देवेंद्रभाऊ हाजीर हो...

By राजा माने | Published: January 15, 2018 02:15 AM2018-01-15T02:15:57+5:302018-01-15T02:15:57+5:30

आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती.

Devendrabhu Hazir Ho ... | देवेंद्रभाऊ हाजीर हो...

देवेंद्रभाऊ हाजीर हो...

Next

आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती. त्याच क्वॉलिफिकेशनवर नारदांनी त्याची इंद्रलोकचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर म्हणून नियुक्ती केली होती. त्याच दिव्यशक्तीचा वापर करून यमकेने भीमा-कोरेगाव प्रकरणाची पाळेमुळे खोदून इंद्रदेवांना आपला रिपोर्ट सादर केला होता. त्यामुळे कालची संक्रांत त्याच्यासाठी आनंदाची ठरली होती. भिडे गुरुजी, एकबोटे, बाळासाहेब आंबेडकर, पुरुषोत्तम खेडेकर, भीमा-कोरेगाव प्रकरणात गप्प राहिलेल्या नीलम गो-हेंपासून ते थेट जाणता राजा, रावसाहेब कसबे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडेसह ‘ढवळ्या-पवळ्यां’ना तिळगुळाच्या वड्या वाटून गावाकडे निघाला होता. एवढ्यात मोबाईलची रिंग सुरू झाली... कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी... नारदांचा फोन होता ! यमकेने जीवावर येऊनच उचलला. तिकडून नारदांनी त्याला निरोप दिला, उद्या इंद्रदरबारी हजर राहा. देवेंद्रभाऊंना इंद्रदेवांनी दरबारात हजर राहण्याचे फर्मान काढलंय ! आता मराठी भूमी शांत झाली असे वाटतानाच इंद्रदेवांनी देवेंद्रभाऊंना का बरे बोलावले? संक्रांत आनंदात गेली आता किंक्रांत कोणते रंग दाखविणार याचा अंदाज बांधत नारदांनी पाठविलेला व्हीव्हीआयपी पास घेऊन इंद्रदरबारात दाखल झाला. यावेळी नारद स्वत:च देवेंद्रभाऊंना घेऊन इंद्रदरबारात हजर होते. ‘देवेंद्रभाऊ हाजीर हो...’ या हाकेनेच दरबार सुरू झाला.
इंद्रदेव- बाळ देवेंद्र, एकटेच आलात?
नारद- देवा, आपणच केवळ त्यांनाच हाजीर करण्याचा निरोप दिला होता.
देवेंद्रभाऊ- जी देवा !
इंद्रदेव- बाळ देवेंद्र, काय चाललंय हे मराठी भूमीत? (इंद्रदेवांचा प्रश्न संपताच देवेंद्रभाऊऐवजी यमकेच उत्तर देऊ लागला.)
यमके- देवा, मी संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला सादर केला आहे. अनेकांचा डाव बुमरँग ठरला आहे. वेगवेगळ्या जातींचे ध्रुवीकरण, मतांची जातीय गणिते अन् नव्या जाती नेतृत्वाचे बीजरोपण असे अनेक मुद्दे त्यात आहेत...
इंद्रदेव- थांब यमके ! मी बाळ देवेंद्रला विचारले आहे. बाळा बोल...
देवेंद्रभाऊ- अध्यक्ष महोदय... अध्यक्ष महोदय... माफ करा, मला देवा म्हणायचे होते ! देवा, मी काय करू? एकीकडे रेशीमबाग, दुसरीकडे मोदी दरबार या प्रेशरमुळे माझे वजन आपोआपच घटू लागले आहे. डायटेशियनचे देखील तसेच म्हणणे होते ! पण देवा, मी शांत राहाण्यातच आनंद मानला...
इंद्रदेव- मग बुमरँगचा तडाखा कोणाला बसला?
देवेंद्रभाऊ- देवा, आपण सगळेच जाणता ! पण मराठी भूमीतील जनतेला मी सलाम करतो. कारण ते कुठल्याही षड्यंत्राला बळी पडले नाहीत. लाखोंचे विश्वविक्रमी मोर्चे काढणाºया मराठा समाजाने जसा समजूतदारपणा दाखविला तसा दलित समाजानेही दाखविला आणि मी सुटलो...
इंद्रदेव- बाळ देवेंद्र, आता कोणत्याही बागेचे अथवा जंगलाचे प्रेशर घेणे तुम्हाला परवडणार नाही हे बजावण्यासाठीच येथे पाचारण केले आहे. जे सत्य ते स्वीकारा आणि अ‍ॅक्शन घ्या अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल. (एवढेच बोलून देवांनी दरबार विसर्जित केला.)
- राजा माने

Web Title: Devendrabhu Hazir Ho ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.