दीदी तेरा देवर दिवाना

By admin | Published: January 21, 2015 11:43 PM2015-01-21T23:43:42+5:302015-01-21T23:43:42+5:30

नव्या दीदीचा जन्म झाला आहे. ‘मै किरण बेदी नही, किरण दीदी’. तेव्हां नरेन्द्र मोदी यांना आत्तापासूनच शुभेच्छा द्यायला हरकत नाही.

Didi Thy Devaar Diwana | दीदी तेरा देवर दिवाना

दीदी तेरा देवर दिवाना

Next

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाचा ही किस्सा. त्यांच्या भेटीला एक संपादक गेले होते. मनमोकळ्या गप्पा झाल्या. भेटीची वेळ संपत आली आणि वाजपेयींचा चेहरा त्रासिक भासू लागला. संपादकांनी न राहून कारण विचारले. काहीसे गंभीर आणि काहीसे खट्याळ भाव चेहऱ्यावर आणून अटलजी म्हणाले, ‘अब दीदी जो आनेवाली है’. आता ही दीदी कोण हे सांगायची गरज नाही. कारण तोवर देशात दोनच दीदी. एक लतादीदी आणि दुसऱ्या ममतादीदी. त्यातील लतादीदींनी राज्यसभेच्या सदस्य असूनही संसदेच्या दिशेने सहसा आपली पावले वळवली नाहीत म्हणून अटलजींनी त्रासायचं काही कारण नव्हतं. तेव्हां त्राग्याचं कारण उरलं एकच. पण आता त्रस्त करुन सोडायची ममतादीदींची मक्तेदारी संपुष्टात येणार अशी लक्षणं दिसू लागली आहेत. कारण नव्या दीदीचा जन्म झाला आहे. ‘मै किरण बेदी नही, किरण दीदी’. तेव्हां नरेन्द्र मोदी यांना आत्तापासूनच शुभेच्छा द्यायला हरकत नाही. इंडियन पोलीस सर्व्हिसमधील देशातल्या पहिल्या अधिकारी म्हणून त्यांना साऱ्यांनीच डोक्यावर घेतले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मोटारीचे चलन भरणे असो वा तिहार जेलमधील सुधारणा असोत, माध्यमांसकट साऱ्यांनी त्यांचे यथोचित कौतुक केले. त्यांना दिल्लीचे पोलीस आयुक्तपद नाकारले गेले, तेव्हांही माध्यमे त्यांच्या बाजूने उभी राहिली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांनाही अमाप प्रसिद्धी मिळाली. यथावकाश त्या सेवेतून निवृत्तही झाल्या. पूर्वीच्या काळातील अखिल भारतीय सेवेतील लोक निवृत्तीनंतर अज्ञातात राहणे पसंत करीत. पण आता तसे नाही. निवृत्त होण्यापूर्वीच अनेकाना समाजकारणाचे आणि त्या माध्यमातून राजकारणाचे वेध लागू लागले आहेत. मग बेदीबाई त्याला कशा अपवाद ठरणार? त्यांच्या नशिबाचा धार्जिणगुण चांगला म्हणायचा. त्यांना अण्णा हजारे गवसले. अण्णादेखील अशा काही लोकाना गवसत होतेच. सरकार हेच साऱ्या समस्यांचे मूळ आणि आगर अशी भूमिका घेऊन वावरणाऱ्या शरद जोशी यांच्यासारखीच अण्णा हजारे यांचीही भूमिका. ती जशी अरविंद केजरीवालांना भावली तशीच किरण बेदी यांनादेखील भावली. पण हे भावणं तात्पुरतं होतं, हे कालांतराने केजरीवाल यांनी कृतीनं दाखवून दिलं. त्यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी अण्णांचं बोट सोडून दिलं. केजरीवाल हेदेखील अखिल भारतीय सेवेच्या राजस्व विभागाचे अधिकारी राहिलेले असल्याने त्यांना उपयुक्ततेचा सिद्धांत चांगलाच ठाऊक होता. त्यामुळे अण्णांची उपयुक्तता आता संपल्याचं त्यांच्या वेळीच लक्षात आलं. त्यांनी आप नावाच्या पक्षाची स्थापना केली. बेदीबाई काही त्यांंच्या समवेत गेल्या नाहीत. किंवा त्यांनीच दीदीला सोबत घेतलं नसावं. एक शाझीया इल्मी आपच्या दृष्टीनं पुरेशी असावी. केजरीवालांनी दिल्लीचं तख्त काबीज केलं आणि लगेच ते यमुनेच्या डोहात विसर्जीतही करुन टाकलं. त्यापायीच आता पुन्हा दिल्लीच्या निवडणुका. त्यात केजरीवालांच्या पुढ्यात भाजपाकडून थेट किरण दीदी. मुळात भाजपातील अवस्था एक अनार सौ बिमार अशातली. त्यात किरण बेदी कानामागून आल्या आणि दिल्ली सरकारच्या भाजपाच्या भावी मुख्यमंत्री म्हणून घोषितही केल्या गेल्या. साहजिकच भाजपातील अनेक देवर दिवाने होऊन गेले. किरण बेदींच्या पाठोपाठ शाझियादेखील भाजपात डेरेदाखल झाल्या, त्यामुळे घरचे आणि बाहेरचे असा नवाच वाद तिथे सुरु झाला आहे. बेदीबाईना त्याच्याशी काही घेणेदेणे असण्याचे कारण नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली. या वाटचालीला आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनातील आपले आद्य गुरु अण्णा हजारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला. पण अण्णा घुश्श्यात. गेल्या घरी सुखी रहा, पण आशीर्वाद मात्र मागू नको, असा सांगावा म्हणे त्यांनी धाडला. पण म्हणजे ते आशीर्वाद देणारच नाहीत असे नाही. उद्या दिल्लीत जाऊन बेदीबाईंचा प्रचारदेखील करतील. त्यामुळे अण्णांचं कुणीच काही फार मनावर घ्यायचं नसतं. बेदीबाईंच्या भाजपा प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने दिवाने झालेले दोघे. अरविंद केजरीवाल आणि योगेन्द्र यादव. केजरीवालांनी दिलेल्या आमनेसामनेच्या आवाहन वा आव्हानाची किरण बेदी यांनी चक्क तमाशा म्हणून संभावना करुन टाकली आहे. पण तरीही केजरीवालांना एक लक्ष्य मात्र जरुर मिळाले आहे. कारण मोदी लक्ष्य करुन काही उपयोग होत नाही, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले आहे. योगेन्द्र यादव यांचा मात्र खूपच तिळपापड झालेला दिसतो. का होऊ नये? अण्णांच्या आंदोलनात ज्यांनी कंधेसे कंधा मिलाकर काम केले, त्यांनीच शत्रू म्हणून उभे ठाकावे, याला काय अर्थ? त्यामुळे मोदी यांचा प्रभाव आता पार उतरला असल्याने भाजपाला मार खाण्यासाठी एक चेहरा आवश्यकच होता व तो त्यांनी किरण बेदी यांच्यात शोधला, अशी जहरी टीका योगेन्द्र यांनी केली आहे. पण त्यांनी एक धमालदेखील केली आहे. सरकारच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्यांनी हात झटकून सत्तेच्या वर्तुळात शिरणे तसे घातक असते, यावर त्यांनी जोर दिला आहे. याचा अर्थ योगेन्द्र वा अरविंद सत्तेच्या वर्तुळात शिरण्यास नाखुष असावेत असे दिसते. याला काय, युद्धाआधीच शस्त्रबंदी म्हणायचे?

Web Title: Didi Thy Devaar Diwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.