आत्मा (स्व) आणि मन यांच्यातील फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 12:32 AM2018-09-26T00:32:11+5:302018-09-26T00:32:56+5:30
आपण आत्मा (स्व) आणि मन यांच्यात काय फरक आहे, याबद्दल थोडे चिंतन करू या. आत्मा कधीही बदलत नाही, पण मन वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाचा चंद्राशी संबंध जोडला गेला आहे. (संदर्भ- शुक्ल आणि कृष्ण पक्षातील कलाकलाने बदलणारा चंद्र) ‘चंद्रमा मनसो-जयते’ असे म्हटले जाते.
- श्री श्री रविशंकर
आपण आत्मा (स्व) आणि मन यांच्यात काय फरक आहे, याबद्दल थोडे चिंतन करू या. आत्मा कधीही बदलत नाही, पण मन वेळोवेळी बदलत असते. त्यामुळेच आपल्या मनाचा चंद्राशी संबंध जोडला गेला आहे. (संदर्भ- शुक्ल आणि कृष्ण पक्षातील कलाकलाने बदलणारा चंद्र) ‘चंद्रमा मनसो-जयते’ असे म्हटले जाते. (ऋग्वेदातील पुरुष सुक्तातून साभार; अर्थ : त्याच्या वैश्विक मनापासून चंद्राचा जन्म झाला). चंद्र आणि मनाचा गहिरा अंतस्थ संबंध आहे. चंद्र जसा कलाकलाने वाढत किंवा घटत जातो, अगदी तसेच मनसुद्धा चढ आणि उतार अनुभवीत असते. कधी ते विस्तारित होते, तर कधी आकुंचित होत असते. कधी ते काहीही विशेष कारण नसताना मस्त प्रसन्न असते, तर कधी विनाकारण दु:खी असते. म्हणून प्राचीन काळापासून लोक म्हणत आले आहेत की, ‘ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले’. बंधन आणि मुक्ती या दोन्हीमागचे कारण केवळ मन आहे. आपण बंधनाचा अनुभव घ्या, किंवा मुक्त झाल्याचा आनंद असो, त्यामागचे कारण मन आहे. म्हणूनच आपल्या मनाला पुन:पुन्हा प्रशिक्षित करावे लागते. हेच या ज्ञानाचे सार आहे. जसे आपण याचा नियमित अभ्यास करू लागतो, तसतसे आपल्याला मनावर नियंत्रण ठेवण्याची सिद्धी लाभू लागते- ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती वारंवार समस्यांशी झुंजते़ मग त्यातूनही हसतखेळत पार पडण्याची क्षमता प्राप्त करते. मग अशी स्थिती येते की समस्या आली तरी ती दु:खी होत नाही. आपण जसे जीवनातल्या अनुभवातून (ते सुखद असो वा दु:खद) जात असतो, तेव्हा अशी स्थिती येते की आपल्याला अंतस्थ पातळीवर जाणीव होऊ लागते, खरंच, हे सर्व काही, काहीच नाही. तेव्हा आपण आपल्या स्व सोबत स्थापित होण्याची सुरु वात होऊ लागते. आपल्या ‘स्व’सोबत सामावले जाणे म्हणजे कोणत्याही व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीला तोंड देताना अगदी एका क्षणासाठीही आपले हास्य न गमावता समत्व साधून स्थिर राहू शकणे. गमावले तरी ते क्षणिक असते, आणि आपण त्वरित मूळ पदावर येतो. तेव्हा आपण भक्कमपणे आणि ठामपणे आपल्या ‘स्व’मध्ये स्थिरावलेलो असतो. तेव्हा
म्हटले जाईल की ती व्यक्ती सिद्ध (एक परिपूर्ण व्यक्ती) आहे, जी आपल्या अंतरात्म्यात पूर्णपणे प्रस्थापित झाली आहे.