...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 07:49 AM2020-11-18T07:49:11+5:302020-11-18T07:49:52+5:30

मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यावरून महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण झाले, ते पाहून देवसुद्धा म्हणाले असतील, बंद होतो ते बरे होते. 

... Devotion will not weigh in the door of the temple | ...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

...देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

Next

- विनायक पात्रुडकर
कार्यकारी संपादक लाेकमत, मुंबई


धर्माधिष्ठित राजकारणाचे आपण सारेच बळी आहोत. त्यामुळे जिथे धर्म येतो त्याचा पुरेपूर वापर करून        घेण्यात राजकीय मंडळी वाक्‌बगार असतात.        कोरोनामुळे जवळपास आठ महिने बंद असलेल्या धर्मस्थळाची दारे उघडण्यावरून यथेच्छ टीका झाली. विरोधी पक्षाच्या नेते मंडळींनी घंटानाद, थाळीनाद वगैरे आंदोलने केली. यात कुठलाही राजकीय पक्ष मागे नव्हता. ओवैसीच्या एमआयएमने औरंगाबादमध्ये, प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलने केली. मनसेने त्र्यंबकेश्वरचा प्रश्न लावून धरला होता. बाकी भाजपच्या नेते मंडळींची राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरूच होती. जैन मंदिरांसाठी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागली. 


गेल्या महिन्या-दोन महिन्यात देवदर्शनासाठी ही राजकीय मंडळी अक्षरश: आसुसलेली दिसली.  यातील कितीजण नियमित देवळात जातात, हा संशोधनाचा मुद्दा ठरेल. परंतु राजकीय पोळी भाजण्यासाठी देवालये हा प्रमख मुद्दा ठरला होता. कोरोनामुळे होणाऱ्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनियंत्रित गर्दी असणाऱ्या ठिकाणी सरकारनेच बंदी घातली होती.  एका अर्थाने ही बंदी समर्थनीय होती. परंतु  हिंदुत्वाच्या नावाखाली आघाडीचे सरकार  चालविणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याची ही संधी होती. ती संधी साधण्याचा भाजप नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. या वादात राज्यपाल कोश्यारी यांनीही उडी घेतली होती. राजकीय वादाची ही फोडणी दिवाळीआधी बरीच खुशखुशीत ठरली होती. 
खरे तर मंदिरे बंद ठेवून लोकशाही विकास  आघाडीला असा कोणता फायदा होणार होता, याचा विचार व्हायला पाहिजे होता. उलट शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने त्यांना तर बंद मंदिरे ही अडचणीची बाब ठरत होती. त्याचाच फायदा भाजपने घेतला. अखेर ही ‘श्रीं’ची इच्छा असे म्हणत पाडव्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यास काही अटी- शर्तीवर परवानगी दिली. काही चर्चना मात्र या अटी-शर्ती जाचक असल्याचे नमूद करीत चर्च उघडण्यास नकार दिला. लॉकडाऊन शिथिल होत असताना आज - ना - उद्या मंदिरे उघडणार, हे स्पष्ट होते. परंतु त्याचा राजकीय फायदा उठवीत याच गोष्टीचे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय भांडवल केले गेले.


 ज्या महाराष्ट्रात दलितांसाठी मंदिरे उघडण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाशिकच्या काळा राम मंदिरात आंदोलन करावे लागले. तसेच साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर दलितांना खुले होण्यासाठी सत्याग्रह केला होता. आज त्याच महाराष्ट्रात प्रार्थनास्थळे बंद असल्याने तिथल्या पंचक्रोशीतील अर्थकारण ठप्प झाले होते. अनेकांचे रोजगार बुडाले होते. मंदिराबाहेर हार-तुरे विकणाऱ्यांचे हातावर पोट असते, त्यांची मोठी बिकट अवस्था झाली होती. ही गोष्ट नक्की खरी आहे. 
ज्या देवस्थानांभोवती ही मंडळी रोजगारनिर्मिती करीत होती, त्या देवस्थानांकडे, मंदिराच्या व्यवस्थापनांकडे, विश्वस्तांकडे इतके दिवस साठवलेला पैसा कुठे गेला? असा प्रश्न उपस्थित केला तर मोठी अडचणीची गोष्ट ठरण्याची शक्यता आहे. ज्या मंदिराभोवती ही हातावर पोट असणारी मंडळी जगत होती त्यांना या मंदिर व्यवस्थानाने किती मदत केली? त्यांच्या उपासमारीचा प्रश्न या विश्वस्त मंडळांनी सोडविला का? भाविकांच्या श्रद्धेवर चालणाऱ्या देवस्थानांपैकी किती संस्थांनी अशा स्वरूपाची मदत केली, याची माहिती लोकांपुढे यायला हवी. 


खरेतर सद्‌गुरु वामनराव पै यांनी देवळात जाणारा भाविक हा देवापुढे नतमस्तक होतो आणि डोळे बंद करून नामस्मरण किंवा प्रार्थना करतो, असे म्हटले आहे. याचा अर्थ भाविक मनातल्या मनातच देवाचे सगुण रूप साकार स्वरूपात अनुभवत असतो. तेव्हा देव मनात असताना देवालयात गर्दी करण्याची खरेच गरज आहे का? याचाही विचार भक्तांनी करायला हवा.
 कोरोनामुळे संसर्ग वाढून हकनाक आजारी पडण्यापेक्षा सरकारी नियम पाळले तर कोरोनावर नक्की मात करू, असा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. देवावर भरवसा हवाच, त्याचबरोबर या विषाणूचे   आक्रमण टाळण्यासाठी नियमाचे काटेकोर पालनही हवे. अन्यथा महाराष्ट्राची ‘दिल्ली’ झाल्याशिवाय राहणार   नाही.

Web Title: ... Devotion will not weigh in the door of the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.