‘मेंटॉरशिप’ धोनीची; पण‘बिग बॉस’ विराटच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:09 PM2021-09-11T12:09:53+5:302021-09-11T12:17:04+5:30
मैदानातल्या धोनीचा चेहरा कधीतरीच ‘बोलका’ व्हायचा. त्याची आक्रमकता सामन्याच्या निकालातून स्पष्ट व्हायची. करारी धोनीला मैदानात फार हातवारे करावे लागले नाहीत.
सृकृत करंदीकर
विराटचं व्यक्तिमत्त्व, नेतृत्वाची शैली धोनीच्या एकदम विरुद्ध!
- तरीही विराट हाच मैदानावरचा नेता असेल, हे ‘मेंटॉर” धोनी विसरणार नाही!
‘एमएसडी’ हा निर्विवादपणे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक यशस्वी कर्णधार. २००७ मधला टी-ट्वेन्टी आणि २०११ मधला एकदिवसीय ही दोन जागतिक विजेतपदं त्याच्या नेतृत्वात भारतानं जिंकली. त्याच्या कारकिर्दीत भारत कसोटी क्रमवारीत अव्वल ठरला. यष्ट्यांमागं चित्त्याच्या चपळाईनं हालचाली करणारा धोनी डोक्यावर बर्फ ठेवून मैदानात वावरायचा. क्रिकेटची त्याची समज मोठी आहे. कसोटी असो, एकदिवसीय असो की टी-ट्वेन्टीचा सामना, वारा कोणत्या दिशेनं वाहतोय याचा अचूक अंदाज बांधत डावपेच आखणं हे कर्णधार धोनीचं मोठं वैशिष्ट्य होतं. फलंदाज धोनी स्फोटक होता पण त्याच्याकडं चौफेर फटक्यांचं वैविध्य नव्हतं. तंत्रशुद्धतेला मर्यादा होत्या. पण जिगर इतकी जबरदस्त की केवळ कणखर मानसिकतेच्या बळावर त्यानं कित्येक सामने एकहाती फिरवले. ‘अरे ला कारे’ करत देशविदेशात जिंकण्याची सवय अलीकडच्या काळात सौरव गांगुलीनं लावली हे खरंच. त्यापुढं एक पाऊल जात सहजासहजी हार न मानण्याचा लढाऊ बाणा धोनीनंच मुरवला. म्हणून तर ‘वन-डे’तल्या ‘ऑलटाईम ग्रेट फिनिशर’च्या मांदियाळीत तो विराजमान झाला. नेमक्या जागी क्षेत्ररक्षक ठेवण्याचं कसब, फलंदाजीच्या क्रमवारीतले आणि गोलंदाजीतले बदल, प्रतिस्पर्धी फलंदाजाला जोखत आपल्या गोलंदाजांना यष्ट्यांमागून त्याच्याकडून मिळणाऱ्या ‘टिप्स’ आणि स्वत:च्या, संघाच्या सर्वोच्च कामगिरीसाठी सतत मेहनत करणं यामुळं धोनी हा कॉर्पोरेट जगासाठीही नेतृत्वाचं ‘रोल मॉडेल’ बनला.
मैदानातल्या धोनीचा चेहरा कधीतरीच ‘बोलका’ व्हायचा. त्याची आक्रमकता सामन्याच्या निकालातून स्पष्ट व्हायची. करारी धोनीला मैदानात फार हातवारे करावे लागले नाहीत. त्याच्या नजरेचा धाक सहकाऱ्यांसाठी पुरेसा होता. तो कशावरच ‘रिॲॅक्ट’ होत नाही याचंच दडपण प्रतिस्पर्ध्यावर असायचं.
याच अनोख्या धोनीच्या नेतृत्वात सध्याचा कर्णधार विराट कोहलीची कारकीर्द सुरू झाली. धोनीच्या नेतृत्वाखाली विराट जवळपास दहा-अकरा वर्षं खेळलाय. हे दोघंही एकमेकांना चांगलं ओळखून आहेत. विराटचं व्यक्तिमत्त्व, नेतृत्वाची शैली धोनीच्या एकदम विरुद्ध. आक्रमकता देहबोलीतून दाखवण्याची विराटला हौस. मैदानातल्या प्रतिस्पर्ध्यांना नव्हे तर त्यांच्या पाठीराख्यांनाही डिवचण्याची संधी तो सोडत नाही. फलंदाज म्हणून विराट धोनीपेक्षा कैक पटीनं सरस. जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झगडण्याची धोनीसारखीच जिगर विराटकडंही आहे. कर्णधार म्हणून मात्र विराटनं अजून धोनीचा पल्ला गाठलेला नाही. पण विराटच धोनीची बरोबरी करु शकतो किंवा पुढंही जाऊ शकतो.
येत्या ऑक्टोबरमध्ये ओमान इथं टी-ट्वेन्टी विश्वचषक खेळला जातोय. ही स्पर्धा गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार होती. या विश्वचषकात खेळून निवृत्त होण्याचा धोनीचा बेत होता. पण कोरोनानं गणित बिघडवलं. विश्वचषक पुढं ढकलला गेला. धोनीनंही गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला निवृत्ती घोषित केली. पण या विश्वचषकाशी त्याचं नातं बहुधा जुळणारच होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीच्या जोडीबरोबर धोनीला पाठवण्याचा चांगला निर्णय घेतला. प्रशिक्षकपदाचा करार संपण्याच्या बेतात असताना धोनीशी संघर्ष न करण्याइतपत शास्त्री हिशोबी आहे. दुसऱ्या बाजूला धोनीकडं कुठल्याही ‘आयआयएम’ची किंवा हार्वड्सची पदवी नसली तरी तो जन्मजात नेता आहे. कुठं, किती वेळ रेंगाळायचं आणि स्वत:ची ‘लक्ष्मणरेषा’ किती ताणायची याचा त्याला असणारा ‘सेन्स’ जबरी आहे. मैदानात खेळणारा कर्णधार हाच सर्वेसर्वा असतो हे तेंडुलकर, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण या ‘बिग फाइव्ह’चं नेतृत्व केलेला धोनी जाणतो. आत्ता ‘बिग बॉस’ विराट आहे हे धोनी विसरणार नाही. येता विश्वचषक हरला तर विराट जबाबदार आणि जिंकला तर धोनीमुळं असं होत नसतं. यशापयशाचा धनी एकटा कर्णधार विराटच असेल. धोनीच्या ‘मेंटॉरशिप’चा मात्र होता येईल तेवढा लाभ ‘टीम इंडिया’नं घ्यावा. भारतीय क्रिकेटची श्रीमंती यातून वाढेल.
- विश्वचषक जिंकला तर विराट-धोनी यांच्यातल्या ‘कॅॅप्टन-कोच’ या नव्या नात्याची मुहूर्तमेढ या विजयात रोवली जाईल.
(लेखक पुणे लोकमतमध्ये सहसंपादक आहेत)