ठोकून काढा; पण! ...पिचलेल्या सामान्य मतदाराचा आवाजही ऐकू येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 07:29 AM2024-07-23T07:29:42+5:302024-07-23T07:33:02+5:30

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला अपेक्षाभंग भाजप नेतृत्वाच्या  चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काहीही झाले, तरी विधानसभा आता जिंकायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे.

Devendra Fadanvis said knock it out; But! ...the voice of the frustrated common voter will also be heard, pune BJP Meeting Lokmat Editorial | ठोकून काढा; पण! ...पिचलेल्या सामान्य मतदाराचा आवाजही ऐकू येईल

ठोकून काढा; पण! ...पिचलेल्या सामान्य मतदाराचा आवाजही ऐकू येईल

‘ठोकून काढा’ असा नवा ‘आदेश’ कार्यकर्त्यांना देत, भारतीय जनता पक्षाने रविवारी विधानसभेचे बिगुल पुण्यात वाजवले. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या तमाम दिग्गज मंडळींनी विरोधकांवर यथेच्छ तोंडसुख घेतले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला अपेक्षाभंग भाजप नेतृत्वाच्या  चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे काहीही झाले, तरी विधानसभा आता जिंकायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रचाराची रणधुमाळी सुरू करण्याचे संकेत अधिवेशनातून सर्वांना दिले गेले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमतापासून दूर ठेवलेल्या राज्यांत महाराष्ट्र आघाडीवर होते. राज्यात सत्तांतर होईल, असे या निकालानंतर ठामपणे म्हटले जाऊ लागले. येणारी विधानसभा निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षांत राज्यात ज्या अभूतपूर्व घटना घडल्या आहेत, त्याचा हिशेब मतदार मागतील. गेल्या पाच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून सरकार चालविले. भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुरबुरी २०१९च्या निवडणुकीपूर्वीपासून दिसत होत्या. निवडणुकीनंतर अनपेक्षितपणे उद्धव यांनी आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केले. त्यापूर्वी अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याचा अयशस्वी प्रयोग देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यामुळे मुखभंग झालेल्या भाजपने राजकारणामध्ये आम्हीही कमी नाहीत, हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपल्याबरोबर घेऊन दाखवून दिले. अशा साऱ्या घडामोडींनंतर किमान आता तरी प्रतिस्पर्धी जवळपास निश्चित झाले आहेत. काँग्रेससह शरद पवार, उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदेसेना, अजित पवारांचा राष्ट्रवादी ही महायुती अशी लढत होईल.

या निवडणुकीतील आपला मुख्य प्रतिस्पर्धी कोण, हे अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेने दाखवून दिले आहे. शरद पवारांवरची जहाल टीका हा (देवेंद्र फडणवीसांच्या शब्दांत) ‘सेल्फ गोल’ कसा ठरतो, हे लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले. तरीही, आपल्या भूमिकेत भाजपने बदल केलेला दिसत नाही. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवताना पवारच पहाडासारखे उभे राहिले होते. लोकसभा निवडणुकीतही साऱ्या देशाचे लक्ष बारामती आणि पवारांकडे लागले होते. बारामतीचा बालेकिल्ला जिंकतानाच, सर्वाधिक ‘स्ट्राइक रेट’ ठेवून पवारांनी भाजपची काळजी वाढवली आहे. भाजपवर २०१९पासून टोकदार टीका करणारे उद्धव ठाकरेही या अधिवेशनात सर्वांच्या टीकेच्या अग्रस्थानी होते. पवार यांना भ्रष्टाचाराचे म्होरके संबोधतानाच उद्धव ठाकरे यांना ‘औरंगजेब फॅन क्लब’चे नेते असा उल्लेख अमित शाह यांनी केला. त्यातून भाजपचाही ‘अजेंडा’ स्पष्ट झाला ! लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा चालला नसला, तरी या निवडणुकीत तो आक्रमकपणे येण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून सुरू झालेली लढाई तेच सूचित करते. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन कसे होईल, याकडे भाजपचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत चुकीच्या ‘नॅरेटिव्ह’चा फटका बसल्याचे सांगून, विरोधकांना मैदानात उतरून ठोकून काढण्याची भाषा फडणवीसांनी केली. त्याचवेळी ‘हीट विकेट’ न होण्याचा सल्लाही दिला ! या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हाच भाजपचा चेहरा असल्याचेही या अधिवेशनाने स्पष्ट केले.

अधिवेशनात गाजला तो मराठा आरक्षणाचा मुद्दा. ‘महाराष्ट्रात भाजपच्या सत्ताकाळात मराठा आरक्षण दिले गेले. विरोधक सत्तेत आल्यानंतर ते गेले’, या ‘नॅरेटिव्ह’वर भर दिला गेला. आरक्षणासह भाजपचा ‘फ्लॅग प्रोजेक्ट’ असणारी लाडकी बहीण योजना, राज्याला मिळालेला निधी हे मुद्देही महत्त्वाचे. अधिवेशन पुण्यात घेऊन पुण्याचेही महत्त्व भाजपने अधोरेखित केले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कसब्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवल्यापासून पुण्याची दखल दिल्लीने घेतलेली दिसते. धंगेकरांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करणारे मुरलीधर मोहोळ केंद्रात त्यामुळेच मंत्री झाले. भाजपची विधानसभेसाठीची आक्रमक व्यूहरचना अधिवेशनातून पुढे आली. तिकडे शरद पवार, उद्धव ठाकरे हेदेखील शड्डू ठोकून ‘विधानसभा आता आपलीच’, या निर्धाराने मैदानात उतरले आहेत. या रणधुमाळीत महागाई, बेरोजगारीसह दैनंदिन समस्यांनी पिचलेल्या सामान्य मतदाराचा आवाजही ऐकू येईल, अशी अपेक्षा नक्कीच आहे!

Web Title: Devendra Fadanvis said knock it out; But! ...the voice of the frustrated common voter will also be heard, pune BJP Meeting Lokmat Editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.