पक्ष वाढला की सूज आली?
By अतुल कुलकर्णी | Published: August 8, 2018 03:42 AM2018-08-08T03:42:38+5:302018-08-08T05:48:34+5:30
प्रिय रावसाहेब,
नमस्कार. जळगाव आणि सांगलीत आपल्या पक्षाने भरभरून मते मिळवली आणि या दोन महापालिकेत कमळ फुलले हे चांगले झाले. त्यासाठी आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे. पण भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांनी काही प्रश्न या निमित्तानं लिहून पाठवलेत. त्यांची उत्तरे कुणाकडून मिळतील अशी विचारणा त्यांनी केलीय. आपण जर यावर काही प्रकाश टाकू शकलात तर बरे होईल.
वर्षानुवर्षे पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या, पक्ष वाढावा म्हणून कष्ट केलेल्या काही कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे की हा विजय आपल्या पक्षाचा आहे की बाहेरच्या पक्षातून आपल्या पक्षात आलेल्यांचा? कन्फ्यूज्ड् झाले आहेत सगळे. एक कार्यकर्ता तर डोकं भणभण करायला लागलंय असे म्हणत होता. प्रश्नच प्रश्न. काय करावं सुचत नाही असे म्हणला. सांगलीत डझनाहून अधिक आयात केलेले अनेकजण निवडून आले. या आधी पण राज्यात ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या ठिकाणी आयाराम, गयारामांनाच जास्ती महत्त्व आले.
निवडणुकीच्या तोंडावर जे स्वत:चा पक्ष सोडून आपल्याकडे येतात त्यांना आपण निष्ठावान म्हणायचे का? जर ते निष्ठावान तर मग आपल्या पक्षात वर्षानुवर्षे काम करणारे आणि ज्यांना सत्तेचे कोणतेही लाभ मिळत नाहीत त्यांना काय म्हणायचे? निष्ठा ठेवणारे महत्त्वाचे, की निसटून इकडे तिकडे जाणारे महत्त्वाचे? या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायची असेही तो कार्यकर्ता विचारत होता.
जळगावात तर लोकांनी रांगा लावून मतदान केले आणि नंतर रांगा लावून दहा रुपयाच्या नोटाच्या बदल्यात ५०० रुपयाची नोट नेली म्हणे. हजार रुपये द्यायचे ठरले होते. त्यापैकी ५०० रुपये अॅडव्हॉन्स दिले, आणि सोबत १० रुपयाची एक नोट पण दिली. मतदान करून आल्यानंतर ती विशिष्ट नोट दाखवली की दुसरे ५०० रुपये मिळत होते. त्यासाठी देखील लोकांनी रांगा लावल्या होत्या असे एका न्यूज चॅनलवर दाखवत होते. रांगेतल्या बाया बापड्या आशेने उभ्या होत्या. त्या कोणत्या पक्षाच्या होत्या? त्यांचा आपला काही संबंध होता का? ज्या बंगल्यापुढे ती लांबच लांब रांग लागली होती तो कुणाचा होता? कुणी म्हणत होतं भाजपवाल्याचा होता.
खरं, खोटं काही तुम्हाला कळालं तर आम्हाला पण सांगाल का? उगाच आपल्याला पण माहिती असावी म्हणून विचारले साहेब. पालघरमध्ये आपण ३० खोके दिले म्हणे. ते देखील काँग्रेस सोडून आपल्या पक्षात आलेल्या माणसासाठी...! लोक काय बोलतील आणि काय नाही याचा काही नेम नाही बघा साहेब. खरंच ३० खोके दिले साहेब...? पोलिसांना कोणतीही गाडी अडवायची, तपासायची नाही अशा सूचना होत्या म्हणे..?
या सगळ्यामुळे आपली शक्ती वाढली की सूज..? कारण अजूनही आपला खरा कार्यकर्ता महामंडळाच्या नियुक्त्या, विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची पदं याच्याच प्रतीक्षेत आहे आणि बाहेरून आलेल्यांना खासदारकी, आमदारकी, नगरसेवकपद मिळताना पाहतो आहे. याचे उत्तर आहे का आपल्याकडे असेही तो विचारत होता. साहेब, ते तटकरे, भुजबळ, अजितदादा, जयंत पाटील आपल्या सोबत येणार आहेत अशी बातमी आहे, ती खरी आहे का हो...?