ढाले यांच्या निधनाने एक झंझावात निमाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:13 AM2019-07-17T05:13:19+5:302019-07-17T05:13:28+5:30

- ज. वि. पवार फु ले-आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता, अस्सल आंबेडकरवादी विचारवंत आणि चळवळीत संपूर्ण आयुष्य झोकून घेतलेला नेता ...

Dhama's death in a hurricane | ढाले यांच्या निधनाने एक झंझावात निमाला

ढाले यांच्या निधनाने एक झंझावात निमाला

Next

- ज. वि. पवार
फु ले-आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता, अस्सल आंबेडकरवादी विचारवंत आणि चळवळीत संपूर्ण आयुष्य झोकून घेतलेला नेता म्हणजे राजा ढाले. राजा ढाले ही व्यक्ती नव्हती तर ती समष्टीची चळवळ होती. आज त्यांच्या जाण्याने पँथरचा झंझावात संपला आहे. नामदेव ढसाळ यांच्यापाठोपाठ राजा ढाले यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
१९६६ पासून आम्ही दोघं एकत्र होतो. कॉलेजमध्येही आम्ही एकत्र होतो. पँथरमध्ये येण्यापूर्वी राजा 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होता. त्या काळात अन्यायाविरोधात लिहिणारे जे मोजके साहित्यिक होते, त्यात बाबुराव बागुल, दया पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे आणि मी आघाडीवर होतो. पँथरमध्ये येण्यापूर्वी राजा लिटल मॅगझिनमध्ये सक्रिय असला तरी तो पँथरमध्ये आल्यानंतरच दलित पँथरला खऱ्या अर्थाने उभारी मिळाली होती. त्या काळातील त्याचा 'साधना'तील राष्ट्रध्वजासंबंधातील लेख गाजला होता. त्या लेखाविरोधात महाराष्ट्रासह देशभरात रान माजवलं गेलं.


खटला उभा राहिला. पण, राजा करारी होता, तो डगमगला नाही. 'फासावर लटकवले तरी चालेल, पण माफी मागणार नाही,' असा करारीपणा राजाने दाखवला आणि हा करारीपणा त्याने शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवला. राजाच्या साधनातील या लेखामुळे पँथरला उभारी मिळाली. त्यामुळेच पँथर वाºयासारखी वाढली. त्याआधीही राजा प्रकाशझोतात आला होता, तो ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांच्यावरील टीकेमुळे. नामदेवच्या 'गोलपीठा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते त्या वेळी दुर्गाबाई भागवतांनी नामदेवच्या कवितांवर टीकाटिप्पणी केली. त्या टीकेला राजाने सडेतोड उत्तर दिलं होतं. दुर्गाबार्इंनी राजाचा लेख ‘साधना’त आल्यावर आकसाने राजाविरोधात एका वृत्तपत्रामध्ये पत्र लिहून सूड उगविला होता.
राजाच्या नेतृत्वात आम्ही मराठावाडा विद्यापीठ नामांतराचा लढा लढलो. त्यानंतर पँथरने अनेक छोटी-मोठी आंदोलने केली. त्या काळी नामदेव, राजा, भाई संगारे, अविनाश महातेकर आणि मी चळवळीत आघाडीवर असायचो. त्यामुळे लोक आम्हाला पाच पांडवही म्हणायचे.
नामदेववर डाव्या विचारांचा प्रभाव होता, तर राजा शुद्ध बुद्ध-आंबेडकरी विचारांचा पुरस्कर्ता होता. भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या संपर्कात आल्यानंतर तर बुद्ध विचाराचा तो प्रखर पुरस्कार करू लागला. त्याने 'दलित साहित्या'चा 'फुले-आंबेडकरवादी साहित्य' असा शब्दप्रयोग सुरू केला. राजा नेता होता, मार्गदर्शक आणि चळवळीचा भाष्यकारही होताच. तसेच तो उत्तम चित्रकार आणि कवीही होता.
राजाच्या पन्नासाव्या जन्मदिनानिमित्त मी संपादित केलेल्या 'अस्तित्वाच्या रेषा' या त्याच्या पुस्तकात राजाच्या या पैलूचा आढावा घेतला आहे. त्यात त्याने लिहिलेल्या बालकविता, चित्रशिल्पं आणि समाजाला हादरवून सोडणारे लेख प्रसिद्ध केले होते. राजाचं गेल्या पन्नास वर्षांतलं लिखाण या पुस्तकात आहे. राजाचं वाचनही दांडगं होतं. तो सतत वाचत असायचा. मुंबईत ज्या मोजक्या लोकांकडे पुस्तकाचा प्रचंड साठा आहे, त्यापैकी राजा एक होता. त्याचा व्यासंग हा चकित करणारा होता.
राजाने लिहिलेल्या एका खासगी पत्रात आपण दोघे (ढाले आणि पवार) एका फांदीवरील दोनच पक्षी आहोत, ज्या फांदीचं नाव आहे आंबेडकरवाद, असा उल्लेख होता. आज या फांदीवरचा एक पक्षी उन्मळून पडला आहे आणि मी एकाकी पडलो आहे. गेल्या पाच दशकांची मैत्री संपुष्टात आली आहे.

राजा कायम चळवळीत ताठ कण्याने उभा असायचा. ही चळवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणारी नामांतरवादी चळवळ असो, क्रांतिबा फुले बदनामी चळवळ असो वा रिडल्स आॅफ हिंदूझमची चळवळ असो राजा ढाले नेहमीच अग्रभागी असे. आपल्या बुद्धिचातुर्याने लढत असे. बाबासाहेबांनी चळवळ ब्रेन आणि पेन यांच्या सामर्थ्यावर लढवली पाहिजे, असे म्हटले होते. राजाने हा विचार तंतोतंत पाळला.
राजा आणि मी दलित पँथर बरखास्त केल्यानंतर भय्यासाहेब आंबेडकर यांचे सहकारी झालो. जनता पक्ष नुकताच अस्तित्वात आला होता त्या वेळी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. भय्यासाहेबांचे सगळे सहकारी भय्यासाहेबांना सोडून गेले होते. तेव्हा मी आणि राजा यांनीच भय्यासाहेबांना साथ दिली. खासदारकीच्या निवडणुकीत भय्यासाहेबांचा पराभव झाला होता. आम्ही मात्र त्यानंतर भारिपमध्ये सामील होत बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करू लागलो. ढाले एकंदर दोन वेळा पक्षाचे अध्यक्ष झाले आणि मी सरचिटणीस. आमचा नि:स्वार्थीपणा आणि आंबेडकर विचारनिष्ठा याचे हे फलित होते.
पँथरनंतर दिशाहीन झालेल्या आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम राजाने केलं. आता त्याच्या जाण्याने चळवळ खºया अर्थाने दिशाहीन झालीय. बाबासाहेबांच्या विचारांचा डोळस विश्लेषक हरपल्याने चळवळीला दिशा देणारा कोणीच उरला नाही. माझ्या या पन्नास वर्षांच्या मैत्रीला, सहकाºयाला आणि आंबेडकरी निष्ठावंताला माझा अखेरचा जय भीम.
(ज्येष्ठ दलित साहित्यिक)

Web Title: Dhama's death in a hurricane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.