रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:27 AM2024-05-21T11:27:53+5:302024-05-21T11:28:23+5:30

आताचे शिक्षण अन् पुढचे करिअर, व्यवसाय यात फारसा संबंध न उरण्याच्या काळात सध्या आपण आहोत. अशावेळी ‘पुढे काय?’ हा निर्णय अधिक दक्षतेने घेतला पाहिजे!

Did you get the result Do not go blindly in the direction of the wind | रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका

रिझल्ट लागला? वारा वाहील त्या दिशेला आंधळेपणाने जाऊ नका

डॉ. विजय पांढरीपांडे

आज बारावीचा निकाल जाहीर होतो आहे. दहावी, बारावीनंतर सर्वांत मोठे प्रश्नचिन्ह असते - पुढे काय? यात विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चिंता पालकांना असते. कारण ते खऱ्या अर्थाने पालक नव्हे, तर मालक असतात. आपली स्वप्ने, इच्छा मुलांवर थोपवणे हे हल्ली सवयीचे होऊन गेले आहे. कोणते कोर्सेस चांगले, त्यात नेमके कोणते शिक्षण कसे दिले जाते, त्या शिक्षणाचा आपल्या मुला-मुलीला भविष्यात काय फायदा होऊ शकतो, असे प्रश्न खरेतर सुजाण पालकांना पडले पाहिजेत. अगदी कला, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, प्रौद्योगिकी या शब्दाचे नेमके अर्थ देखील अनेक पालकांना माहिती नसतात. वारे ज्या दिशेने वाहते त्या दिशेने गर्दी जाते.

इथे रॉबर्ट फ्रॉस्टची सुंदर कविता आठवते. तो चौरस्त्यावर उभा आहे. सगळे लोक एका विशिष्ट मार्गाने जाताहेत. कवी तिकडे न जाता वेगळी अनोळखी पाऊलवाट निवडतो अन् त्याला वेगळे सुंदर विश्व बघायला मिळते... हा फरक आहे. आपण आपली स्वतःची वेगळी वाट शोधायची आहे. गर्दीच्या मागे जाऊन उपयोग नाही, हा आजच्या युगाचा महत्त्वाचा मंत्र झाला पाहिजे.

सर्व दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना माझा एक सोपा सल्ला आहे. हा प्रयोग आजच करा. एक कोरा कागद घ्या. त्यावर मला काय आवडते? मला भविष्यात काय करायला आवडेल? माझी क्षमता कशात आहे? मला काय आवडत नाही, म्हणजे कठीण वाटते घरची परिस्थिती कशाला पोषक आहे? अडचणी कुठे येऊ शकतात..? या अन् अशा प्रश्नांची अगदी थोडक्यात उत्तरे लिहा. केवळ एकाच पानावर, जास्त लांबण नको. हे लेखन एकटाकी होणार नाही. ते तुम्हाला अनेकदा लिहावे, सुधारावे लागेल. त्याचा कंटाळा करू नका. त्यासाठी आई-वडील मित्र-मैत्रिणी शिक्षक अशा कुणाशीही तुम्ही चर्चा करू शकता; पण ते जे सांगतील त्याने प्रभावित, मोहित न होता तुम्हाला आतून प्रामाणिकपणे काय वाटते तेच लिहा.

या एकपानी लेखनाला ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ असे म्हणतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे तुम्हाला कामी येईल. म्हणजे कोर्स निवडताना, करिअर निवडताना, पार्टनर निवडताना, नोकरी शोधताना.. अशा प्रत्येक वेळी स्वतःला काय हवे, काय करायचे आहे, आवड-निवड कशात आहे, क्षमता कितपत आहे, हा सेल्फ असेसमेंटचा प्रयोग महत्त्वाचा ठरतो; मात्र हे लेखन तुम्हाला सात-आठ वेळा तरी करावे लागेल, सुधारावे लागेल.

आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीमुळे अभ्यासासाठी, नोकरी व्यवसायासाठी असंख्य क्षेत्रे, संधी उपलब्ध आहेत. कुठेही तुमच्या ग्रेड्सपेक्षा तुमचे स्किल्स, तुमची आकलनक्षमता, तुमचे लेखन, संभाषणकौशल्य, भाषेवरील प्रभुत्व हे गुण जास्त महत्त्वाचे असतात. त्यासाठी प्रचंड अवांतर वाचन हवे.  तुमची पंचेंद्रिये सदा जागरूक हवीत. अवतीभवती काय घडते आहे, जग कुठल्या दिशेने चालले आहे, समाजाच्या लोकल, ग्लोबल गरजा नेमक्या कोणत्या, समस्या कोणत्या, त्या सोडवण्यात मी कुठे, कसे, किती योगदान देऊ शकेन, याचा शोध घेणे जास्त महत्त्वाचे.

आपली क्षमता न बघता कोर्स, ब्रँच निवडणे, मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाला बळी पडून निर्णय घेणे हे धोकादायक असते हे लक्षात घ्या. इथे एकदा निर्णय घेतला की, तो बदलणे सोपे नसते. त्यात वेळ, पैसा वाया जातो. नैराश्य येते ते वेगळेच.

प्रत्येक विषय, प्रत्येक कोर्स, आपापल्या परीने चांगला असतो. त्यात करिअरची संधी असते. खरे तर तुम्ही घेतलेले पदवी शिक्षण अन् पुढचे करिअर, व्यवसाय यांत फारसा संबंध न उरण्याच्या काळात आपण आहोत. बदलत्या जगात अनेक तरुण-तरुणींना आपण जे शिकलो त्याचा पुढे नोकरी-व्यवसायात फार उपयोग होत नाही. तिथे सगळे अभ्यासक्रमांच्या बाहेरचे असते. म्हणजे सगळे तुम्हाला नव्याने शिकावे लागते (रि-लर्निंग) कधी आपण जे शिकलो ते विसरावेसुद्धा लागते. (अन् लर्निंग)! आजच्या या काळात नवनवीन शिकायला तुम्हाला सदा तत्पर राहावे लागेल. मला अमुक येत नाही, हे वाक्य उद्या कुणीही ऐकून घेणार नाही. शिक्षणाचे, नोकरी-व्यवसाय, उद्योगाचे आजचे स्वरूप अन् दहा वर्षांनंतरचे स्वरूप यात जमीन-आसमानचा बदल झालेला असेल. या सातत्याने होणाऱ्या बदलासाठी तुम्हाला सदा तत्पर राहावे लागेल...     
vijaympande@yahoo.com
 

Web Title: Did you get the result Do not go blindly in the direction of the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.