धर्मविद्वेषाला रंगभेदाची जोड
By admin | Published: April 12, 2017 03:26 AM2017-04-12T03:26:24+5:302017-04-12T03:26:24+5:30
अडवाणींच्या नेतृत्वकाळात अरुण शौरी, तरुण विजय, बलबीर पुंज आणि चंदन मित्रा हे चार पत्रकारच त्यांचा पक्ष हाकत असत. ते म्हणतील तीच तेव्हा पक्षाची पुढची दिशा असे.
अडवाणींच्या नेतृत्वकाळात अरुण शौरी, तरुण विजय, बलबीर पुंज आणि चंदन मित्रा हे चार पत्रकारच त्यांचा पक्ष हाकत असत. ते म्हणतील तीच तेव्हा पक्षाची पुढची दिशा असे. आताच्या राजकारणात अडवाणीच कुठे शिल्लक नाहीत. परिणामी त्या चौघांचाही पक्ष व राजकारणातील भाव बराच खाली आला आहे. त्यातले शौरी हे बुद्धिमान व स्वतंत्र विचार करणारे आणि पुरेसे बेडर असल्याने त्यांनी त्यांची प्रतिमा अजून जपली आहे. बाकीच्या तिघांना त्यांची नावे चर्चेत ठेवण्यासाठी कसरती कराव्या लागत आहेत. त्यातली आताची तरुण विजय या खासदार असलेल्या पत्रकाराची कसरत अनेकांचे लक्ष वेधून घेणारी, भाजपाला अडचणीत आणणारी आणि त्या पक्षाच्या राजकारणातील धर्मग्रस्ततेला वर्णग्रस्ततेचीही जोड आहे काय, असा प्रश्न निर्माण करणारी आहे. अमेरिकेतील गौरवर्णीयांच्या मनात तेथील कृष्णवर्णीयांविषयीचा रोष व संशय अजून जागता आहे. ओबामांची त्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली तरी तेथील जनतेतील वर्णविद्वेषीवृत्ती अजून पुरती संपलेली नाही. भारताच्या राजकारणात धर्मांधता आणि जात्यंधता असली, तरी त्यात रंगभेदाला वा वर्णविद्वेषाला आजवर कधी प्रवेश करता आला नाही. येथे गौरवर्णी, सावळे, काळे असे सगळ्या वर्णाचे लोक एक राष्ट्र म्हणून जगतात आणि खेळीमेळीने राहतात. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या विद्वेषाच्या संदर्भात भारतातील काळ्या वर्णाच्या दाक्षिणात्य बांधवांना नेऊन बसविण्याचा देशबुडवा प्रकार आजवर कुणी केला नाही. तो आता वेगळ्या भाषेत तरुण विजय यांनी केला आहे. पक्षावर होत असलेल्या धर्मांधतेच्या आरोपाला उत्तर देण्याच्या प्रयत्नात त्यांच्या तोंडून भारतातील कृष्णवर्णीयांना आम्ही आपले मानत नाही काय? असा कमालीचा आक्षेपार्ह व रंगभेदाचे अस्तित्व सांगणारा प्रश्न बाहेर पडला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या चार दाक्षिणात्य राज्यांतील लोक वर्णाने सावळे, काळे वा गडद काळे आहेत. पण ते कृष्णवर्णीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंशाचे नाहीत. ते भारतीय वंशाचे व ऐतिहासिकदृष्ट्या या देशाचे आद्य नागरिक आहेत. त्यांच्या रंगाचा हवाला आपली माणुसकी सिद्ध करण्यासाठी एखादा तरुण खासदार देत असेल तर तो त्या चारही राज्यांतील भारतीयांचा अवमान करणारा प्रकार ठरतो. शिवाय तो या खासदाराची वैचारिक पातळी व पत्रकार म्हणून