विविध शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM2018-05-25T00:02:34+5:302018-05-25T00:02:34+5:30

आपली संपत्ती आपल्या जवळच आहे फक्त ती सुप्त स्वरूपात आहे तिला मूर्त स्वरूपात आपल्याला आणायचे आहे.

Different power | विविध शक्ती

विविध शक्ती

Next

प्रा. डॉ. संदीप ताटेवार
तुमच्या तिजोरीत भरपूर संपत्ती आहे पण तुम्हाला माहीतच नाही व तुमच्याजवळ तिजोरी उघडून पाहण्यासाठी वेळही नाही. तुम्ही मात्र पैशासाठी इतरत्र हात पसरवत आहे व गयावया करीत आहे, अशी काहीशी अवस्था आज आपली झाली आहे. खरं तर, आपली संपत्ती आपल्या जवळच आहे फक्त ती सुप्त स्वरूपात आहे तिला मूर्त स्वरूपात आपल्याला आणायचे आहे. आपली संपत्ती म्हणजे आपल्यातच जन्मापासून वसत असलेल्या विविध शक्ती व आपले सद्गुण. आपण या शक्तींचा वारंवार उपयोग करू लागलो की त्या वृद्धिंगत होत असतात. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्यामधील अनंत शक्तीला प्रगट करण्याचा पुरेसा प्रयत्न तुमच्याकडून झाला नाही तरच तुम्हाला अपयश येते. कपाळावर हात ठेवून आपल्या दुर्बलतेबद्दल सुस्कारे टाकत बसणे हा काही दुर्बलता दूर करण्याचा उपाय नाही तर दुर्बलता दूर करण्याचा उपाय म्हणजे शक्ती!
माणसामध्ये आधीच वसत असलेली शक्ती प्रगट करा व तिला तिचे स्मरण द्या .आपली पहिली शक्ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्याची शक्ती, दुसरी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये आत्मविश्वास वाढविण्याची शक्ती, तिसरी म्हणजे प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची शक्ती, चौथी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये संतुष्ट राहून पुढे प्रयत्न करायची शक्ती, पाचवी म्हणजे परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या दु:खाला पकडून न ठेवता त्याला विसरत जाण्याची शक्ती, सहावी म्हणजे सहयोग करण्याची शक्ती, सातवी म्हणजे आलेल्या परिस्थितीला प्रथम विरोध न करता शांत मनानी स्वीकारण्याची शक्ती, आठवी म्हणजे परिस्थितीमध्ये निरपेक्ष भाव जपण्याची शक्ती व नववी म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये सहिष्णुता बाळगण्याची शक्ती. या शक्तींमुळे आपण परिस्थितीमध्ये गुंतून न रहाता स्थिर राहून परिस्थितीवर मात करण्यासाठी उपायावर लक्ष केंद्रीत करू शकतो. या व्यतिरिक्त, आपल्याजवळ परिस्थितीवर मात करण्यासाठी सद्गुणांची अस्त्रे आहेत. ती म्हणजे शांती, प्रेम, परमानंद, ज्ञान, मौन, पवित्रता व सत्यता. या विविध शक्तींनी व सद्गुणांच्या अस्त्रांनी दुर्गुणांच्या असुरांशी लढाई करून आपण परिस्थितीला जिंकायचे असते. आपण या विविध शक्तीचा योग्यवेळी उपयोग केला व जीवनात सद्गुणांचा कलश प्रस्थापित केला की मग बघा आयुष्य किती आनंदी, आल्हाददायक, प्रेरणादायी व सुंदर क्षणांनी परिपूर्ण होईल!

Web Title: Different power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Meditationसाधना