भक्तिशास्त्र अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 12:28 AM2018-11-05T00:28:21+5:302018-11-05T00:28:48+5:30
भक्ती ही भावावस्था आहे. शास्त्र आहे की दर्शन आहे. दर्शन हे एक शास्त्र आहे आणि दर्शन शास्त्र हा एक अनुभूतीचा विषय आहे. दर्शनशास्त्रकारांनी सांगितलेली प्रमेये जर अनुभवाच्या कसोटीवर उतरणार नसतील तर ते दर्शनशास्त्र दर्शन या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही.
- डॉ. रामचंद्र देखणे
भक्ती ही भावावस्था आहे. शास्त्र आहे की दर्शन आहे. दर्शन हे एक शास्त्र आहे आणि दर्शन शास्त्र हा एक अनुभूतीचा विषय आहे. दर्शनशास्त्रकारांनी सांगितलेली प्रमेये जर अनुभवाच्या कसोटीवर उतरणार नसतील तर ते दर्शनशास्त्र दर्शन या संज्ञेला प्राप्त होऊ शकत नाही. दर्शनाचा अर्थच मुळी साक्षात्कार किंवा अनुभूती असा आहे. जाणीव हा शब्द आपण व्यवहारात नेहमी वापरतो. जाणीव ही लौकिक अर्थाने अस्तित्वात आली तर तो अनुभव असतो आणि जाणीव जेव्हा अलौकिक पातळीवरून आविष्कृत होते तेव्हा ती अनुभूती होते. अलौकिक अनुभूती जेव्हा अलौकिकातून लौकिकाकडे वाटचाल करू लागते तेव्हा सामान्यांच्या जीवनातही दर्शन ही संकल्पना अनुभवता येते. दर्शनाने सांगितलेल्या प्रयोजनाच्या प्राप्तीची ज्याला तळमळ लागली आहे तोच दर्शनाकडे आकृष्ट होतो. दर्शन केवळ प्रयोजन सांगून थांबत नाही तर प्रयोजनाच्या प्राप्तीचा साधनमार्गही सांगत असतो. असे प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराजांनी म्हटले आहे. दर्शने ही ज्ञानतत्त्वाने अधिष्ठित असतात. ज्ञानाच्या दोन अवस्था आहेत. एक परोक्षज्ञान आणि दुसरी अपरोक्षज्ञान. आपण ग्रंथ, संत, तत्त्ववेत्ते यांच्याकडून ऐकतो, श्रवण करतो आणि त्यातून जे ज्ञान मिळते ते परोक्षज्ञान होय. पण त्यानंतर जे ऐकले आहे, ज्याचे श्रवण घडले आहे त्याची प्रत्यक्ष अनुभूती घडते. ते प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्षज्ञान होय. भक्त, साधन, उपासक हे परोक्षज्ञानाचे रूपांतर अपरोक्षज्ञानात करतात. या अनुभूतीसाठी भक्ती आवश्यक ठरते. अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानप्राप्तीसाठी आणि अपरोक्षज्ञानासाठी आवरण आणि विक्षेप हे दोन प्रतिबंध आहेत आणि हे प्रतिबंध भक्तीनेच लय पावतात. भक्तीमध्ये सगुण भक्ती आहे. त्यात भगवंताची लीला आहे. त्या लीलेच्या वर्णनात दडलेले प्रेम आहे. भगवंताविषयीची आत्यंतिक ओढ अणि ध्यान आहे. हे ध्यान परिपूर्णतेकडे नेते. धावणारे मन ध्यानाने थांबते.
तुकोबाराय म्हणतात, ‘‘आता कोठे द्यावे मन।
तुझं चरण देखलिया।’’ म्हणजे सगुण भक्तीच्या महात्म्यज्ञानाने आचरणाची निवृत्ती होते तर लीला संकीर्तनाने विक्षेपाची निवृत्ती होते. म्हणूनच ज्ञानयोग किंवा अष्टांगयोगातील साधकांपेक्षाही मुक्त भक्त हाच खऱ्या अर्थाने भक्तिशास्त्राचा अधिकारी होतो.