणार आहे. तरीही दोन्ही राज्यांची त्यात समान गुंतवणूक असल्यामुळे महाराष्ट्रात नाराजी आहे. बुलेट ट्रेनचा अधिक फायदा ज्या राज्याला आहे, त्याच्यापेक्षा आपली रक्कम अधिक का असावी, असा प्रश्न त्यामुळेच विचारला जात आहे. अर्थात अशा प्रकल्पांमध्ये हे होतच असते. जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे केरळपर्यंत नेण्याचे ठरविले, तेव्हा त्या प्रकल्पात महाराष्ट्रातील अंतर सर्वाधिक होते. त्या तुलनेत महाराष्ट्राने केलेली गुंतवणूक मात्र खूपच कमी होती. इथे नेमके त्याउलट झाले आहे. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे बुलेट ट्रेन देशाची राजधानी दिल्लीपर्यंत गेली तरच ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल. मुंबई ते अहमदाबाद प्रवास करणा-यांचे प्रमाण पाहता, ती लवकर फायद्यात येईल का, याविषयी तज्ज्ञांनाही शंका आहे. कोकण रेल्वेही केरळमध्ये गेली, मालवाहतूक करू लागली, तेव्हाच व्यवहार्य ठरली. बुलेट ट्रेन तर केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच असल्याने ती फायद्यात आणणे सोपे नाही. ती गुजरातपुरतीच राहिल्यास रेल्वेमंत्र्यांवर आतापर्यंत होणारी टीका मोदी यांच्यावर होईल. प्रत्येक रेल्वेमंत्र्यांप्रमाणे पंतप्रधानही गुजरातपुरताच विचार करू लागले, अशी टीका झाल्याशिवाय राहणार नाही. या बुलेट ट्रेनसाठी जपानकडून कमी व्याजाने कर्ज मिळाल्यामुळे ती जवळपास फुकटच आहे, असे मोदी म्हणाले. पण जपानसह अनेक देशांनी यापूर्वीही अनेक योजनांसाठी असे कर्ज दिले आहे. त्यामुळे मोदी सरकारने वाटाघाटी करून कमी व्याजाचे कर्ज मिळवलेले नाही. या बुलेटसाठी आटापिटा करताना, देशातील रेल्वे सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे. पीयूष गोयल रेल्वेमंत्री झाल्यामुळे आपोआप बदल होणार नाहीत. सर्वात खालच्या पातळीवरची भरती थांबल्याने अनेक अपघात झाले आहेत. नको तिथे पैसा वाचवणे म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे. ते होता कामा नये. रखडलेले रेल्वे प्रकल्पही पूर्ण व्हावेत. बुलेट नको, वेळापत्रकानुसार व अपघाताविना गाड्या चालाव्यात, अशी सामान्यांची अपेक्षा आहे. मोदींचे मुंबई ते नागपूर अतिजलद रेल्वेकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसते. तिचा फायदा नाशिक, औरंगाबाद, अकोला व नागपूरला होणार आहे. पण या प्रकल्पाची चर्चाच नाही. नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत, असे मोदी म्हणाले. पण स्वप्ने लहान असोत की मोठी, ती प्रत्यक्षात आणणे अधिक गरजेचे आणि महत्त्वाचे. खरा कस त्यातच असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी मोदी यांच्याकडून मुंबई ते नागपूर ही अतिजलद रेल्वे मार्गी लावून घ्यायला हवी. बुलेट ट्रेनमुळे आणि बुलेट ट्रेनप्रमाणेच केवळ गुजरातचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विकासही व्हायलाच हवा.