धुळ्याची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:15 PM2018-11-29T22:15:55+5:302018-11-29T22:16:00+5:30

खान्देशातील जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. ९ डिसेंबरला मतदान असल्याने तोवर हा शिमगा चालेल.

Dhundi Dhuldhan | धुळ्याची धूळधाण

धुळ्याची धूळधाण

Next

मिलिंद कुलकर्णी
खान्देशातील जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या धुळ्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय धुळवड सुरु आहे. ९ डिसेंबरला मतदान असल्याने तोवर हा शिमगा चालेल.
भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी विधिमंडळात धुळ्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. स्वत: आमदारांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे आणि पत्नीविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे सांगत त्यांनी कारवाईची मागणी केली. दीड वर्षापूर्वी झालेला कुख्यात गुंड गुडड्याचा खून आणि सहा महिन्यांपूर्वी पाटील पिता-पुत्राचा भरचौकात झालेला खून या दोन खळबळजनक घटना धुळ्यातील गुन्हेगारी कोणत्या दिशेने चालली आहे, त्याच्या निदर्शक आहे.
या दोन्ही खुनानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार असलेले अनिल गोटे आणि विरोधी पक्षाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये कलगीतुरा रंगला. खून झालेला आणि खून करणारे यांना कुणाचे समर्थन होते, यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. याचा अर्थ सरळ आहे, राजकीय पाठिंब्याशिवाय गुन्हेगारी प्रवृत्ती स्थिरावली, फोफावलेली नाही. पाठिंबा कुणी दिला, विरोध कुणी केला हा वादाचा मुद्दा असला तरी कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याने गुंडगिरीला प्रोत्साहन दिले आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार अनिल गोटे यांनी या मुद्याला अधिक हवा दिली. त्यांच्या आरोपांची तोफ माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे होती. परंतु, कदमबांडे आणि राष्टÑवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत काही नगरसेववक भाजपामध्ये दाखल झाले. त्यामुळे आपल्याच पक्षात ही मंडळी येत असल्याचे पाहून गोटे यांनी आधी विरोध, नंतर पक्षाविरुध्द बंड आणि आता केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि निवडणुकीचे प्रभारी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलेला आहे. हत्येच्या कटात हे तीन मंत्री सहभागी असल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी मुंबईत केला आहे.
गोटे यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्षा हेमा गोटे यांच्या बदनामी प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विनोद थोरात हा या तिन्ही मंत्री आणि त्यांच्या स्वीय सहायकांच्या संपर्कात असल्याचा आरोपदेखील गोटे यांनी केला आहे. आता केवळ आरोपावर लोक विश्वास ठेवत नाही, परंतु आॅडिओ क्लीप सादर केल्याने त्यांच्या वक्तव्याला वजन येते. न्यायालयात हा तांत्रिक पुरावा किती टिकतो, हा प्रश्न असला तरी निवडणुकीतील नफा-तोटा या उद्देशाने त्याकडे राजकीय पक्ष बघत आहेत.
गोटे यांच्या हत्येचा कटाचे जे संभाषण व्हायरल झालेले आहे, त्यातून जी माहिती समोर आली ती राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अभद्र युतीचे धक्कादायक वास्तव समोर आणते. पूर्वी स्वस्त धान्य, रॉकेल, पेट्रोल, गॅस सिलिंडर यांचा काळाबाजार होत असे. त्यात ही अभद्र युती असे. काळ बदलला तसे अवैध धंद्यांचे क्षेत्र बदलून महामार्गावरील टोलनाके या मंडळींचे लक्ष्य बनले आहेत. ठेका मिळविण्यासाठी प्रयत्न, तो रद्द करण्यासाठी कागदी घोडे नाचविणे, घोड्यांना रतीब घालण्यासाठी मग मागणी असे सगळे दुष्टचक्र आहे. जे वाळूचे होते, तेच आता टोलनाक्यांचे होऊ लागले आहे. त्यातील संघर्ष हा रक्तरंजित असाच असतो. या संभाषणामधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सामान्य धुळेकर या सगळ्या गदारोळात पुरता भांबावून गेला आहे. महापालिका कुणाच्या ताब्यात द्यायची हा त्याच्यापुढे यक्षप्रश्न आहे. पंधरा वर्षे महापालिका ताब्यात असूनही शहराचा विकास करु न शकणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींच्या सहभागाने सत्ता राबविणाºया राष्टÑवादी कॉंग्रेसला, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या प्रवृत्तीने हातातील ‘घड्याळ’ काढून कमळ घेणाºया त्याच नगरसेवकांना सन्मानाने प्रवेश देणाºया भाजपाला, भाजपामध्ये राहून पक्षाविरुध्द बंड करणाºया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीविरुध्द लढण्याचा दावा करणाºया आमदारांनी १५ वर्षांत या विषयावर किती मोर्चे काढले, निवेदने दिली, विधिमंडळात प्रश्न उपस्थित केले. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकाºयाची बदली झाल्यावर आंदोलन केले, त्या आमदारांना समर्थन द्यायचे काय हा प्रश्न सामान्य धुळेकरांना सतावत आहे.
अर्थात, मतदार समंजस आहे. नीरक्षीर विवेकाने तो मतदान करेल आणि धुळ्याचा खरा विकास कोण करु शकतो, त्याच्याच हाती धुळ्याची चावी देईल,यात तीळमात्र शंका नाही.

Web Title: Dhundi Dhuldhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.