सुटकेसाठी नेहरूंनी हमीपत्र दिले होते का? नेहरूवादी इतिहासकारांनी दडविलेली माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 06:06 AM2023-04-11T06:06:53+5:302023-04-11T06:09:33+5:30
नाभा तुरुंगातील अनुभवाविषयी नेहरूंनी जे लिहिले त्यामागच्या कारणांचा शोध घेतला, तर नेहरूवादी इतिहासकारांनी दडविलेली माहिती उघड होते.
कांचन गुप्ता
वरिष्ठ सल्लागार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माजी संपादक
नाभा तुरुंगातील अनुभवाविषयी नेहरूंनी जे लिहिले त्यामागच्या कारणांचा शोध घेतला, तर नेहरूवादी इतिहासकारांनी दडविलेली माहिती उघड होते.
‘नेहरूंनी सुटकेसाठी कधीही माफी मागितली नाही’ असे प्रतिपादन करणारा सुरेश भटेवरा यांचा लेख (लोकमत, दिनांक ५ एप्रिल) मी बारकाईने वाचला. सुरेश भटेवरा यांनी जवाहरलाल नेहरू यांना पंजाबातील नाभा कारागृहात बंदिवासात ठेवण्यात आले होते त्यासंबंधी नेहरू यांच्याच आत्मकथनातील संबंधित भाग गोषवारा रूपात सादर केला आहे. केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना चूक ठरविण्याचा भटेवरा यांचा प्रयत्न आहे. नाभा तुरुंगातील अनुभवाविषयी आपल्या आत्मचरित्रामध्ये स्वतंत्र प्रकरण लिहिण्यामागे नेहरूंच्या मनात निश्चितच काहीतरी हेतू असला पाहिजे. मी त्या कारणाचा शोध घेतला. त्यातून नेहरूवादी इतिहासकारांनी दडविलेली माहिती उघड झाली.
नाभा संस्थानचे राष्ट्रीय विचारांचे नरेश राजा रिपुदमन सिंह यांना ब्रिटिश सरकारने पदच्युत केले; आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा गादीवर बसवून ब्रिटिश प्रशासक नेमण्यात आला. गैरसोयीच्या राजांबद्दल असे करण्याची प्रथाच ब्रिटिश काळात होती. पदच्युत झालेले राजा रिपुदमन सिंह यांच्या समर्थनासाठी अकालींनी मोर्चा काढला. सप्टेंबर १९२३ मध्ये नाभातील जैतू येथे हा भव्य मोर्चा निघाला. पक्षातील सहकारी के संथानम आणि आचार्य गिडवानी यांच्यासह दि. २१ सप्टेंबर १९२३ रोजी जवाहरलाल नेहरू हा मोर्चा पाहायला गेले. त्यांना अटक झाली आणि २२ तारखेला नाभा कारागृहात पाठविण्यात आले.
संथानम यांनी ‘हॅन्डकफ्ड विथ नेहरू’ हे आत्मकथन लिहिले आहे. त्यात संथानम म्हणतात, ‘नाभा कारागृहातल्या स्वतंत्र आणि इतर बराकींपासून तुटलेल्या एका अस्वच्छ खोलीत आम्हाला ठेवण्यात आले. या बराकीच्या भिंती मातीच्या होत्या. भिंती आणि छत केवळ मातीचे होते असे नव्हे तर जमीनही मातीचीच होती. शिपायांना आमच्याशी बोलू दिले जात नव्हते. दिलेल्या वेळेस चपाती आणि डाळ असे अन्न आमच्या कोठडीत सरकवले जात असे. आमच्या अंघोळीची काहीही सोय नव्हती. आमचे कपडे आम्हाला देण्यात आले नव्हते. छतातून सतत माती गळत होती. अशा प्रकारची वागणूक दिल्याने जवाहरलाल खूपच त्रासून गेले होते!’
- नेहरूंच्या नाभातील तुरुंगवासाचा विचार आणि त्याबाबत चर्चा करताना त्या तुरुंगाची ही अवस्था लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या आत्मकथनात ‘ॲन इंटरल्यूड इन नाभा’ या नावाचे एक स्वतंत्र प्रकरण नेहरूंनी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, ‘आम्हाला शेवटी नाभा तुरुंगात पाठवण्यात आले. हातकड्या आणि जड अशी साखळी बांधलेल्या अवस्थेत आम्हाला कोंडण्यात आले. या अनुभवाची आठवणही काढू नये असे वाटते. तेथे आम्हा तिघांना अत्यंत वाईट, अनारोग्यकारक अशा कोठडीत डांबण्यात आले होते. कोठडी अत्यंत छोटी आणि दमट होती. रात्री आम्ही जमिनीवरच झोपलो. मध्येच अचानक भीतीने जाग आली आणि पाहतो तर एक उंदीर माझ्या चेहऱ्यावरून सरसरत गेला होता!’
