...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा; बिहारमधून थेट दिल्ली गाठणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 06:24 AM2020-10-08T06:24:55+5:302020-10-08T08:11:00+5:30
मंत्रिमंडळातील खांदेपालटासाठी गुणवंतांचा शोध; मोदींच्या मनात नेमके काय शिजते आहे?
- हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मंत्रिमंडळात गुणवान सदस्यांना घेऊ इच्छितात. त्यांचे जवळचे मित्र अरुण जेटली आणि काही ज्येष्ठ नेत्यांचे निधन झाल्यानंतर मोदी यांनी एस शिवशंकर, हरदीपसिंग पुरी यांना मंत्रिमंडळात घेतले. निर्मला सीतारामण यांना अर्थमंत्रिपदी बढती दिली. पण अजूनही त्यांना थोडी पोकळी जाणवते आहे. काही आठवड्यांपूर्वी त्यांनी दहा प्रमुख खात्याच्या मंत्र्यांना आपापल्या खात्याच्या कामगिरीविषयी सादरीकरण करायला सांगितले. अर्थ, रेल्वे, पायाभूत विकास आदी खाती त्यात होती. त्यांच्यातल्या काहींवर विशेषत: सुधारणांच्या धिम्या गतीबद्दल मोदी नाराज असल्याचे कळते. काही मंत्र्यांबद्दल प्रतिकूल अहवालही आले आहेत. अर्थमंत्री लोकांशीच काय, पण पक्षकार्यकर्त्यांशीही जुळवून घेऊ शकलेल्या नाहीत याची मोदींना काळजी आहे. अर्थमंत्री अर्थविषयक जाणकार तर असतोच शिवाय विविध पातळ्यांवर लोकांशी नाळ जोडलेला राजकारणीही असावा लागतो. सरकारची धोरणे, कार्यक्रम लोकांपर्यंत नेण्यात अर्थमंत्रालय कमी पडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे पूर्ण प्रभारी केले गेले, यावरून मोदींच्या मनात काहीतरी शिजते आहे, हे नक्की! कोणी याची कल्पनाही केली नव्हती. भाजपांतर्गत मांडणीत काहींच्या ज्येष्ठतेला त्यामुळे धक्का बसला आहे. आधीचे नेतृत्व नितीशकुमार यांच्यापुढे नमते घेत असे. मात्र फडणवीस त्यांना पुरून उरतील असे पक्के आहेत. हा जुगार यशस्वी झाला तर केंद्रात फडणवीसांचे महत्त्व वाढेल. पुढे त्यांना केंद्रात आणण्याचा आणि मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा होईल. संवादातील दरी भरून काढण्यास मदत करणारा त्यांचा अनुभव उपयोगी पडेल, असे मंत्रालयही फडणवीसांना मिळू शकेल.
राम माधव केंद्रीय मंत्री?
मंत्रिमंडळ खांदेपालट होईल तेव्हा कोणाकोणाला घेतले जाईल याबद्दल सध्या दिल्लीत जोरात तर्क लढवले जात आहेत. शिवसेना आणि अकाली दल बाहेर पडले आहेत. संयुक्त जनता दल आणि अद्रमुक मंत्रिमंडळात न आल्याने काही मंत्र्यांना दोन तीन खाती सांभाळावी लागत आहेत. राम माधव यांना पक्ष सरचिटणीस पदावरून हटवले गेले. त्यामागे आसामचे ताकदवान मंत्री हेमंत विश्व शर्मा होते असे बोलले जाते. पण राजधानीत अशी कुजबुज आहे की, राम माधव चांगले बोलतात, परराष्ट्र नीती जाणतात, ईशान्य भारत, काश्मीरचा त्यांना उत्तम परिचय आहे. त्यांना मंत्रिपद दिले गेले तर मोदी यांच्यानंतर संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलेले ते दुसरे मंत्री असतील. गम्मत म्हणजे माधव यांनी आता त्यांच्या ट्विटरखात्यावर भाजपचा उल्लेख ठेवलेला नाही. ‘सदस्य, इंडिया फाउण्डेशन बोर्ड आॅफ गव्हर्नर्स’ एवढीच ओळख तेथे आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे पुत्र शौर्या डोवाल हे या फाउण्डेशनचे दुसरे सदस्य आहेत.
सुशांत प्रकरणात सीबीआय ठाम
सीबीआयचे प्रमुख आर.के. शुक्ला गेल्या वर्षी नेमले गेले तेव्हा होयबा ठरतील असे वाटले होते. पण ते पक्के निघाले. जुळते घेणारे, मवाळ स्वभावाचे शुक्ला आयपीएसच्या मध्य प्रदेश केडरमधून आले आहेत. टीव्ही वाहिन्यांचे मार्गदर्शन अजिबात न घेता सुशांत सिंह प्रकरणाचा पद्धतशीर तपास करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते. सीबीआय दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही; निरपराधांना न गोवण्याची परंपरा चालवील असे या स्तंभात ३ सप्टेंबरला म्हटले होतेच. सुशांतचा खून झाला असे गळी उतरवण्याचा प्रयत्न बिहार लॉबीने पुरेपूर केला. कोणतीही खेळी न करता शुक्ला गालातल्या गालात हसत राहिले. अमली पदार्थ प्रकरणात कोणाकोणाला गोवल्याने आपली इभ्रत वाढणार नाही हे एनसीबीलाही कळून चुकले आहे. आता दिल्लीपतींच्या छायेतले मानले जाणारे एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना काय करतात पहायचे.
चिरागची गुगली, नितीश यांचा त्रिफळा
‘नितीश तुम्हारी खैर नही, मोदी तुझसे बैर नही’, अशी घोषणा एलजेपी नेते चिराग पासवान का देत आहेत? -याचे उत्तर देणारा दहादा विचार करील. आपले पिताश्री रामविलास पासवान केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री राहावेत आणि त्याचवेळी बिहारमध्ये नितीश कुमार यांचाशी सामना करता यावा असा चिराग यांचा मनसुबा आहे. १५ सालच्या निवडणुकीत एलजेपी पक्षाला २४३च्या विधानसभेत फक्त २ जागा मिळाल्या. आताही असेच व्हावे यासाठी नितीशकुमार प्रयत्नशील आहेत. चिराग भाजपशी आपला व्यक्तिगत हिशेब चुकवू पाहत असतील. भाजप मात्र काय होतेय ते पाहून जमल्यास लाभ पदरात पाडून घ्यावा अशा विचारात दिसतो.
आता राजकीय पंडित असेही म्हणतात की, चिरागला भाजपचीच फूस आहे कारण गेली दोन दशके नितीशकुमार राज्यात ‘मोठ्या भावा’ची भूमिका करत आहेत. चिरागच्या गुगलीने नितीश बुचकळ्यात पडलेत आणि भाजप अजून पत्ते उघड करायला तयार नाही.