भक्त, अभक्तांचे वाद मिटवून बंधुभाव जागवू या..!
By अतुल कुलकर्णी | Published: May 29, 2019 05:24 AM2019-05-29T05:24:46+5:302019-05-29T05:26:20+5:30
गेल्या चार-पाच वर्षांत देशात असलेल्या राजकीय वातावरणाने एकमेकांचे जिगरी दोस्त असणाऱ्यांना कधी एकदुस-याचे जानी दुश्मन करून टाकले कळालेच नाही.
- अतुल कुलकर्णी
गेल्या चार-पाच वर्षांत देशात असलेल्या राजकीय वातावरणाने एकमेकांचे जिगरी दोस्त असणाऱ्यांना कधी एकदुस-याचे जानी दुश्मन करून टाकले कळालेच नाही. छोट्या छोट्या गोष्टींत एकमेकांशी वाद घालत, तुटून पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले. गावाकडे एक म्हण आहे, ‘घरचे खायचे आणि लष्कराच्या भाकरी भाजायच्या...’ असेच काहीसे सुरू झाले. सरळ सरळ समाजात दोन गट पडले. एक भक्तांचा आणि दुसरा अभक्तांचा..! अशी अघोषित फूट पडल्यानंतर जे व्हायचे ते झाले. या दोन गटांच्या मदतीला सोशल मीडिया धावून आला. फेसबूक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून युद्ध जोमाने सुरू झाले.
त्यातच भर पडली ती व्हॉटस्अॅप विद्यापीठातून बाहेर पडणाºयांची. या विद्यापीठाचा काहींनी कोर्स सुरू केला. कोणते मुद्दे कसे मांडायचे, ते जास्तीतजास्त कसे व्हायरल करायचे याचे प्रशिक्षण सुरू झाले. त्यातून अभ्यास करून बाहेर पडलेले शिक्षित तरुण, तरुणी जगातल्या कोणत्याही विषयावर भाष्य करण्यासाठीचे मान्यताप्राप्त पदवीधर झाले. हे तरुणही मग भक्त, अभक्तांच्या दोन गटांत विभागले गेले. मग थुकरटवाडी बुद्रूकच्या बस स्टॅण्डवरील चहाच्या टपरीवर बसून हे भाष्यकार पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे चुकले आणि त्यांनी काय करायला हवे याचे सल्ले देऊ लागले. असे सल्ले आले की दुसºया गटाचे लोक त्यांच्यावर तुटून पडू लागले. या दोन्ही गटांच्या मदतीला गुगल गुरुजी आले. मोदी असोत की राहुल गांधी, कोण कुठे चुकले, कोणाचे कोणते आकडे कसे चुकीचे होते याचे ज्ञान या गुरुजींकडून मोफत मिळू लागले. त्यातून घडणाºया प्रत्येक गोष्टीवर आपण बोललेच पाहिजे, नाही बोललो तर देशाचा कारभारच बंद पडेल असे दोन्ही बाजूंच्या लोकांना वाटू लागले. यातही एक गट स्वत:ला चौकीदार म्हणू लागला; तर दुसरा चौकीदार चोर है... असे म्हणू लागला. वाद टोकाला जाऊ लागले. यातून काही गट बेफाम झाले तर काहींनी शारीरिक हल्ले करण्याकडेही आपला मोर्चा वळवला. काही तटस्थ होते. जे चालू आहे ते बरोबर नाही असे त्यांना जाणवत होते. मग त्यातल्या काहींनी या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सोयीचा मार्ग स्वीकारला.
मात्र या सगळ्या कोलाहलात देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले. शेजारी शेजारी राहणाºया दोन घरांमधले हास्य कधीच संपून गेले. घरात केलेला एखादा पदार्थ स्वत: खाण्याआधी शेजाºयाच्या घरी पाठवणे बंद झाले. सोसायटीच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्येही दुफळ्या पडल्या. हा या गटाचा, तो त्या गटाचा... एरव्ही सायंकाळच्या वेळी आपापल्या घराच्या दारात कमेरवर हात ठेवून गप्पांच्या मैफली सजवणाºया बाया-बापड्या दाराबाहेर येईनाश्या झाल्या. आपण काही बोललो आणि त्याचा जर कोणी भलताच अर्थ काढला, तर काय करायचे याची भीती काही केल्या मनात घट्ट घर करून बसली. कोणी एखादा अराजकीय विषय जरी स्वत:च्या फेसबूकवर मांडला तरी त्याची चिरफाड होऊ लागली. त्याला या विषयातलं काय कळतंय..., तुला रे कोणी अक्कल दिली एवढी... अशा व तत्सम शेलक्या शब्दांत एकमेकांची उणीदुणी काढली जाऊ लागली.
आठवून पाहा, आपण शेजाºयाशी, मित्रांशी, राजकारणातले वाद सोडून कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत का? निवडणुका दर पाच वर्षांनी होतात, निवडून येणारे येतील, पडणारे पडतील. गेल्या वेळी तुम्ही ज्यांना निवडून दिले होते ते तुमच्याकडे या पाच वर्षांत किती वेळा आले? त्यांनी तुमच्या सुख दु:खात किती सहभाग घेतला तेही आठवून पाहा आणि ज्या मित्रांना तुम्ही भक्त, अभक्त गटांत विभागून टाकले होते ते तुमच्या सुख-दु:खात किती आले ते आठवून पाहा.
आता निकाल लागले आहेत. निवडून येणारे देश कसा चालवायचा ते चालवतील. त्यांच्या चुका किंवा त्यांनी केलेल्या चांगल्या कामांचे मूल्यमापन करण्याची संधी आपल्याला पाच वर्षांनी पुन्हा हमखास मिळेल. त्या वेळी आपल्याला जे योग्य वाटेल ते करा, पण उरलेली पाच वर्षे आपण एकमेकांशी का भांडायचे? याचा विचार करा.
एकमेकांचा आनंद का हिरावून घ्यायचा? कोणी निवडून येण्याने किंवा न येण्याने आपल्या रोजच्या जीवनात असा किती फरक पडतो? जो निवडून आला तो काही आपली रोजची कामं करणार नाही, ती आपली आपल्यालाच करावी लागतील. हे पक्कं लक्षात ठेवा आणि एकमेकांशी दुरावा धरलाच असेल तर तो सोडून द्या. प्रेमाने एकमेकांची गळाभेट घ्या. एकमेकांच्या कामांना मनमोकळी दाद द्या, कौतुकाचे दोन शब्द बोला, पाहा किती प्रसन्न वाटेल..! चला, आनंदाने जगू या... भाईचाºयाने राहू या..!!
(वरिष्ठ सहाय्यक संपादक)