फडणवीस आले, गडकरी गेले; याचा अर्थ काय?

By यदू जोशी | Published: August 19, 2022 12:36 PM2022-08-19T12:36:58+5:302022-08-19T12:40:20+5:30

Devendra Fadnavis and Nitin Gadkari : पंतप्रधानपदाचे मराठी माणसाचे स्वप्न गेली कितीतरी वर्षे अधुरेच राहिलेले आहे. कदाचित फडणवीसच ते पूर्ण करतील! ...उम्मीद पे दुनिया कायम है!!

Devendra Fadnavis came, Nitin Gadkari went; What does this mean? | फडणवीस आले, गडकरी गेले; याचा अर्थ काय?

फडणवीस आले, गडकरी गेले; याचा अर्थ काय?

Next

- यदु जोशी
(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील; पण, समजा उद्या ते दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं नितीन गडकरी नागपुरातील बावनकुळेंच्या सत्कारात म्हणाले. त्यानंतर आठच दिवसात भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी बाहेर गेले आणि फडणवीस समितीत आले. फडणवीस यांचा  दिल्लीत जाण्याचा हा आणखी पुढचा टप्पा आहे. २०२४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार बसवण्याचा त्यांचा संकल्प पूर्ण झाला तर त्यानंतर दीड-दोन वर्षात ते दिल्लीत जातील. पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळण्याची पूर्ण पात्रता आणि भाजप कार्यकर्त्यांची अतीव इच्छा त्यांच्या पाठीशी आहेच.  कदाचित, महाराष्ट्रातील यशाचे बक्षीस म्हणून त्यांना दिल्लीत लगेच मोठे  मंत्रिपद दिले जाईल. 

- यावेळी हाती आलेले त्यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हा त्याचे अनेक अर्थ काढले गेले. २०२४ मध्ये पुन्हा तसेच तर नाही होणार? पण एक नक्की की फडणवीस कालही थांबले नव्हते, आजही थांबलेले नाहीत आणि उद्याही थांबणार नाहीत. भाजपच्या आणि विशेषत: मोदींच्या ७५ वर्षांच्या नियमानुसार त्यांना आणखी २३ वर्षांची बॅटिंग करायची आहे. सध्या वानखेडेच्या पिचवर खेळताहेत; उद्या फिरोजशहा कोटलावर फटकेबाजी करतील. केवळ राज्यापुरते मर्यादित राहणारे हे नेतृत्व नाही. आवाका अफाट आहे. भविष्यात ते दिल्लीला आणि दिल्ली त्यांना खुणावत राहील. 

मराठी माणसाने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करावे, हे स्वप्न कधी यशवंतराव चव्हाण, शरद पवार तर कधी प्रमोद महाजनांमध्ये महाराष्ट्राने पाहिले खरे, पण पूर्ण झाले नाही. गडकरींबाबतही मध्यंतरी ते स्वप्न पडले  आणि अजूनही अर्धवट झोपेत दिसत राहाते.. पंतप्रधानपदाच्या अपूर्ण स्वप्नांचे पांघरूण मराठी माणसाच्या अंगावरून काही निघत नाही. कदाचित फडणवीसांच्या रुपाने ते आज ना उद्या निघेल. उम्मीद पे दुनिया कायम है. 

अनेक जण म्हणत आहेत की, गडकरींचा पत्ता कापला गेला. त्यात थोडेबहुत तथ्य असेल, पण ते पूर्ण सत्य नाही. सायकल अन् कारची धडक झाली की लोकांना सायकलवाल्याबद्दल सहानुभूती असते, चुका या कारवाल्याच्याच शोधल्या जातात. बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार ज्यांनी आपल्यात बदल केले त्यांना यश आले.  हा नियम राजकीय पक्षांनाही लागू  आहे. आज तो गडकरींना लावला, उद्या संघ, परिस्थिती आणि कदाचित भाजपमधूनही तो मोदी-शहांनादेखील लावला जाईल. बदलांची प्रक्रिया कुणाजवळही जाऊन थांबू शकते. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. 

वर्षानुवर्षे त्याच त्या चेहऱ्यांच्या भरवशावर चालणाऱ्या पक्षाची काँग्रेस होते. भाजपने बदल केले म्हणून नवीन नेतृत्वाला संधी मिळत गेली. उत्तर प्रदेशात योगी, महाराष्ट्रात फडणवीस ही त्याचीच उदाहरणे आहेत. आपल्याला वाटते की, गडकरींना अचानक डावलले, पण ते तसे नाही; त्यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय झाला, अशी माहिती आहे. एक मात्र नक्की की मोदी, शहा आणि गडकरींमध्ये कुठेतरी काहीतरी कटुता आहे अन् त्यातूनच हे घडले असावे, असे अगदी भाजपच्याही कार्यकर्त्यांना वाटते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले गेलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपची तिकिटे वाटण्यात महत्त्वाची भूमिका असेल. नियती अशी अजब असते. तिकीट कापले गेले तेव्हा बावनकुळे सैरभैर झाले होते, डोळ्यांत पाणी होते, नशिबाला दोष देत होते, आज त्याच नशिबाने त्यांना साथ दिली आहे. 

‘गर्दिश मे नसीब के सितारे हो गये, सब जख्म फिर से हरे हो गये’ असा सुखद अनुभव त्यांना आला. फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांनी नाराजीचा सूर लावला नाही, बावनकुळेंचे तिकीट कापले तेव्हा त्यांनी नेतृत्वाऐवजी नशिबाला दोष 
दिला. दोघेही आज टॉपवर आहेत, हे पाहता थोडे काही मिळाले नाही की लगेच आक्रस्ताळेपणा करणाऱ्यांंनी संयमाची गोळी खाऊन आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तशी गरज कमी महत्त्वाची खाती मिळालेल्या राज्यातील भाजपच्या काही नेत्यांनादेखील आहे. केवळ टीव्हीवर बोलून राजकारण होत नसते, पक्षाला रिझल्ट द्यावे लागतात आणि ते देणार नसाल तर पक्षाला गृहित धरू नका, असा स्पष्ट संदेश पक्षश्रेष्ठींनी यानिमित्ताने दिला आहे.

जाता जाता  
मंत्रिमंडळात आपला पत्ता कटू नये म्हणून महाराष्ट्रातील भाजपचे तीन नेते दिल्लीत गेले होते. त्यापैकी एक जण जेव्हा भाजपच्या महानेत्याकडे गेले तेव्हा त्या महानेत्याने मंत्रिपद जाण्याची भीती दाटलेल्या त्या नेत्याला विचारले, कैसे है आपके वह देशपांडे (पीएस); क्या कर रहे है आजकल? ...अरे बापरे! आपल्या महानेत्याला तर आपले सगळेच माहिती आहे; अगदी देशपांडेसुद्धा!  हे लक्षात आल्याने तो नेता बिचारा जागीच थिजला म्हणतात. 
- तुम्ही इकडे कितीही महाजनकी करा, तुमची कुंडली दिल्लीत लिहिलेली असते, याची प्रचिती देणारा हा थरारक अनुभव आहे.

Web Title: Devendra Fadnavis came, Nitin Gadkari went; What does this mean?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.