एक मुलखावेगळी मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 04:12 AM2018-02-13T04:12:40+5:302018-02-13T04:12:51+5:30

मजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे.

 A different interview | एक मुलखावेगळी मुलाखत

एक मुलखावेगळी मुलाखत

Next

- नंदकिशोर पाटील

मजल दरमजल करत आम्ही मनाने परवा दिल्लीचा फेरफटका मारून आलो. द्वापारयुगात नारदांचा जसा त्रिलोकी संचार असायचा, तसा कलयुगी आमचा असतो. समर्थांच्या कृपेने कल्पनाशक्तीच्या जोरावर अवघे ब्रह्मांड मनचक्षुसमोर उभे करण्याचे सामर्थ्य आम्हांस लाभले आहे. कळी लावणे, कलागती करणे यात तर आमचा भारीच हातखंडा! किंबहुना, तोच आमच्या धंद्याचा कोडमंत्र. असो. तर सांगायचा मुद्दा असा की, राजधानी दिल्लीतील १० अकबर रोडवर भटकत असताना काहीतरी तळल्याचा (जळल्याचा नव्हे!) घमघमाट सुटला होता. जमेल तेवढे नाक फुगवून आम्ही अदमास घेण्याचा प्रयत्न केला असता कुणाच्या तरी घरी पकोडे, भुजिया, फाफडाचा बेत शिजत असल्याचे जाणवले. खात्री पटावी म्हणून फाटकामागून फाटकं किनकिनी करत आम्ही तिथल्या बंगल्यांमध्ये नाक खुपसले. काहींना आमचे असे नको तिथे नाक खुपसणे न खुपल्यामुळे त्यांनी फटीतूनच फटके मारले. नशीब बलवत्तर. अन्यथा, आम्हीही शूर्पणखा झालो असतो! असो. शेवटी त्या बंगल्यात आम्ही गनिमी काव्याने प्रवेश केला. अहाहा!! काय तो मिष्टान्नयोग! येथेच्छ ताव मारून तृप्तीची ढेकर देणार तोच एका दाढीधारी भार्इंनी आम्हांस हटकले. नाव, गाव आणि पेशा जाणून घेतल्यानंतर आमच्याकडे अत्यंत तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकून ते तरातरा आतमध्ये निघून गेले. शत्रूच्या गोटातील कुणी गनिम असावा, असा कदाचित त्यांचा ग्रह झाला असावा. मग आम्ही त्यांच्या सेवकांना विनंती केली की, आम्हांस मिष्टान्न नव्हे, तर भाईश्रींची मुलाखत हवी आहे. अनंतवार विनवणी केल्यानंतर भार्इंनी आम्हांस बैठकीच्या दालनात पाचारण केले. पार गुडघ्यापर्यंत वाकून नमस्कार करत आम्ही आमच्या मनातील साºया शंका-कुशंकांचे समाधान करून घेतले.
-भाईश्री, आपण अध्यक्ष झाल्यापासून आपल्या पक्षाने १९ राज्यांमध्ये सत्ता हस्तगत केली, याचे श्रेय आपण कुणाला देता. स्वत:ला, पक्षाला की नमोजींना?
भाईश्री: काँग्रेसला!
-गुजरातमध्ये आपणास पुन्हा विजय मिळाला, पण खूप दमछाक झाली. जागाही कमी झाल्या, हे कशामुळे घडले?
भाईश्री: काँग्रेसमुळे!
-येत्या काही महिन्यात राजस्थान, कर्नाटक आदी राज्यात निवडणुका आहेत. तिथे प्रचाराचा मुद्दा काय असेल?
भाईश्री: अर्थातच काँग्रेस!
-गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळातील आपल्या सरकारची ठळक कामगिरी काय?
भाईश्री: काँग्रेस की सफाई!
- देशाचा विकास दर आणि शेअर मार्केटचा निर्देशांक सतत घसरत आहे. औद्योगिक उत्पादनही घटले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा हा परिणाम आहे का?
भाईश्री: यह तो काँग्रेस का पाप है!
-अच्छे दिन, प्रत्येकी १५ लाख आणि १० कोटी युवकांना रोजगाराचे काय झाले?
भाईश्री: काँग्रेस परिवारवादी पार्टी है!
-सत्तेवर येताच आपण पाकिस्तानला अद्दल घडविणार होतात. पण आज राजरोसपणे आतंकवादी हल्ले करत आहेत, आपले जवान शहीद होताहेत, तरीही आपण गप्प का?
भाईश्री: काँग्रेसने देश का विभाजन किया है, इस का जबाब भी काँग्रेसने देना चाहिए!
 

Web Title:  A different interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.