मधमाशी सांगेल छातीच्या भात्याची कळा; फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान मधमाशांच्या मदतीने शक्य

By Shrimant Mane | Published: June 29, 2024 09:34 AM2024-06-29T09:34:12+5:302024-06-29T09:34:26+5:30

कर्करोगाचे निदान करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांसोबत डॉक्टर एखादी मधमाशी आता सोबत ठेवतील, असं म्हटलं तर? -भविष्यात हे चित्र दिसू शकेल!

Diagnosis of lung cancer possible with the help of honey bees | मधमाशी सांगेल छातीच्या भात्याची कळा; फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान मधमाशांच्या मदतीने शक्य

मधमाशी सांगेल छातीच्या भात्याची कळा; फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान मधमाशांच्या मदतीने शक्य

कर्करोगाचे निदान करण्यासाठीचे रक्तपरीक्षण, एक्स-रे, सिटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन, अल्ट्रासाउंड उपकरणांच्या गराड्यात वावरणाऱ्या तज्ज्ञांच्या हातातील कुपीत एखादी मधमाशी आहे, संशयित रुग्णाच्या  श्वासोच्छ‌्वासातून बाहेर पडणारा वास त्या मधमाशीला हुंगायला दिल्यानंतर क्षणभरात समोरच्या व्यक्तीला कर्करोगाची लागण झालीय की नाही हे निष्पन्न झाले, असे चित्र भविष्यात दिसले तर आश्चर्य वाटू नये. विशेषत: माणसाच्या शरीरात श्वासोच्छ‌्वासाचे कार्य करणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान मधमाशांच्या मदतीने शक्य आहे.

अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतील देबजित साहा हे मूळ भारतीय मज्जासंस्था अभियंते व त्यांच्या ११ सहकाऱ्यांना एका प्रयोगात आढळले की, ‘नाॅन-स्माॅल सेल लंग कॅन्सर’ (एनएससीएलसी) व ‘स्माॅल सेल लंग कॅन्सर’ (एससीएलसी) या दोन्ही प्रकारच्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान करताना संशयित रुग्णाच्या उच्छ्वासातून बाहेर पडलेला गंध मधमाशांनी अचूक ओळखला. त्यासाठी मधमाशांच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रोड्स बसविण्यात आले. त्या माध्यमातून वासामुळे तयार होणाऱ्या रसायनाची प्रतिक्रिया मेंदूत विशिष्ट भागात उमटली. फुप्फुसाचा कर्करोग झालेल्यांच्या उच्छ्वासाचे सहा नमुने आणि निरोगी फुप्फुसातून बाहेर पडलेल्या वासाची ८८ टक्के अचूक तुलना मधमाशांनी केली. त्याशिवाय, कृत्रिमरीत्या तयार केलेले असेच दोन प्रकारचे वास मधमाशांना हुंगवले गेले, तेव्हा ते निदान ९३ टक्के इतके अचूक निघाले.

बायोसेन्सर्स ॲण्ड बायोइलेक्ट्राॅनिक्स नियतकालिकाच्या ४ जूनच्या अंकात त्या प्रयोगाचे निष्कर्ष जारी झाले आहेत. त्यावर आधारित एक विस्तृत वृत्तांत सायन्स-न्यूज या वेबसाइटने २५ जून रोजी प्रकाशित केला. आपण माधमाशांना सरसकट ‘हनी बी’ नावाने ओळखतो; परंतु त्यात मध गोळा करणाऱ्या एपिस जातीशिवाय गांधील माशी किंवा भिंतींच्या कोपऱ्यावर मातीचे घर तयार करणारी कुंभारीण माशीचाही समावेश होतो. अपिनी जमातीमधील केवळ मध गोळा करणाऱ्या एपिस मधमाशांच्या प्रमुख सात जाती व चव्वेचाळीस उपजाती आहेत. पोळ्यावर राज्य करणारी एक राणीमाशी आणि तिच्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या हजारो कामकरी माशा, यांचे कुटुंब हा निसर्गाचा एक चमत्कारच आहे जणू. प्रामाणिकपणे अहोरात्र कष्ट आणि त्यातही प्रचंड शिस्त यासाठी हा सजीव ओळखला जातो.

