धर्मवादानं दिली विवेकाला सोडचिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 12:14 AM2017-10-19T00:14:42+5:302017-10-19T00:14:59+5:30
परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे.
- प्रकाश बाळ
परंपरा म्हणजे काय आणि आधुनिकतेशी त्याची सांगड घालून बदलणाºया जगाशी सुसंगत अशी जीवनपद्धती अंगिकारता येऊ शकते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानं सुरू झालेल्या वादामुळे.
भारताची राजधानी दिल्ली हे केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांपैकी एक आहे. हिवाळ्यात या प्रदूषणाचं प्रमाण इतकं वाढतं की, दिल्ली ही एक ‘गॅस चेंबर’च बनते. श्वसनाच्या व फुफ्फुसाच्या रोगाचं दिल्लीतील प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्यापासून ते दिल्ली शेजारच्या हरियाणा व पंजाबात शेताची मशागत करण्यानं निर्माण होणारे धुराचे प्रचंड लोट राजधानीपर्यंत पोचू नयेत, यासाठी उपाययोजना करण्यापर्यंत पावलं गेली काही वर्षे टाकली जात आहेत. फटाक्यांच्या विक्रीवर बंदी हा त्यापैकीच एक उपाय आहे. फटाक्यांच्या विक्रीला बंदी घालावी अशी मागणी सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली नाही. कोणत्याही राजकीय पक्षांनीही अशी मागणी केलेली नाही किंबहुना एकही राजकीय पक्ष प्रदूषण व फटाके या प्रश्नाबाबत उघड बोलायला तयार नाही. प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेत काम करणाºया स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिला आहे.
हा आदेश आल्यापासून तो ‘हिंदूविरोधी’ आहे, असा टीकेचा धुरळा उडवून देण्यात आला आहे. ‘पांचजन्य’ या संघाच्या नियतकालिकाचे माजी संपादक व राज्यसभेचे खासदार तरुण विजय यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात ‘किताबी धर्मां’च्या चष्म्यातून हिंदू जीवनपद्धतीकडं बघण्याची जी प्रथा भारतात ख्रिश्चन मिशनरी आल्यापासून पडली आहे, तिचाच परिपाक म्हणजे हा फटाक्यावरील बंदीचा आदेश, असा अन्वयार्थही लावला आहे. साहजिकच ‘आमच्या या आदेशाला जातीय-धार्मिक रंग देण्यात येत असल्याबद्दल खंत वाटते’, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाला नोंदवणं भाग पडलं आहे.
येथेच नेमका परंपरा व आधुनिकता यांची सांगड कशी घालायची, हा प्रश्न निर्माण होतो. समाजात ज्या चालीरीती असतात, त्या तत्कालीन काळाच्या संदर्भात प्रचलित झालेल्या असतात. काळ बदलत असतो. समाज नव्या गोष्टी आत्मसात करीत असतो. हीच तर प्रगती असते. मानवी इतिहासाकडं नुसती एक ओझरती जरी नजर टाकली, तरी हेच निदर्शनास येईल. माणसाचा सर्व प्रयत्न हा आपलं आयुष्य सुखी-समाधानी कसं बनेल, या दृष्टीनेच असतो. जर आयुष्य निरोगी असेल, तरच हे सुख-समाधान शक्य आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आयुष्यमान वाढलं आहे, ते वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळंच. यापुढं भारतासारख्या खंडप्राय देशाला तोंड द्यावं लागणार आहे, ते ‘सर्वांसाठी आरोग्य’ या संकल्पनेला.
केवळ वैद्यकीयच नव्हे, तर इतर क्षेत्रातही माणसानं आपल्या प्रतिभेच्या व विद्येच्या जोरावर ही जी प्रगती केली आहे, त्याचे काही तोटेही झालेले आहेत. ‘प्रदूषण’ हवेचे, पाण्याचे, इतर सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचे, हा त्यातील सर्वात मोठा तोटा आहे. हवामान बदलाचे जे आव्हान जगापुढं उभं आहे, त्यानं विविध क्षेत्रातील प्रगतीनं निर्माण केलेल्या सुखी-समाधानी आयुष्य जगण्याच्या संधीही हिरावल्या जाण्याची शक्यता दिसू लागली आहे.
हे आव्हान इतकं जबरदस्त आहे की, जगातील सर्व देश एकत्र येऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी झटत आहेत. अशा परिस्थितीत फटाक्यावरील बंदी हा ‘हिंदू धर्मावरील घाला’ ही टीका कशी काय केली जाऊ शकते?
तसं बघायला गेलं तर दिवाळी हा ‘दिव्यांचा सण’ आहे. फटाके उडवून धूर निर्माण करणं व आवाजानं आसमंत दणाणून सोडणं, हे या सणात अभिप्रेतच नाही. तरीही गेल्या दोन अडीच दशकांत जास्तीत जास्त आवाजाचे आणि अधिकाधिक धूर निर्माण करणारे फटाके बाजारात येत गेले आहेत. ‘व्यापार’ हा यातील सर्वात मोठा घटक आहे. ‘फटाके उडवणं’ ही सणांतील ‘परंपरा’ बनवली गेली आहे, ती निव्वळ व्यापारीकरणामुळंच. फटाक्यांची दारू प्रथम बनवली, ती चिनी लोकांनी आणि चिनी हे अव्वल दर्जाचे व्यापारी असल्यानं त्यांनी ती जगभर नेली तशी ती भारतातही आली आणि ती मग आपली ‘परंपरा’ बनली. मात्र ही ‘परंपरा’ पाळताना आपण आपले आयुष्य धोक्यात घालत आहोत, याची जाणीव ठेवणे, हे आपल्या हिताचे आहे की नाही? शेवटी आपण निरोगी आयुष्य जगलो, तरच सुखं-समाधानानं जगू व ‘परंपरा’ पाळू शकू ना? जर आजारानं जर्जर होऊन अंथरुणाला खिळून बसलो, तर सुखं-समाधानाची राखरांगोळी होईलच, शिवाय ‘परंपरा’ पाळण्याएवढं त्राणही आपल्या अंगात उरणार नाहीत.
म्हणूनच सध्याच्या आधुनिकोत्तर जगात वावरताना ‘परंपरांचा’ आशय जपतानाच त्यांच्या इतर अंगांना मुरड घालून आधुनिकतेची कास धरणं, हेच प्रगत व प्रगल्भ माणुसकीचं लक्षण आहे.
दुर्दैवानं आपल्या देशातील चर्चाविश्व आता इतकं धर्मवादानं कलुषित करून टाकण्यात आलं आहे की, स्वहित काय हे समजून घेण्याचाही ‘विवेक’ आता कालबाह्य ठरू लागला आहे.