त्याने जमविलेली काळी दृष्टीही दाखविणारा आहे. काश्मिरातले लोक गौरवर्णी आहेत. पंजाबातले गव्हाळ, राजस्थानातले काहीसे पीत, तर इतर राज्यांतील लोक उजळ वर्णाचे वा सावळे आहेत. मात्र त्यांच्या रंगाचा वा वर्णाचा हवाला पुढे करून आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करण्याचा प्रकार आजवर कुणी केला नाही आणि तो करणारा इसम कमालीच्या संकुचित मनोवृत्तीचाच असला पाहिजे. ही सारी आपली माणसे आहेत, ती भारतमातेची लेकरे आहेत अशीच या साऱ्यांबाबतची दृष्टी देशाच्या एकात्मतेला अपेक्षित आहे. पत्रकार व खासदार असणाऱ्याकडून तर देशातील लोकांच्या रंगाचा व वर्णाचाच नव्हे, तर धर्मभिन्नतेचाही उच्चार अपेक्षित नाही. आपल्याकडे रंगाचा विचार फारतर लग्नाच्या संदर्भात होतो. तो राष्ट्रधर्माच्या क्षेत्रात होत नाही. काही वर्षांपूर्वी रा. स्व. संघाच्या एका सरसंघचालकाने सोनिया गांधींना गोऱ्या चमडीची बाई म्हणून देशाचा संताप ओढवून घेतला होता. त्यातच त्याचे सरसंघचालकपदही गेलेले दिसले. तरुण विजय या खासदाराचे आताचे दाक्षिणात्यांना काळे म्हणून व तरीही आम्ही त्यांना आपले मानतो असे सांगून आपले मन फार विशाल असल्याची जाहिरात करणे हे खरेतर त्याच हीन पातळीवर जाणारे आहे. आम्ही काळ्या रंगाच्या दाक्षिणात्यांनाही आपले मानतो असे म्हणण्यात एक कमालीची आत्मग्रस्त अहंता आहे आणि ती तसे म्हणणाऱ्याच्या मनात दाटलेला वर्णद्वेष सांगणारीही आहे. हे जे लक्षात घेणार नाहीत ते पुढारी, पक्ष व माध्यमे यांचीही शहानिशा मग वेगळ्या पातळीवर करावी लागेल. वास्तव हे की अशा माणसांना आपले संसदेतील प्रतिनिधी म्हणून खपवून घेणे हे केवळ दक्षिण भारतीयांचेच नव्हे तर साऱ्या भारतीयांचेच मोठेपण आहे. देशात वाद थोडे नाहीत. त्यात धर्माचे, जातीचे, भाषेचे, संस्कृतीचे व प्रादेशिक भिन्नतेचे विवाद अनेक आहेत. हे विवाद मिटावेत यासाठी हा देश व त्याचे समाजकारण गेली ६० वर्षे प्रयत्नशील राहिले आहे. हे भेद कमी होऊन देशात एक व्यापक एकात्मता आलेलीही आपण अनुभवत आहोत. नेमक्या अशावेळी देशात रंगभेदाचे राजकारण पेरू पाहण्याचा प्रयत्न आपले मोठेपण सांगण्यासाठी कुणी करीत असेल तर त्याचा साऱ्यांनी एकमुखाने निषेधच केला पाहिजे. देशात धार्मिक दंगे होतात आणि ते राजकीय हेतूने भडकविले जातात. जातीय विद्वेषही येथे आहे आणि त्याचे स्वरूपही आता बरेचसे राजकीय उरले आहे. भाषेचे भेद आहेत पण त्यावर राजकारण उठताना आता दिसू लागले आहे. नेमक्या अशावेळी या राजकारणात रंगविद्वेषाची भर घालण्याचा भाजपाच्या या खासदाराचा प्रयत्न देशाच्या एकात्मतेवर आघात करणाराही आहे. त्याची दखल त्याचा पक्ष घेणार नसेल तर योग्य वेळी हा देशच त्याविषयीचा जाब त्याला विचारील याविषयी कुणी शंका बाळगण्याचे कारण नाही.