धर्मवीर की धर्मवेडे ?

By admin | Published: January 16, 2015 12:43 AM2015-01-16T00:43:18+5:302015-01-16T00:43:18+5:30

युरोप व अमेरिकेतून इराक सिरिया व येमेन या पश्चिम आशियातील मुस्लीमबहुल देशांकडे जाणारे ‘दहशतवादी’ तरुणांचे लोंढे वाढले असून त्यांची दर महिन्याची संख्या एक हजारापर्यंत पोहोचली असल्याचे वृत्त आहे

Dharmaveer's Dharmadevda? | धर्मवीर की धर्मवेडे ?

धर्मवीर की धर्मवेडे ?

Next

युरोप व अमेरिकेतून इराक सिरिया व येमेन या पश्चिम आशियातील मुस्लीमबहुल देशांकडे जाणारे ‘दहशतवादी’ तरुणांचे लोंढे वाढले असून त्यांची दर महिन्याची संख्या एक हजारापर्यंत पोहोचली असल्याचे वृत्त आहे. या लोंढ्यांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने अतिशय कठोर कायदे केले आहेत. फ्रान्स, जर्मनी, आॅस्ट्रिया, स्पेन, पोर्तुगाल व कोसोव्हो इ. युरोपीय देशांनीही त्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. पण दहशती बंदुकांचे आकर्षण आणि इस्लामी धर्मगुरूंचे प्रचारी आवाहन यांना तोंड द्यायला या सगळ्या उपाययोजना कमी पडत आहेत. इराक, सिरिया व मध्य पूर्वेतील अनेक देशांना त्यांच्यातील धार्मिक ताण तणावापायी मातीमोल व्हावे लागले, हे जगाला दिसले आहे. अफगाणिस्तान हा त्यापायीच उद्ध्वस्त झालेला देश आहे. ही स्थिती तेथील स्थानिकांनाही भयभीत करणारी आहे. इसिस या इराक-इराण यांच्या दरम्यान उभ्या झालेल्या अत्यंत जहाल धार्मिक दहशतवादी संघटनेने खिलाफतची स्थापना करून तिच्या झेंड्याखाली सारे जग आणण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि तिला विरोध करणारे सगळे वध्य ठरवून त्यांची हत्याही केली आहे. इसिसने ठार मारलेल्या स्थानिक स्त्रीपुरुषांची संख्या काही हजारांवर जाणारी आहे. शिवाय तिने अमेरिका व युरोपमधून आलेल्या अनेक पत्रकारांचा शिरच्छेद केल्याचेही जगाने दूरचित्रवाहिन्यांच्या पडद्यावर पाहिले आहे. बोको हरामने परवाच दोन हजारांवर निरपराध लोकांचे बळी घेतल्याचे वृत्त आहे. अल् कायदा, बोको हराम, इसिस आणि त्याचसारख्या धार्मिक दहशतवादी संघटनांमध्ये निरपराधांचे बळी घेण्याची व स्वत:ची दहशती जरब वाढविण्याची अहमहमिका सुरू असल्याचे सांगणारे हे चित्र आहे. तेवढ्यावरही या संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे होणाऱ्या ‘अविचारी व शस्त्रप्रिय’ तरुणांची संख्या वाढत असल्याचे सांगणारे हे विपरित चित्र आहे. काही काळापूर्वी भारतातील केरळ, कर्नाटक व पुण्यातील तरुणांनी त्या भागात याचसाठी जाण्याची तयारी केली होती. त्यातले काही पकडले गेले तर काही जाऊन माघारी वळले. दहशत, खून आणि रक्तबंबाळपण यांचेही एक जीवघेणे आकर्षण असते. ते धर्मश्रद्धेच्या व बलिदानाच्या नावावर तरुणाईच्या गळी उतरविले जाते. ते विष अंगात भिनलेल्या लोकांना मग धर्मासाठी ‘शहीद’ होण्याचेच वेड लागते. साऱ्या जगातून पश्चिम आशियात जाऊ पाहणारे तरुणाईचे आताचे लोंढे अशा वेडाने भारलेल्या अर्धवटांचे व त्यांना