माणूस व मधमाशांमधील ऋणानुबंध प्राचीन आहेत. त्यामुळेच मधमाशीपालन, त्यांचे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्व, विशेषत: मृत्यूचा सांगावा मधमाशांना देण्याची युरोपियन प्रथा या सगळ्यांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. अनेकांना आठवत असेल, सप्टेंबर २०२२ मध्ये इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाल्यानंतर राजदरबारातील मधमाशा पालकांनी घोषित केले की, महाराणीच्या मृत्यूची वार्ता मधमाशांना कळविण्यात आली आहे.  हे सर्वज्ञात आहे की, कुत्रा, उंदीर, कीटक, कृमी तसेच मुंग्या अशा प्राण्यांमध्ये निसर्गातील बदल किंवा घडामोडींचा आगाऊ अंदाज येण्याचे एक विस्मयकारक अंगभूत काैशल्य असते. अगदी भूकंपाचीही आगाऊ सूचना प्राणी-पक्ष्यांना मिळते. शिकारीसाठी, भूसुरुंग किंवा अन्य स्फोटकांचा किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्यांचा शोध घेण्यासाठी आणि काही वेळा रोगांचे निदान करण्यासाठी या काैशल्याचा वापर केला जातो.

कुत्रा हा माणसाचा सर्वांत जुना मित्र असल्यामुळे त्याचा या कामासाठी होणारा वापर आपल्या अधिक परिचयाचा आहे. शरीरातील दूषित रक्त शोषून घेण्यासाठी काही कृमींचा वापरदेखील आपल्या परिचयाचा आहे. तथापि, कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचे सजीवांच्या मदतीने निदान ही बाब नक्कीच विस्मयकारक आहे. २०२० साली जगभरात ९९ लाख लोकांचे जीव कर्करोगाने घेतले हे लक्षात घेता या आजाराचे लवकर निदान हे खूप मोठे आव्हान आहे.  मधमाशा किंवा इतर कीटकांमुळे हे आव्हान पेलणे सोपे होईल. कारण, गंध ही कीटकांची भाषा आहे. फ्रान्समधील माउंटपिलिअर येथील फ्रेंच नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेतील श्रीमती फ्लोरा गुझेर व सहकाऱ्यांनी कुत्रा व इतर प्राणी अथवा कृमी-कीटकांकरवी कर्करोगाच्या निदानासंदर्भात एक प्रयोग केला.

२०२२च्या डिसेंबरमध्ये तो ‘ॲबिलिटी ऑफ ॲनिमल्स टू डिटेक्ट कॅन्सर ओडोर्स’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला. श्रीमती गुझेर किंवा देबजित साहा आदींना या प्रयोगाची प्रेरणा काही घटनांमधून मिळाली. त्यापैकी अमेरिकेतील एक घटना अशी- १९८९ साली डाॅबरमन जातीचा कुत्रा मालकिणीजवळ आला की अस्वस्थ व्हायचा. खोलात गेल्यावर स्पष्ट झाले, की  त्या महिलेला त्वचेचा कर्करोग होता. तिच्या शरीरातून विशिष्ट प्रकारचा गंध यायचा. त्यामुळे तिचा लाडका कुत्रा अस्वस्थ व्हायचा. अगदी याच प्रकारचा अनुभव कोविड-१९ महामारीवेळा आला. दिसून आले की, विषाणूचे संक्रमण झालेल्यांच्या घामाचा गंध कुत्र्यांना ओळखता येतो. तेव्हा, प्राणी-पक्षी-कीटकांमधील ही क्षमता अधिक परिणामकारकपणे वापरण्यासाठी कुत्रा, मांजर वगैरे पाळीव प्राण्यांना रोगनिदानाचे प्रशिक्षण द्यावे लागेलच; परंतु तज्ज्ञांचे म्हणणे असे की, मधमाशांना प्रशिक्षणात अडचण आहे.

कारण, त्यांच्या मेंदूतून ते प्रशिक्षण काही तासांतच पुसले जाते. त्यामुळे प्रशिक्षणाशिवाय एक मधमाशी किमान शंभर नमुन्यांचे निदान करू शकेल. त्याशिवाय, अत्यंत प्रगत अशा विज्ञानाचा लाभ घेतला तर मधमाशी अथवा छोट्या आकाराच्या सजीवांच्या मेंदूंवर शस्त्रक्रिया करून विशिष्ट भागात न्यूराॅनमध्ये इलेक्ट्रोड बसविता येतील. त्यांच्या मदतीने विशिष्ट वास मधमाशी अथवा अन्य सजीवांनी घेतला की, त्यांचे वर्तन टिपण्याची आवश्यकता राहणार नाही. थेट मेंदूतूनच त्याचे निष्कर्ष मिळविता येतील. 
    shrimant.mane@lokmat.com    

Web Title: Diagnosis of lung cancer possible with the help of honey bees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.