संघाच्या ‘ड्रेसकोड’ची अडचण

By admin | Published: January 13, 2015 01:57 AM2015-01-13T01:57:07+5:302015-01-13T02:39:36+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘ड्रेसकोड’ घालण्यास नकार दिल्यामुळे भारतीय जनता पक्षात बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात काय द्वंद्व सुरू आहे

The difficulty of the team's dress code | संघाच्या ‘ड्रेसकोड’ची अडचण

संघाच्या ‘ड्रेसकोड’ची अडचण

Next

गजानन जानभोर -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘ड्रेसकोड’ घालण्यास नकार दिल्यामुळे भारतीय जनता पक्षात बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात काय द्वंद्व सुरू आहे याची प्रचिती यवतमाळच्या संघाच्या संमेलनातून आली आहे. या कार्यकर्त्यांचा तसा तर संघाशी कुठलाही संबंध नाही अन् संघविचारांवर त्यांची श्रद्धाही नाही. कधीकाळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये असलेल्या या कार्यकर्त्यांना केवळ राजकीय परिवर्तन म्हणून भाजप जवळचा वाटला आहे. भाजपमध्ये आल्यामुळे आपल्याला संघाची खाकी चड्डी घालावी लागेल हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. परंतु संघाच्या यवतमाळच्या राष्ट्रसाधना संमेलनाच्या निमित्ताने या कार्यकर्त्यांना संघाचा ‘ड्रेसकोड’ बंधनकारक करण्यात आला आणि इथेच भाजपमध्ये भविष्यात निर्माण होणाऱ्या अंतर्गत संघर्षाची रेष आणखी पुढे ओढली गेली. यवतमाळच्या संमेलनात सहभागी होणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना संघाची खाकी चड्डी, शर्ट, काळी टोपी तसेच बूट व काठी हा ‘ड्रेसकोड’ बंधनकारक करण्यात आला होता. त्यामुळे काही काळ वादळही निर्माण झाले होते. संघातील वादळांची माध्यमांमध्ये फारशी चर्चा होत नाही. किंबहुना ती होऊ दिली जात नाही. परंतु ही घटना संघ आणि भाजपच्या धुरिणांना चिंतेत टाकणारी आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपला जनाधार मजबूत करण्यासाठी भाजपने महाराष्ट्र व विदर्भातील इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना आत घेतले. बाहेरच्या काही उमेदवारांना तर आधी उमेदवारी आणि नंतर पक्षप्रवेश देण्याचा चमत्कारही घडला. संघशिस्तीतील भाजप एका नव्या राजकीय संस्कृतीकडे वाटचाल करीत असल्याची चाहूल त्याचवेळी लागली होती. संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांना हे खटकतही होते. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, म्हणून ते शांत होते. पूर्वी भाजपमध्ये प्रवेश देताना संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी, समाजातील तिचे स्थान आदी गोष्टी बारकाईने तपासून बघितल्या जात. संघाची पार्श्वभूमी नसली तरीही भाजपमध्ये आल्यानंतर तिला विविध अभ्यासवर्गांच्या माध्यमातून संघसंस्कारांचे बाळकडू पाजले जायचे. त्यामुळे भाजपमध्ये आलेले बहुजन समाजातील अनेक नेते-कार्यकर्ते खाकी चड्डी घालून लवकरच विजयादशमीला संघस्थानावर दिसू लागले.
काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही म्हणून तासाभरात वरोऱ्याचे संजय देवतळे सहज भाजपवासी होतात आणि अमरावतीचे सुनील देशमुख आधी उमेदवारी स्वीकारून नंतर भाजपमध्ये प्रवेश करतात. अशावेळी संघ स्वयंसेवकांना निमूटपणे त्यांचा प्रचार करण्यावाचून गत्यंतर राहत नाही. उद्या खाकी चड्डी घालून संघाच्या पथसंचलनात सहभागी होताना कदाचित यवतमाळच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच पिढ्यान्पिढ्या काँग्रेसमध्ये राहिलेल्या देवतळे, देशमुख यांच्या मनात असेच द्वंद्व निर्माण होणार आहे. विधानसभा निवडणुकीत ५९ उमेदवार दुसऱ्या पक्षातून चक्क ‘आयात’ करण्यात आले. भविष्यात जर खऱ्या अर्थाने देशात आणि राज्यात पक्षाला मजबूत करायचे असेल तर समाजातील विविध जातीवर्गांतील कार्यकर्ते पक्षात आणले पाहिजेत असे भाजप नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. समाजातील या घटकांना भाजपमध्ये जाण्यास अडचण नाही. पण संघाची खाकी चड्डी घालण्यास मात्र त्यांचे मन धजावत नाही. भविष्यात याच विषयावरून अंतर्गत संघर्ष उफाळून येणार आहे.
महात्मा गांधींचा खून करणाऱ्या गोडसेच्या दैवतीकरणाबाबत संघ मौन का धारण करतो? गोडसे प्रवृत्तींचा संघ कधीच निषेध का करीत नाही? साईबाबांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्या शंकराचार्यांना ‘श्रद्धा-सबुरी’चा उपदेश का करीत नाही? योगी आदित्यनाथ, साक्षी महाराजांच्या आचरटपणाबाबत संघाला मत व्यक्त करावेसे का वाटत नाही? भाजपात आलेल्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना संघाबाबत असे अनेक प्रश्न अस्वस्थ करीत असतात. यवतमाळच्या संमेलनाच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी संघाचा ‘ड्रेसकोड’ घालण्यास दिलेला नकार हा त्याचाच परिपाक आहे.

Web Title: The difficulty of the team's dress code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.