चिथावणी देणाऱ्या त्यांच्या धर्मगुरूंच्या शिकवणीच्या यशाचे आहेत. मृत्यू समोर आहे, विजयाची कोणतीही आशा दिसणारी नाही व ज्या शक्तींना तोंड द्यायचे त्या सर्वविनाशी आहेत हे दिसत असतानाही जी माणसे या मार्गावरून जायला सिद्ध होतात त्यांना काय म्हणायचे? धर्मवीर की धर्मवेडे? प. आशियातील अशा धर्मवेड्यांच्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. मात्र आपण मेलो तरी आपला तथाकथित धर्म त्यामुळे विजयी होणार असल्याचे त्यांच्या डोक्यातले वेड त्यांना पुढे जाण्याच्या व प्रसंगी मरण्याच्या प्रेरणा देत असते... अशावेळी शांतताप्रेमी व मानवतावादी शक्तींनी काय करायचे असते? या शक्ती धर्मवेडापुढे दुबळ््या ठरतात काय? एकेकाळी या शक्तींचे प्रभावी नेतृत्व करणारे जगाने पाहिलेले लोक आता दिसेनासे झाले आहेत काय? रसेल, आईन्स्टाईन किंवा गांधींसारखी माणसे आजच्या जगात दुर्मिळ आहेत काय? काळ जसजसा पुढे जातो तशा जाती,धर्म, पंथासारख्या जन्मदत्त श्रद्धा दुबळ््या होतात आणि मानवता, स्वातंत्र्य, समता व बंधुतेसारखी मूल्ये त्यांची जागा घेतात असे म्हटले जाते. तशी या मूल्यांची ताकद व मोठेपण जगात वाढलेही आहे. हाताच्या बोटावर मोजता यावी एवढीच राष्ट्रे आता स्वत:ला धार्मिक म्हणवितात. बाकीचे सारे जग स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे आहे. बराक ओबामांसारखा कृष्णवर्णीय नेता अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवडला गेला आहे. खुद्द मुस्लीम देशातल्या मुसलमान फौजा या दहशती मुस्लीम शक्तींशी लढताना दिसत आहेत. तरीही धर्म निरपेक्षतेचे बळ जगाच्या काही भागात कमीच पडत असावे असे सध्याचे चित्र आहे. धर्मांधतेविरुद्ध संघटित होणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या शक्ती एकेकाळी युरोपसह आशियात उभ्या झाल्या. ते चित्र आता बदललेले दिसत आहे. धर्मगुरू, पुरोहित, पाद्री, मुल्ला, साधू आणि साध्व्या यांची वाढती आक्रमक वक्तव्ये आणि त्यांच्या बोलण्या-वागण्यातील वाढता विखार पाहिला की जगात मानवता येत असली तरी त्याच्या सांदीकोपऱ्यात या जुनाट श्रद्धांचा वापर अजून तसाच राहिला आहे असा प्रत्यय येतो. आपला पराभव या श्रद्धांनाही दिसत असावा. विझणाऱ्या दिव्यांच्या ज्योती अखेरच्या काळात मोठ्या होतात तसाही हा प्रकार असावा. झालेच तर अर्धवट शिकलेल्या, अजिबात न शिकलेल्या किंवा शिकूनही आपल्यावर असलेले धर्मांधतेचे पारंपारिक संस्कार पुसू न शकणाऱ्यांचाही एक वर्ग असावा. ही माणसे दुबळी असतातच शिवाय ती मनाने निराधारही असतात. मात्र काहीही झाले तरी या दडून बसणाऱ्यांना हुडकून बाहेर काढणे व त्यांना योग्य ती अद्दल घडविणे हे सगळ्या सुसंस्कृत जगाच्या रक्षणासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी अमेरिका व युरोपच नव्हे तर भारतासारख्या पूर्वेकडील देशांनीही जागरुक व सज्ज राहणे गरजेचे आहे.

Web Title: Dharmaveer's Dharmadevda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.