दरम्यान, जवाहरलाल नेहरूंवर कटाचा आरोप ठेवण्यात आला. नाभा संस्थानातील प्रतिबंधित आदेश मोडल्याचाही आरोप होताच. कटाच्या आरोपासाठी दोन वर्षांची शिक्षा होती. कटाचा आरोप लावण्यासाठी फिर्यादी पक्षाला चार आरोपींची गरज होती. म्हणून मग त्यांनी एका निरपराध शीख माणसाला यात गोवले आणि नेहरूंबरोबर आरोपी करून टाकले. के. संथानम आणि आचार्य गिडवानी त्यात होतेच. दोन वर्षे नाभा तुरुंगात काढायची या कल्पनेनेच नेहरू हादरून गेले. आपल्या आठवणीत के. संथानम पुढे लिहितात, ‘बाहेरच्या जगाला आम्ही नाभा तुरुंगात आहोत हे माहीत नव्हते. शेवटी मोतीलाल नेहरू काळजीत पडले आणि पंजाबातील वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून, व्यक्तींकडून त्यांनी आमचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यात काहीच यश न आल्याने त्यांनी थेट व्हाइसराॅयशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून मोतीलाल यांनी आवश्यक ती माहिती घेतली. या सगळ्याला २-३ दिवस लागले. त्यानंतर मात्र नाभा तुरुंगातील अधिकाऱ्यांचे वागणे अचानक बदलले. आमच्या अंघोळीची सोय करण्यात आली. आमचे कपडे आम्हाला देण्यात आले. बाहेरच्या मित्रांकडून फळे व अन्य खाद्यवस्तू आत आणू देण्यास अनुमती मिळाली!’
आपल्या आत्मचरित्रात जवाहरलाल नेहरू यांनीही आपल्या वडिलांनी, म्हणजे मोतीलाल नेहरू यांनी व्हाइसराॅय यांना तार केल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर चित्र बदलले. कोणत्याही कैद्याला कुटुंबाला भेटू दिले जात नव्हते; परंतु मोतीलाल नेहरू यांना नाभा तुरुंगात जाऊन त्यांच्या पुत्राची भेट घेऊ देण्यात आली. थोडक्यात, ज्या भयंकर परिस्थितीत नेहरू यांना ठेवण्यात आले होते ती परिस्थिती मोतीलालजींनी व्हाइसराॅय यांना केलेल्या तारेमुळे चमत्कार व्हावा अशी बदलली. दुर्दैवाने या तारेत काय म्हटले होते हे मात्र अज्ञात आहे. १५ दिवसांच्या बंदिवासानंतर जवाहरलाल नेहरू, के. संथानम, आचार्य गिडवानी आणि त्यांच्याबरोबर आरोपी करण्यात आलेल्या त्या गरीब शीख व्यक्तीला प्रतिबंधात्मक आदेश धुडकावणे आणि कट रचण्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. त्यांना अनुक्रमे सहा महिने आणि १८ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली. आश्चर्य म्हणजे शिक्षा जाहीर झाल्याबरोबर आणि कोणतेही अपील दाखल केलेले नसताना तातडीने शिक्षेला स्थगितीही मिळाली. जवाहरलाल नेहरू, के. संथानम आणि आचार्य गिडवानी यांच्यावर हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. पुन्हा नाभामध्ये येणार नाही, असे त्यांच्याकडून कबूल करून घेण्यात आले.
तिघांनी आज्ञाधारकरीत्या त्या हुकुमावर सही केली. तसा नियमच होता. नाभातील या बंदिवासानंतर खूप दिवस उलटल्यावर लिहिलेल्या आपल्या आत्मचरित्रात नेहरू असा दावा करतात की त्यांना निकाल दाखवण्यात आला नाही अथवा निकालाची प्रतही देण्यात आली नाही. मात्र त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणताही पुरावा अथवा साक्ष दिलेली नाही. इतिहासकारांनी मात्र या दाव्याला हरकत घेतली आहे. किमानपक्षी या तिघांच्या सहीचा एखादा तरी कागद त्यांच्या सुटकेपूर्वी तुरुंगाधिकाऱ्यांनी घेतला असला पाहिजे.
जवाहरलाल नेहरू, के. संथानम आणि आचार्य गिडवानी लगेच नाभातून बाहेर पडले परंतु तो गरीब बिचारा शीख मात्र तुरुंगातच राहिला. त्याचे नंतर काय झाले हे कोणालाही माहीत नाही. गमतीची गोष्ट अशी की त्यानंतर काही आठवड्यांनी आचार्य गिडवानी अकालींच्या मोर्चात सामील होण्यासाठी पुन्हा नाभामध्ये आले आणि त्यांना रीतसर अटक झाली. स्थगित करण्यात आलेली शिक्षा पुन्हा लागू करण्यात आली; कारण त्यांनी नाभात पुन्हा न येण्याचा कबूलनामा मोडला होता.
त्यांना नाभा तुरुंगात पाठवण्यात आले. जवाहरलाल नेहरू त्यांच्या मित्राच्या सुटकेसाठी आले नाहीत याची नोंद येथे घेतली पाहिजे. ते शांतपणे बाजूला राहिले. नाभा तुरुंगातल्या क्लेशकारक अनुभवाची चव त्यांना पुन्हा चाखायची नव्हती हे उघडच आहे. अंदमानात सेल्युलर तुरुंगात वीर सावरकरांना ज्या हालअपेष्टा दीर्घकाळ भोगाव्या लागल्या त्याची एक छोटीशी झलक नेहरूंनी अनुभवली होती.
आपल्या आत्मचरित्रात नेहरू लिहितात, ‘मी माझ्या मित्रांचा सल्ला मानला आणि माझी दुर्बलता झाकण्यासाठी त्याचा उपयोग केला; पण शेवटी ही दुर्बलता होती. मला नाभा तुरुंगात पुन्हा जायचे नव्हते, त्यामुळे मी लांब राहिलो. सहकाऱ्यांना अशा रीतीने वाऱ्यावर सोडून दिल्याची खंत मला कायम वाटत राहिली. नेहमीप्रमाणे शौर्यापेक्षा विवेकाला प्राधान्य दिले गेले हेच एक केवळ कारण होते!
- पण दुसऱ्या काही कारणांनी जवाहरलाल नेहरू मागे राहिले होते का? सुटकेसाठी त्यांनी काही हमीपत्र तर दिले नसेल? त्यांनी किंवा मग त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी?..